महापालिका निवडणुकीवर बहिष्कार घालणार नायगावकरांचा संतप्त इशारा

वसई (वार्ताहर) : अनधिकृत बांधकामं, पर्यावरणाला बाधा आणणारे प्रकल्प, पालिका क्षेत्रातील वाढते गैरंधदे यावर आधीच पालिकेकडून कारवाईच्या नावाने बोंबाबोंब असताना वसई पश्चिमेतील नायगाव कोळीवाडा येथील स्थानिक नागरिकांनी त्यांच्या परिसरात असलेल्या डेली फे्रश बेकरीकडून सातत्याने प्रदुषण केले जात असल्याने सदर बेकरीला टाळे ठोकण्याची मागणी ग्रामस्थांनी सुमारे दीड वर्षापूर्वी पालिकेच्या आय विभागाला व आरोग्य विभागाला केली आहे. मात्र दीड वर्षानंतरही कारवाईच्या नावाने सदर विभागाकडून उदासिनता दाखवली जात असल्याने ग्रामस्थांनी तिव्र नाराजी व्यक्त करत येत्या महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा संतप्त इशारा नायगावमधील ग्रामस्थांनी पालिकेला दिला आहे.

प्राप्त माहितीनुसार, नायगाव कोळीवाडा पश्चिम येथील या भुखंडावर एका परप्रांतिय इसमाने अनधिकृत डेली फे्रश बेकरीचे बांधकाम केले आहे. या बेकरी प्रकल्पामुळे आजुबाजूच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या रहीवाशांना बेकरित पदार्थ तयार होताना होणाऱ्या प्रदुषणामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सुरूवातीच्या काळात बेकरी चालकाकडून वीजेवर चालणाऱ्या उपकरणांवर तर कधी जनरेटरच्या साह्याने पदार्थ तयार केले जात होते. मात्र कालांतराने विजेचा वापर टाळून बेकरी चालक एका परप्रांतिय इसमाने जळाऊ लाकडी सरपणांचा वापर करून पदार्थ तयार करण्याचा उपद्वयाप सुरू केला आहे. साहजिकच बेकरीच्या चिमणीमधुन निघणाऱ्या धुरामुळे व पदार्थ निर्मीती प्रक्रियेतून धुराद्वारे बाहेर पडणाऱ्या घटकांमुळे परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ लागल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

नुकतेच बोईसर येथे दुर्घटना घडली तशाच स्वरूपाची अघटीत घटना नायगाव येथे घडण्याची शक्यता आहे. पालिकेने याची गंभीर दखल घेवून बेकरी चालकाविरुध्द कारवाई करावी अशी तीव्र मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

परप्रांतिय इसमाने आर्थिक फायद्यासाठी निर्माण केलेल्या अनधिकृत डेली फे्रश बेकरीमुळे यापुढे कायमस्वरूपी नायगावमधील नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. आजुबाजूच्या परिसरातील स्थानिकांच्या घरांना लाखो रूपये खर्च रंगरंगोटी करण्यात आली आहे. बेकरीतून निघणाऱ्या धुरामुळे घरांची रंगंरगोटी काळवंडली आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या ग्रामस्थांना धुराचा सामना करावा लागतो. मुख्य वर्दळीच्या ठिकाणी धुराचे लोट निर्माण झाल्याने वाहनचालकांनादेखील नाका-तोंडावर रूमाल ठेवून जावे लागते. त्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या अनधिकृत डेली फे्रश बेकरी चालकाने सदर प्रकल्पासाठी फायर ऑॅडिट केली नसल्याचे समोर आले आहे. भविष्यात या प्रकल्पामुळे जर आग लागलीच तर त्याचे परिणाम ग्रामस्थांना भोगावे लागतील. वित्तहानी व मनुष्यहानीला सामोरे जावे लागेल. साधारण दीड वर्षापूर्वी १६ एप्रिल २०१७ रोजी नायगाव कोळीवाडा येथील ग्रामस्थांनी महापालिकेच्या प्रभाग समिती आय चे प्रभारी साहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग आणि आयुक्तांना निवेदन देऊन सदरची अनधिकृत डेली फे्रश बेकरी ही कायमची बंद करण्याची मागणी केल होती. परंतु निवेदन देऊनही सदर बेकरीवर कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. त्यातून आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीवर हे ग्रामस्थ बहिष्कार टाकण्याच्या मनस्थित असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: