महात्मा गांधींची सूचना, नरेंद्र मोदी यांची संकल्पना आणि अंमलबजावणी रायगड जिल्ह्यात ! – योगेश वसंत त्रिवेदी

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना ब्रिटिश राजाच्या काळात २८ डिसेंबर १८८५ रोजी एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाच्छा यांनी केली. एलेन ऑक्टेवियन ह्यूम हे सेवानिवृत्त ब्रिटीश अधिकारी होते. भारतावर ब्रिटीशांची दीडशे वर्षे राजवट होती. ब्रिटीशांना भारतातून हुसकावून लावण्यासाठी मोठा स्वातंत्र्य लढा झाला आणि हा लढा खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढला गेला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी काँग्रेसचे नेतृत्व केले. टिळकांच्या नंतर महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी म्हणजेच १४ ऑगस्ट च्या मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य मिळाले. १९४८ साली महात्मा गांधी यांनी काँग्रेसचे अवतार कार्य पूर्ण झाले आहे असे सांगून आता काँग्रेस बरखास्त करा, असा सल्ला दिला. पण सत्तेच्या महत्वाकांक्षी लालसेपोटी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांनी या काँग्रेसचे अस्तित्व कायम ठेवले. १९६९ साली बंगळुरुच्या काचघरात (ग्लासहाऊस मध्ये) काँग्रेस फुटली. इंदिरा गांधी यांची इंडिकेट (इंदिरा काँग्रेस) आणि मोरारजी देसाई यांची सिंडिकेट (संघटना काँग्रेस) अशा दोन काँग्रेस झाल्या. आता या दोन काँग्रेस मधली खरी काँग्रेस कोणती ? इंदिरा काँग्रेसला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणून मान्यता मिळाली. आपली काँग्रेस हीच खरी काँग्रेस आहे, असा दावा इंदिरा गांधी यांच्या अनुयायांनी केला.
१९७५ साली इंदिरा गांधी यांनी भारतात आणीबाणी लादली आणि मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विजयाराजे सिंधिया (शिंदे) यांच्या सह अनेक विरोधकांना तुरुंगात डांबले. इंदिराजींना समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या समवेत चर्चा करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचना करणाऱ्या मोहन धारिया, चंद्रशेखर, कृष्णकांत या काँग्रेस पक्षातील तरुण तुर्क नेत्यांनाही इंदिरा गांधी यांनी कारावासात टाकले. १९७५ ते १९७७ या कालावधीत तुरुंगात असलेल्या नेत्यांनी समाजवादी पक्ष, जनसंघ, संघटना काँग्रेस, भारतीय लोकदल आणि तरुण तुर्क या सर्व नेत्यांनी एक पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.  १९७७ साली जनता पक्ष स्थापन होतांना मोरारजींची संघटना काँग्रेस जनता पक्षात विलीन झाली. त्यामुळे १९६९ साली दोन शकलं झालेल्या काँग्रेस मधला दुसरा गट अशा पद्धतीने अंतर्धान पावला. आता आमचाच पक्ष ऐतिहासिक, शंभर वर्षे जुना अशा टिऱ्या बडवायला एक गट मोकळा झाला. १९८० साली समाजवाद्यांनी संघाच्या नेत्यांवर दुहेरी सदस्यत्वाचा/दुहेरी निष्ठेचा आरोप केल्यामुळे ६ एप्रिल १९८० रोजी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आदी पूर्वाश्रमीच्या जनसंघ नेत्यांनी भारतीय जनता पार्टी ची स्थापना केली. तर राहिलेल्या/उरलेल्या जनता पक्षाचे जनता दलात विश्वनाथ प्रताप सिंह यांनी रुपांतर केले.  सुब्रह्मण्यम स्वामी यांनी या दरम्यान जनता पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले होते, जो २०१४ साली भारतीय जनता पक्षात विलीन केला. १९७७ साली इंदिरा गांधी या अनभिषिक्त सम्राज्ञी चा रायबरेलीत राजनारायण यांच्या कडून पराभव झाला खरा पण उथळपणा करणाऱ्या चरणसिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री या नात्याने राजकीय सूडबुद्धीने आरोपपत्र सादर न करताच इंदिरा गांधी यांना तुरुंगात टाकले. न्यायालयाने इंदिराजींची निर्दोष मुक्तता केल्या नंतर त्या फिनिक्स प्रमाणे पुन्हा उभ्या राहिल्या. आणीबाणी च्या काळात फॉर्मात असलेल्या संजय गांधी यांचे अपघाती निधन झाले आणि राजीव गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी दिल्लीच्या तख्तावर बसले. काँग्रेसला लोकसभेत ५४३ पैकी ४०० जागा मिळाल्या. पण नंतर देशात आघाड्यांचे पर्व सुरु झाले. १९७७ नंतर देशात काँग्रेस च्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येऊ लागले. काँग्रेसचा अस्त कधीच होणार नाही, असा समज खोटा ठरु लागला. देशपातळीवर काँग्रेसेतर सरकारे अधिकारारुढ होऊ लागली. अटलबिहारी वाजपेयी तेरा दिवस, तेरा महिने करता करता २००४ पर्यंत पंतप्रधान पदावर दिमाखदार रीतीने राहिले. २००४ ते २०१४ या काळात इटली येथे जन्मलेल्या मूळ इटालियन असल्याने सोनिया गांधी पंतप्रधान होऊ शकल्या नाहीत. राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कडे सुब्रह्मण्यम स्वामी यांनी लेखी तक्रार केली होती. त्यानंतर डॉ. मनमोहन सिंग २०१४ पर्यंत १० वर्षे पंतप्रधान पदावर राहिले.
२०१४ साली नरेंद्र मोदी नावाचे वादळ भारताच्या राजकीय क्षीतिजावर घोंघावले आणि एकेकाळी चारशे जागा मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाला ५४३ पैकी जेमतेम ४९ जागाच मिळू शकल्या आणि सभागृहात विरोधी पक्षनेते पदसुद्धा मिळू शकत नसल्याची नामुष्की ओढवली तर ५४३ च्या सभागृहात एकेकाळी जेमतेम दोन खासदार निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाचे तब्बल २८२ खासदार निवडून आले आणि भारतीय राजकारणाच्या इतिहासात काँग्रेसेतर/बिगर काँग्रेसचे संपूर्ण बहुमताचे भारतीय जनता पक्षाचे सरकार पहिल्यांदा स्थानापन्न झाले. महात्मा गांधी यांनी १९४८ साली सुचविलेल्या संकल्पनेला २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पुढे आणले. महात्मा गांधी यांनी काँग्रेसचे अवतार कार्य संपले आहे म्हणून ती विसर्जित करा, असा सल्ला १९४८ सालीच दिला होता पण त्यानंतर या ऐतिहासिक काँग्रेस पक्षाला भ्रष्टाचार आणि विविध आरोपांचे ग्रहण लागले. एकेकाळी काँग्रेस पक्षाच्या विरोधात सगळे एकत्र येऊन लढत होते पण आता २०१४ साली भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या काँग्रेस पक्षाला धडा शिकवायला निघालेल्या नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस सह विभिन्न विचारांचे पक्ष, जे एकमेकांची तोंडे सुद्धा पहात नव्हते असे पक्ष एकत्र येऊन महागठबंधन बनवू पहात आहेत. लोकसभेच्या विद्यमान अधिवेशनात राष्ट्रपतींच्या आभाराच्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विरोधकांचे आरोप फेटाळून लावतांना सणसणीत समाचार घेतला. महागठबंधनची महामिलावट अशा शब्दांत संभावना केली/खिल्ली उडवली. याचवेळी त्यांनी ‘काँग्रेस मुक्त भारत’ ही माझी नव्हे तर ती महात्मा गांधी यांची इच्छा आहे, ती मी पूर्ण करणार आहे, असे ठणकावून सांगितले. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले जबरदस्त भाषण विरोधकांना मुंहतोड जवाब देणारे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना २०२३ मध्ये पुन्हा एकदा अविश्वास ठराव आणण्याचे आव्हान दिले.
योगायोग पहा काय आहे तो, याच सुमारास काँग्रेसचे माजी मंत्री आणि रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते रविशेठ पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रायगड चे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर, जिल्हाध्यक्ष आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत रविशेठ पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
रविशेठ पाटील यांच्या भाजपप्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जवळजवळ संपुष्टात येईल अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बँरिस्टर अब्दुल रहमान अंतुले, दत्ताजीराव खानविलकर अशा दिग्गज नेत्यांनंतर रविशेठ पाटील हे एक निष्ठावंत नेते काँग्रेस पक्षात होते. पण तत्वांना तिलांजली देण्याची भूमिका जर घेण्यात येत असेल तर ते कोणत्याही निष्ठावंत कार्यकर्त्याला पटणार नाही. आणि बरोबर तशीच परिस्थिती उद्भवली. ज्या शेतकरी कामगार पक्षाबरोबर काँग्रेस पक्षाचे विचार जुळत नव्हते  ज्या दोन पक्षांतून विस्तव सुद्धा जात नव्हता त्याच दोन पक्षांनी अभद्र आघाडी करावी ? रविशेठ पाटील यांना हे कदापि मान्य होणारे नव्हते. म्हणून अत्यंत दुःखी अंतःकरणाने त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला. हे करतांना त्यांना नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्य  पटले आणि खऱ्या अर्थाने ‘सबका साथ सबका विकास’ भाजपा हाच पक्ष करु शकतो आणि ‘अच्छे दिन’ आणू शकतो, याची पुरेपूर खात्री पटली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाला सोडण्याचे गाजर दाखविले पण रायगड जिल्ह्यातील मतदार अशा गाजर दाखविणाऱ्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. रायगड जिल्ह्यात भाजप शिवसेना युती मजबूत असून रविशेठ पाटील, रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर हे रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने महात्मा गांधी यांनी केलेली सूचना जी नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली संकल्पना व निर्धार स्वरूपात पुढे आणली ती २०१९ मध्ये पूर्ण होईल आणि काँग्रेस मुक्त भारताची सुरुवात रायगड जिल्ह्यापासून होईल, हे निःसंशय !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!