
नालासोपाराा(वार्ताहर) : शहरातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढते आहे आणि रस्ते कमी पडत आहेत. या लाॅक डाऊन परिस्थितीत सुद्धा वाहन वाढीचे प्रमाण कमी झाले नाही. घरा घरात छोटे मोठे वाहन आले आहे. मात्र वाहन पार्किंगचे नियम आणि जबाबदारीचे भान आले नाही.
प्रामुख्याने बेकायदा रिक्षा स्टॅण्ड, टेंपो तळ, आणि टुरिस्ट वाहने उभी असतात ते रस्ते विचारात घेऊन आता महापालिका प्रशासन आणि पोलीस ठाणी यांच्या वतीने वाहतूक कोंडीवर उपाय योजना करावी अशी मागणी येथील त्रस्त नागरिक आणि वाहनचालकांनी केली आहे.
महापालिकेने शहरातील अंतर्गत रस्ते-जोडरस्ते आणि तेथील वळणांवर ”नो पार्किंग” बोर्ड लावावेत. केवळ नो पार्किंग नव्हे तर दंडात्मक कारवाईचा इशारा देणारे ते असावेत. आणि सूचित करुनही जे वाहनधारक चुकीचे पार्किंग करुन उपद्रव निर्माण करणारे सापडतील त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी.
इथे एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की, केवळ वाहतूक कोंडी होते असे नाही तर चुकीचे पार्किंग अपघातांना निमंत्रण देत आहेत. या नागरी समस्या दूर करण्यासाठी संयुक्त कार्यक्रम हाती घेण्यात यावा. अशी मागणी करण्यात येत आहे.