महापालिकेने पोलिसांचे थकवले २ कोटी ७० लाख

 

वसई (वार्ताहर) : वसई-विरार शहर महापालिकेने पोलीस संरक्षणाची २ कोटी ६९ लाख रुपये थकविल्याचे उघड झाले आहे. पर्यावरण संवर्धन समितीतर्फे वसई तालुक्यातील पानथळ जमिनीवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी महापालिकेचे थकबाकी उघड झाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असतांनाही प्रशासन भुईगाव येथील सरकारी व पाणथळ जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत कारभार करणाऱ्या भूमाफियांवर कारवाई करीत नसल्यामुळे समीर वर्तक, मेकॅन्झी डाबरे मॅक्सवेल रोझ यांनी तहसीलदार कचेरीसमोर २ डिसेंबर पासून ‘आमरण’ उपोषणास सुरू केले आहे. पर्यावरण संवर्धन समितीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या या आंदोलनाला २५ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. तेव्हापासून अतिक्रमण दूर करण्यासाठी प्रशासनाने सात वेळा नोटिसा बजावल्या होत्या. मात्र त्यावर एकदाही कारवाई झाली नाही. त्यामुळे समीर वर्तक यांनी अधिक माहिती घेतली असता, अतिक्रमणविरोधी कारवाईला पोलिस संरक्षण मिळत नसल्यामुळे ठप्प झाल्याची माहिती त्यांना मिळाली. वसई-विरार शहर महानगरपालिकेने पोलीस खात्याचे जवळपास २ कोटी ६९ लाख रुपये अगोदरच्या बंदोबस्ताचे बिल थकीत आहे आणि जोपर्यंत हे बिल महानगरपालिका देत नाही तोपर्यंत पोलीस बंदोबस्त मिळणार नाही, अशी माहिती पोलीसअधीक्षक गौरव सिंग यांनी वर्तक यांना दिली.

त्यामुळे आंदोलकांनी आता नवीन मुद्दे उपस्थित केले आहेत. पाणथळ आणि कांदळवनातील जागेवरील अतिक्रमणे, हटविणे ही महसूल, महानगरपालिका आणि पोलीस यांची एकत्रित जबाबदारी असतांना महापालिकेच्या थकीत बिलाचा प्रश्न येतोच कसा? जर थकीत बिलाचा विषय पर्यावरण व कारवाई पेक्षा मोठा असेल तर महापालिका हे बिल का देत नाही? आणि पोलीस वसूल का करीत नाही? महापालिकेकडे पोलिसांना देण्यासाठी पैसे नसतील तर ‘महापौर मॅरेथॉन’ सारख्या महागडया स्पर्धा का ठेवत आहे? मॅरेथॉनच्या माध्यमातून महापालिका ‘निसर्ग समतोल पाळा’ आणि ‘हरित वसई” हा संदेश देत असेल तर पर्यावरणाचा अतिमहत्वाचा भाग असलेल्या पाणथळ जागा व कांदळवन वाचविण्यासाठी तसेच ही गिळंकृत करणाऱ्या भूमाफिया विरोधातील पर्यावरण संवर्धन समितीच्या आंदोलनाला महापालिका सहकार्य का करीत नाही ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: