मस्तानी नावाचा न उमगलेला दीर्घ प्रवास : भाग २

गतजन्मीच्या वेशीवरती होत्या काही पाऊलखुणा

कुणास पुसता, कुणास होई निःशब्द भास पुन्हा

अबोल राहणे अन नित्य नव्या दिवसाची सुरुवात करणे हा एक प्रवासच झाला होता. कोणी कुठल्याही आक्रंदनाने सुरुवात करील की कोणी स्वार्थासाठी फुंकर घालील याचे भान नव्हते. आज मात्र ती आणि तो संवादाची गती वाढली होती. प्रदीर्घ काळ लोटला होता त्याच्या जाणिवेचा अन तिच्या अपेक्षित जगण्याचा. रोज पडद्यावर पडणाऱ्या सावल्या, त्यांची किंचित भूल देणारी वाणी इत्यादी सारेच मिटून मिटून पुनर्जन्म होत होता. तिच्या प्रश्नांची व श्वासांची गती आता त्याच्या ओंजळीत होती. तिच्या का ? नजरेच्या प्रश्नास तो गहीवरत होता, पण स्वतःचे योद्धेपण नाकारता येत नव्हते वा मागे सारताही येत नव्हते. सामान्य आणि असामान्य यांची व्याख्या करता येते पण जगणे सोपे नसते. त्याच्या नजरेतील घाव तिलाच ठाऊक. त्या निःशब्द होणाऱ्या पाकळ्या तिने कालच भिंतीवर गोंदवल्या होत्या, ते पाहून हे सर्व निर्माण तरी कुठून होते हा यक्ष प्रश्न त्यास पडत असे. कलेची आसक्ती आणि त्याची देव पूजा याचे वर्णन तरी कसे करणार ? त्याने यावर चिमुकल्या पापणी मिटल्या “इतकेच जमते मला” इतक्यात सावली सरली वेळ थांबली. तिला आपल्या फुलांचे कौतुक हवे होते पण त्यावर त्याचे मौन होते. आताच काही वेळा पूर्वी त्याने पुन्हा कट्यार जवळ केली होती. त्याच्या वागण्यातील संवेदना तिने निमूटपणे सहन केला. नेमके उत्तर नव्हते पण तरीही पत्रे रेखाटली जात होती सोयीप्रमाणे. त्याला चार दालने बंदिस्त होऊन जगावे वाटले तरी संधी मिळणार नव्हती. दोन पावले पुढे जात स्वारांना खूण केली, दोघेही बाहेर जाणार ही चर्चा क्षणभरात पोहोचली. वाड्याबाहेर असणाऱ्या शंभू महादेवाच्या आवारात स्वारी थांबली. एकात एक गुंफलेल्या तीन बेलाच्या झाडांच्या बुंध्याशी दोघेही थांबले. त्याने कट्यार पुढे करत तिच्या हाती सोपवली. नेमके काय घडत होते, नेमके काय बोलायचे होते ते उमजेना. त्याने मातीवर रेखाटने गोंदली, त्यापुढे तिची नजर. बेलाच्या झाडाखाली त्याने स्वतःची सावली टेकली. तिच्या प्रश्नाचे उत्तर त्या रेखाटनात, चार पावले पुढे जाताच सावली बोलू लागली. कळसावर प्रकाशमान झालेला ध्वज निरखून पाहिला त्याभोवती वलयांकित नक्षीदार सर्प दिसू लागला. पुढील डंक सावलीच्या सापाचा होणार होता.

कट्यार चिरर करीत रेखाटनावर फिरली. त्याने पुन्हा सावधान राहण्याचे सुचवले होते. ध्वज आणि सर्प आपलेच होते पण विचार वेगवेगळे. तिने त्यास मर्मभेद खूण करीत मंदिरात जाण्याचे सुचवले. दोघेही पायरी चढू लागले, त्यांना एकत्र दर्शन घ्यायचे होते शंभू महादेवाचे.

गोंदवत जातो श्वास उरतो फक्त आभास

तुझ्या प्रश्नांची उत्तरे मागतो मी देवास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!