महाराष्ट्राची ‘राजकीय’ वाटचाल !  – योगेश वसंत त्रिवेदी

‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ म्हणून महाराष्ट्रात/मुंबईत प्रखर आंदोलन झाले. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली आणि १९५७ च्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने घवघवीत यश मिळविले. यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्र आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यात जर मला निवड करावयाची झाली तर मी पंडित नेहरुंचीच निवड करीन अशी भुमिका घेतली होती. सदोबा पाटलांपासून मोरारजींपर्यंत काँग्रेसवाल्यांचा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राला विरोध होता. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या हातात महाराष्ट्र गेला तर काँग्रेसचे काही खरे नाही, असा विचार करुन विदर्भ महाराष्ट्रात सामील करण्याचे पाऊल उचलण्यात आले. त्यावेळी विदर्भातल्या ६५ जागांपैकी काँग्रेसचे प्राबल्य जास्त असल्यामुळे यशवंतरावांनी विदर्भ महाराष्ट्रात घेऊन पंडित नेहरुंना ‘तोहफा’ च दिला. त्यामुळे १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्याचे यपुण्य’ पदरात पाडून घेत महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता स्थापित केली. योगायोग पहा की १९६० साली महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर आणि यशवंतरावांचा सह्याद्री पंडितजींच्या हिमालयाच्या मदतीला धावून गेल्यानंतरर मारोतराव सांबशिव कन्नमवार २१ नोव्हेंबर १९६२ रोजी आणि त्यानंतर वसंतराव फुलसिंग नाईक हे ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते मारोतराव आणि वसंतराव हे दोघेही विदर्भाचे होते. महाराष्ट्रात मराठवाडा आलेला होता आणि शंकरराव चव्हाण हे मराठवाडयाचे नेते. त्यांनी प्रादेशिक अस्मिता या मुद्यावरुन काँग्रेसच्या श्रेष्ठींकडे रेटा लावून २१ फेब्रुवारी १९७५ रोजी मुख्यमंत्रीपद पटकावले.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा १९६० साली मिळाला खरा आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानीही झाली खरी पण मुंबई महाराष्ट्रात असली तरी मुंबईत महाराष्ट्र नव्हता. कारण मुंबईची सर्व आस्थापने यांत मराठी माणसाऐवजी बिगर मराठी लोकांचीच भरती जास्त होती म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी ते स्वत: आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यंगचित्रकार असल्याने १३ ऑॅगस्ट १९६० रोजी संपुर्णपणे व्यंगचित्राला वाहिलेले व्यंगचित्र साप्ताहिक यमार्मिक’ या नांवाने सुरु केले आणि त्यात मुंबईतल्या मोठ मोठया आस्थापनांमधल्या अमराठी अधिकाऱ्यांची नांवे ठळक अक्षरात छापून त्यावर ‘वाचा आणि थंड बसा’ हे शीर्षक दिले. मुंबईतला मराठी माणूस त्यामुळे पेटून उठला. महाराष्ट्रात सत्ता काँग्रेसची होती. पण मराठी माणसाची संघटना असावी, असा विचार पुढे आला आणि १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र लढयातले प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी ३० ऑॅक्टोबर १९६६ च्या शिवसेनेच्या पहिल्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात ‘हा बाळ मी महाराष्ट्राला देत आहे’ असे म्हणत बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती शिवसेनेची सूत्रे सोपवली. शिवसेना हे नांव सुध्दा प्रबोधनकारांनीच दिले. मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि बाळासाहेबांचे संबंध चांगले होते. वसंतराव नाईक यांचीही हीच इच्छा होती की मराठी माणसांची संघटना असावी. त्यामुळे शिवसेनेला ‘वसंतसेना’ सुध्दा संबोधण्यात काही जाण धन्यता मानीत असत. संयुक्त महाराष्ट्र झाला असला तरी बेळगांव कारवार निपाणी

भालकी बिदर यांसह ८६५ मराठी भाषिक भाग हा कर्नाटकातच होता आणि बाबूराव ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रखर लढा उभारुन हा भाग महाराष्ट्रात आणण्यासाठी परिश्रम घेतले. इथे शिवसेना ही महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न हाती घेऊन पेटवायला निघाली होती. १९६९ साली शिवसेनेने प्रखर लढा उभारला आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते दत्ताजी साळवी आणि मनोहर जोशी यांना अटक झाली. मुंबई पेटली होती. अखेर वसंतराव नाईकांनी बाळासाहेबांना मुंबई शांत करण्यासाठी आवाहन केले. बाळासाहेब ठाकरे यांनी तुरुंगातून शांततेचे आवाहन केले आणि आंदोलन स्थगित झाले.

मुंबई महाराष्ट्रात काँग्रेस बरोबरच समाजवादी आणि जनसंघ शेतकरी कामगार पक्ष हेही चांगल्या स्थितीत होते. समाजवाद्यांचे प्रजा समाजवादी आणि संयुक्त समाजवादी असे पक्ष होते. १९६६ साली शिवसेना मुंबई ठाण्यात आली. मुंबई महापालिका निवडणुका १९६८ साली आल्या. १९६७ साली लोकसभेच्या निवडणुका होत्या. त्यात काँग्रेस बरोबर शिवसेना, समाजवादी, जनसंघ ही मैदानात उतरल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शेडयुल कास्ट फेडरेशन रिपब्लीकन पार्टी हे ही पक्ष होते. भाई श्रीपाद अमृत डांगे यांचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष होता.१९६७ साली शिवसेनेने काँग्रेसला ईशान्य मुंबईत मराठीच्या मुद्यावर स. गो. बर्वे यांना समर्थन दिले होते तर १९६८ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि प्रजा समाजवादी पक्षाची युती झाली. ठाण्यात शिवसेनेचे वसंतराव मराठे आणि सतीश प्रधानांनी जम बसविला होता.

१९७७ साली आणिबाणी नंतर राजकीय धृवीकरण होऊ लागले.१९७७ साली भारतीय जनसंघ, समाजवादी पक्ष, भारतीय लोकदल आणि संघटना काँग्रेस यांची जनता पार्टी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनानंतर स्थापन झाली. १९७१ च्या बांगला देश निर्मितीच्या वेळी इंदिरा गांधी यांनी घेतलेली भूमिका आणि मग त्यांची एकहाती राजवट त्याचे पर्यवसान आणिबाणीत झाले. आणिबाणीमुळे इंदिरा गांधींविरोधी असंतोष ऊफाळून आला आणि त्याचे रुपांतर सत्तापरिवर्तनात झाले. देशपातळीवर सत्तांतर झाल्यावर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले नाही तरच नवल. १९७५ साली शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांनी १९७७ साली काँग्रेस सोडून महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस स्थापन केला. शरद पवार यांनी समांतर काँग्रेस काढली. यशवंतराव चव्हाण आणि रेड्डी यांची चड्डी काँग्रेस, विदर्भातले नेते नाशिकरराव तिरपुडे आणि मुंबईतले बॅरिस्टर रामराव आदिक, पुण्याचे बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ हे इंदिरा गांधीं समवेत इंदिरा काँग्रेसमध्ये राहिले. १९७८ साली वसंतदादा पाटील आणि नाशिकराव निरपुडे यांच्या सरकारमधून राज्यमंत्री शरद पवार यांनी बाहेर पडून पुरोगामी लोकशाही दल स्थापन करीत जनता पार्टी, शेतकरी कामगार पक्षांना सोबत घेऊन वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी मुख्यमंत्रीपद पटकावले. शरद पवार हे महाराष्ट्राचे पहिले तरुण मुख्यमंत्री ठरले. पण दिल्लीतले सरकार पडताच महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले. महाराष्ट्राची धुरा बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले या इंदिरानिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या हाती गेली.

महाराष्ट्रात काँग्रेसी मुख्यमंत्र्यांचा पाळणा सातत्याने हालताच राहिला. बॅरिस्टर अंतुले यांच्यानंतर बॅरिस्टर बाबासाहेब भोसले, डॉ. शिवाजीराव निलंगेकर हे मुख्यमंत्री झाले. या दरम्यान काँग्रेसच्या बाहेर पडलेले नेते कासावीस होऊ लागले आणि यशवंतराव चव्हाण, शरद पवार, शंकरराव चव्हाण हे नेते स्वगृही परतले. फरक इतकाच होता की यशवंतराव चव्हाण यांना अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागला तर शरद पवार यांनी राजीव गांधी यांना औरंगाबादेत बोलावून जाहीर मेळाव्यात आपला पक्ष त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन केला.

१९८० साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर हळूहळू भाजपा आणि शिवसेना हे हिंदुत्ववादी पक्ष एकमेकांच्या जवळ आले.१९८९ साली प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भाजपा युती घडवून आणली. १९९० च्या निवडणुका शिवसेना भाजपा युती म्हणून लढवल्या आणि मग ही युती पुढे थेट २०१४ पर्यंत एकत्र होती. १९९२ च्या बाबरीच्या पतनानंतर शरद पवार केंद्रात संरक्षण मंत्री पदावरुन महाराष्ट्रात येण्यासाठी कासावीस झाले होते. कारण सुधाकरराव नाईक या बहाद्दर मुख्यमंत्र्यांनी त्यांची झोप उडवली होती.१९९३ च्या १२ मार्च रोजी झालेल्या बॉम्बस्फोट आणि तत्पूर्वीच्या दंगलीत परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचे खापर फोडून सुधाकररावांना पायउतार करायला लावले. शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत १९९० साली हुकलेली सत्ता १९९५ साली आली आणि पहिल्यांदा राजभवनाबाहेर शिवतीर्थावर १९ मार्च १९९५ रोजी डॉ. मनोहर गजानन जोशी यांनी मुख्यमंत्रीपदाची तसेच गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अरबी समुद्राला लाजवील असा जनसागर शिवतीर्थावर लोटला होता आणि अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे यांच्यासह दिग्गज नेते यावेळी हजर होते.

१९९९ ला मनोहर जोशी यांना बदलून बाळासाहेबांनी नारायण राणे यांना मुख्यमंत्री बनवले पण १९९९ साली लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणुक घेण्याची चूक नारायण राणे यांना महागात पडली. १९९९ साली विदेशी मुळ या मुद्यावर शरद पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केला. पण १९९९ साली काँग्रेस राष्ट्रवादी यांनी स्वतंत्र निवडणुका लढवूनही शिवसेना भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आघाडी केली. फाजील आत्मविश्वास आणि असुरी महत्त्वाकांक्षामुळे युतीची सत्ता गेली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या विलासराव देशमुख यांना पाठींबा दिला. १९७८ नंतर १९९५ -१९९९ मध्ये राज्याला दोन पक्षांच्या सरकारमुळे उपमुख्यमंत्री मिळाला. मग युती आणि आघाडी सरकारांमध्ये खात्यांचे विभाजनही झाले. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण अशी १५ वर्षे आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले. २०१४ साली देशात नरेंद्र मोदी नावाची लाट आली आणि देश व राज्य यांत सत्ता परिवर्तन झाले. दोन खासदारांपर्यंत पोहोचलेल्या भारतीय जनता पक्षाचे २८२ खासदार झाले आणि महाराष्ट्रातही २०१४ साली देवेंद्र फडणवीस हा दुसरा तरुण मुख्यमंत्री पहायला मिळाला. भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून २८८ च्या सभागृहात उदयाला आला. २०१४ साली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना भारतीय जनता पार्टी यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या होत्या पण सत्ता स्थैर्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समवेत तडजोड केली. २०१४ ते आजतागायत शिवसेना रिपब्लिकन पार्टी, शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पार्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची सत्ता राबवली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि उध्दव ठाकरे यांना एकत्रित आणून देवेंद्र फडणवीस यांनी १८ फेब्रुवारी २०१९ रोजी पुन्हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युती निश्चित केली. १९९७ साली नागपूरचे महापौरपद भूषविणारे देवेंद्र फडणवीस २०१४ ला थेट मुख्यमंत्री झाले आणि अल्पमतातले सरकार पाच वर्षे चालवून वसंतराव नाईकांनंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा विक्रम केला. योगायोग म्हणजे देवेंद्र फडणवीस हेही विदर्भाचेच.

याकाळात रिपब्लिकन पार्टी, समाजवादी पार्टी, एम.आय.एम, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असे अनेक पक्षही महाराष्ट्रातल्या राजकारणात आले. काही काळाच्या ओघात पुढे तर काही मागे गेले. आता एका पक्षाची राजवट हा प्रघात बहुधा मागे पडला आहे. कारण युती आणि आघाडी शिवाय तरणोपाय नाही. नंदमुरी तारक रामाराव उर्फ एन टी रामाराव यांनी तेलगु अस्मितेसाठी तेलगु देसम पक्ष स्थापन केला आणि ९ महिन्यात तो पक्ष सत्तेवर आला. पण मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेला महाराष्ट्रात सत्तेवर येण्यासाठी १९६६ पासून १९९५ साल उजाडावे लागले, तेही ४५ अपक्ष आणि भारतीय जनता पार्टीची सोबत घेऊनच. बाळासाहेबांच्या भाषेतच सांगायचे तर, ‘तुम्हाला तुमच्या नशीबाप्रमाणे तुमचे सरकार मिळते’ हेच खरे आहे ! जय महाराष्ट्र!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!