महापौर चषक पालघर डिस्ट्रिक्ट अजिंक्यपद कॅरम स्पर्धा संपन्न

नालासोपारा (प्रतिनिधी) :  तथास्तु ग्रुप, नालासोपारा  व पालघर डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रतिष्ठेची तिसरी महापौर चषक अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष प्रौढ गट आणि पुरुष .सांघिक गटात अनुक्रमे शरीफ शेख,श्रृती सोनावणे (प्रगती कॅरम क्लब), नवीन पाटील (यंगस्टर्स ट्रस्ट) व समाज उन्नती मंडळ ‘ब’ संघ यांनी विजेतेपद पटकाविले. ही प्रतिष्ठित महापौर चषक अजिंक्यपद कॅरम स्पर्धा कपोल स्कुल, आचोळे रोड,नालासोपारा (पूर्व) जिल्हा पालघर येथे खेळविण्यात आली. माननीय लोकनेते श्री. हितेंद्रजी ठाकूर, वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर रुपेश जाधव, माजी उप-महापौर उमेश नाईक, पालघर डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितूभाई शहा आणि कार्याध्यक्ष पंकज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नीट आणि नेटक्या पध्दतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आली.

पुरुष एकेरीच्या अंतीम फेरीच्या सामन्यात बिनमानांकित प्रगती कॅरम क्लबच्या शरीफ शेखने आक्रमक व बचावात्मक खेळाचे प्रात्यक्षिक घडवित अग्रमानांकित वसईच्या प्रमोद शर्माविरूध्द पहिल्या गेममध्ये सहा बोर्डामध्ये 23-6 अशी आघाडी घेतली. नंतरचे दोन बोर्ड आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत 2 गुण मिळवून 25-6 असा पहिला गेम जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या गेमध्ये शरीफ शेख पाचव्या बोर्डपर्यंत आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत 22-7 अशी आघाडी घेतली. नंतरच्या दोन बोर्डात प्रमोद शर्माने 5 आणि 3 गुण घेऊन 15-असा पिछाडीवर होता. नंतरच्या आठव्या बोर्डमध्ये शरीफ शेखने शांत चित्ताने खेळत 3 गुण घेऊन 25-15 असा गेम जिंकून विजेतेपदावर आपल्या नावाचे शिक्कामोर्तब केले. विजेत शरीफ शेखला रु. 7,500/-, चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. उपविजेता प्रमोद शर्माला रोख रुपये 5,000/-, चषक व प्रमाणपत्रावर समाधान मानावे लागले.  तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात यंगस्टार्स ट्रस्टच्या आशुतोष गिरीने दोन गेम रंगलेल्या एकतर्फी सामन्यात प्रगती कॅरम क्लबच्या कैलाश वाघेलाचा 25-10, 25-11असा धुव्वा उडवित रोख रुपये 3,000/-, चषक व प्रमाणपत्र मिळविले.

तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यात शरीफ शेखने रोमहर्षक तीन गेम रंगलेल्या लढतीत यंगस्टार्स ट्रस्टच्या आशुतोष गिरीचा4-25, 25-12, 25-8 अशी कडवी झंज मोडीत काढत अंतीम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अग्रमानांकित वसईच्या प्रमोद शर्माने सरळ दोन गेम रंगलेल्या लढतीत प्रगती कॅरम क्लबच्या कैलाश वाघेलाचा 25-17, 25-3 अशी मात करत अंतीम फेरी गाठली.

महिला एकेरी गटाच्या अंतीम फेरीच्या दोन तास रंगलेल्या सामन्यात दुसरी मानांकित प्रगती कॅरम क्लबच्या श्रृती सोनावणेने यंगस्टार्स ट्रस्टच्या अंकीता हांडेचा 25-9, 25-17 अशी कडी झुंज मोडीत काढून विजेतेपदावर आपले नाव कोरीत रोख रुपये 3,000/- चषक व प्रमाणपत्र यांची मानकरी ठरली. उपविजेती अंकीता हांडेला रोख रुपये2,000/- चषक व प्रमाणपत्र यावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यंगस्टार्स ट्रस्टच्या अंकीता हांडेने अग्रमानांकित यंगस्टार्स ट्रस्टच्याच वैशाली तांबेचा रोमहर्षक तीन गेम रंगलेल्या लढतीत 25-10, 12-25, 25-4 असा ्श्चर्याचा धक्का देत अंतीम फेरी गाठली.

पुरुष सांघिक गटाच्या अंतीम फेरीच्या सामन्यात समाज उन्नती मंडळ’ब’ संघाने समाज उन्नती मंडळ ‘अ’ संघावर 2-1 असा निसटता विजय मिळवित अजिंक्यपदावर आपले नाव कोरले व रोख रुपये 3,000/-चषक व प्रमाणपत्र पटकाविले. उपविजेत्या समाज उन्नती मंडल ‘अ’संघाला रोख रुपये 2,000/-, चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विजेता समाज उन्नती मंडळ ‘ब’ संघ 1) स्वप्निल शर्मा (कर्णधार), 2)शरीफ शेख, 3) विनोद परमार, 4) परितोष बाबारिया, 5) ईस्माईल शेख, 6) अभिजित गमरे, 7) युगांत वाळिंजकर (संघ व्यवस्थापक)

या स्पर्धेत चार ब्रेक टू फिनिश व एक ब्लॅक टू फिनिश नोंदवले गेले.स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून श्री. परविंदर सिंग व तांत्रिक संचालक म्हणून आंतरराष्ट्रीय पंच श्री. जनार्धन संगम यांनी उत्कृष्ट संचलन केले.

या स्पर्धेत अंतरराष्ट्रीय दर्जाचे 24 सिसका चॅम्पियन फायटर कॅरम बॉडर्स व सिसका लेजंड कॅरम सोंगटया वापरण्यात आल्या.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पालघर डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी अध्यक्ष जितूभाई शहा, कार्याध्यक्ष पंकज ठाकूर, डॉ. सुशांत पवार-प्राचार्य कपोल स्कुल, मानद महासचिव राजेश रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली  गणेश फडके, सुशिल बांदिवडेकर-उपाध्यक्ष, महासचिव लक्ष्मण बारिया, परशुराम गांगल व इतर कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली.

रंगतदार बक्षिस समारंभाच्या कार्यक्रमाला वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर श्री. रुपेश जाधव, माजी उप-महापौर उमेश नाईक, नगरसेवक वैभव पाटील, एडव्होकेट रमाकांत वाघचौडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याप्रसंगी तथास्तु ग्रुपचे कमलाकर पाटील,जितूभाई मेहता, श्री. जनार्धन संगम-आंतरराषष्ट्रीय कॅरम पंच,सहकार्यवाह महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, राजेश रोडे-मानद कार्यवाह, गणेश फडके, सुशिल बांदिवडेकर-उपाध्यक्ष, लक्ष्मण बारिया-सहसचिव,पालघर डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन, व इतर मान्यवर उपस्थित होते. बक्षिस समारंभाचे सूत्रसंचान देवदास साटम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!