महाराष्ट्रात मतदारांच्या संख्येत तब्बल ३५ लाखांची वाढ 

मुंबई : रेनी अब्राहम
महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये गेल्या 15 दिवसांत तब्बल 35 लाख मतदार वाढले असून मुंबईत यातील सुमारे दोन लाख युवा मतदारांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने एक नोव्हेंबरपासून मतदारयादीचे पुनर्निरीक्षण करण्यास सुरूवात केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत ही वाढ झाली. राज्यात यापूर्वी एकूण 8.44 कोटी मतदार होते. यामध्ये 4.43 कोटी पुरूष तर 4.01 कोटी महिला मतदारांचा समावेश होता. त्यात आता 35 लाख मतदरांची भर पडली असून पुढे हा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या मतदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सध्या देशातली निम्मी लोकसंख्या 25 वर्षांखालील तरूणांची आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे.
मतदारयादीतल्या या भरमसाठ वाढीला मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही दुजोरा दिला आहे. महाराष्ट्रात नजीकच्या काळात 12.6 कोटी लोकसंख्या असेल असा अंदाज आहे. अशा वेळी मतदारांच्या संख्येत 35 लाखांची वाढ होणे चांगले आहे. यात बहुसंख्य नवे मतदार आहेत. चार जानेवारीपर्यंत म्हणजे मतदारयाद्यांचे पुनर्निरीक्षण संपेपर्यंत ही संख्या आणखी वाढेल, असे त्याने सांगितले.
एक नोव्हेंबर 2018 च्या आकडेवारीनुसार, नव्याने दाखल झालेल्या मतदारांमध्ये मुंबई शहरात 1349692 पुरूष तर 1109410 महिला मतदारांचा समावेश आहे. मुंबई उपनगरात नव्याने दाखल झालेल्या मतदारांमध्ये 3725323 पुरूष आणि 3092946 महिला मतदारांचा समावेश आहे. मुंबईप्रमाणे ठाण्यातही मतदारांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षित आहे. महाराष्ट्रात जास्त मतदार असलेल्या भागांमध्ये सध्या पुणे (7189265 मतदार), नाशिक (4260393), जळगाव (3293157), अमरावती (2334854), नागपूर (3873959), यवतमाळ (2038514), नांदेड (2406859), औरंगाबाद (2649641), अहमदनगर (3318555), सोलापूर (3226683), सातारा (2387877), कोल्हापूर (2965314), रायगड (2161614) आणि सांगली (2233831) यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!