मस्तानी नावाचा न उमगलेला दीर्घ प्रवास : भाग ४

जीर्ण झालेल्या मनावर, चिऱ्यांची आरास

एका श्वासात मिटून, होतो सत्याचा आभास

स्वतंत्र हवेली, स्वतंत्र दालने, स्वतंत्र पावले अन बंदिस्त सावली. स्वतंत्र या शब्दातच सावलीचा बंदिस्तपणा लपलेला होता. वयाचे व भावनांचे अंतर कळण्याइतका विचार बुद्धीजीवींना उमगला नसावा. प्रत्येक पावली पराकोटीचा विरोध, अपमान, संशयी फेर असताना ही तिच्या बोलण्यात कधीही अपशब्द उच्चारला गेला नव्हता. समाजाची स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी व भाव याबाबत फारसे सुख दुःख नसल्याने जिवंत राहणे हेच ध्येय असे. समाजाच्या विविध अंगातील कला, अभ्यास, शिक्षण, शास्त्र, नृत्य, धर्म इत्यादी विषयांचा हिशोब ठराविक व्यक्तींसाठी मर्यादित असला तरी, तिच्या पूर्व जीवनातील राजकन्या दर्जाचा सर्वांनाच विसर पडला होता. राजकन्येच्या राजघराण्यातील सर्व शिक्षण अध्ययनाचा व व्यवस्थेचा खुलासा होणे गरजेचे होते. कलाशिक्षण, नृत्य यातील प्राविण्ये व मनमुराद जगणे त्या राजघराण्यातील व्यवस्थेचे मुक्त अंग होते. त्या व या व्यवस्थेतील कमालीचा बदल सहसा कुणाच्या नजरेस पडत नव्हता. आज वाड्यापासून काही अंतरावरील जनमानसातील कुजबुज कानी पडत होती. दासीने दोन पावले बाहेर ओलांडून पूर्ण माहिती वेचली होती. एका घरंदाज व निष्ठावंत माणसाच्या अखेरच्या स्मृती जपण्यासाठी पाथरवटांना बोलवण्यात आले होते. वेलबुट्टीची नक्षीकामे, चिरांचा गोलाकार बाणा, भावनांचे वृदांवन सारेच उभारले जाणार होते. पण यातही एक प्रश्न कायम हुंकारत होताच. ज्या व्यक्तीच्या मरणानंतर ही धावपळ सुरू करण्यात आलेली होती. त्याच्या जिवंतपणी त्याच व्यक्तीच्या आपल्या माणसांनी क्षणोक्षणी निमूट यातना दिल्या होत्या, हेही तितकेच खरे. सामाजिक गरज व संसार नावाच्या खोल चक्रात विराजमान होताना मनाला नित्य होणारा दाह हुंकार व्यक्त करता येत नसतो. आयुष्यभराच्या थकव्यानंतर आपल्याच माणसांनी चिरे घडवत समाधी सजवावी याची व्याख्या तरी कशी करावी. छिन्नी, कुदळी, पाषाणाच्या नादात घडत जाते नव्या पाषाणी जगाची आभास स्मृती. मग पुन्हा सुरू होतो अबोल संवाद एकट्याने. डोळे भिरभिर मन सैरभैर कुणीहीकडे मोकळे न होणारे. त्या दिवशी समाधीचा खणखणाट रात्रभर कानी घुमत राहिला. असंख्य प्रश्न किंचाळत राहिले. वेदनांचे अश्रू गंभीरपणे वाहत राहिले ओळीने. त्याची आठवण त्याचे बोलणे अगदी सारेच पुन्हा पुन्हा मनात गोंजारत. एके ठिकाणी समाधी घडत होती तर एके ठिकाणी दगड झालेल्या माणसांची संगत होती. दगडादगडातील फरक वेगळाच होता. कधी पाषाण व्यक्त होतात तर कधी अव्यक्त होत होत चिरनिद्रेस जातात. चित्तात असणारा वेध अखंड शुद्ध होताच पण चालीवर नजर ठेवणारी गिधाडे सावज हेरत होती. अगदी बिनचूकपणे !!

निखळत जातो चिरा, दोन्ही दगडही मूक

ऊनपावसाची कथा, कुण्या समाधीचा शोध

श्री श्रीदत्त राऊत किल्ले वसई मोहीम परिवार : ९७६४३१६६७८

One comment to “मस्तानी नावाचा न उमगलेला दीर्घ प्रवास : भाग ४”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!