महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाच्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व कार्यक्रमात २० गौरव पुरस्कारांची बरसात !

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाच्या विद्यमाने दादर येथील योगी सभागृहात आयोजित ऐतिहासिक आणि अभूतपूर्व कार्यक्रमात दोन विश्व गुजराती पुरस्कार, पाच भारत गौरव पुरस्कार आणि तेरा महाराष्ट्र गौरव पुरस्कार अशा पुरस्काराची गुणवंत आणि मान्यवर व्यक्तींना प्रदान करण्यात येत पुरस्काराची बरसात करण्यात आली. दोहे, छंद, सुगम संगीत आणि लोकगीते या कर्णमधुर कार्यक्रमाची रेलचेल असा भरगच्च कार्यक्रम महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे ऐंशी वर्षाचे तरुणांना लाजवतील असे झुंझार अध्यक्ष हेमराजभाई शाह यांनी आयोजित केला होता.  याच कार्यक्रमाच्या माध्यमातून हेमराजभाई शाह यांनी गुजराती बांधवांना मोठया संख्येने राजकारणात येण्याचा तसेच आपली कर्मभूमी असलेल्या मराठी भाषा शिकण्यासाठी प्रयत्न करण्याचा आग्रह आपल्या प्रास्ताविक मनोगतात बोलून दाखवला. इतकेच नव्हे तर गुजरात आणि महाराष्ट्र यांना जोडण्यासाठी यंदा महामंडळाच्या पुरस्कारांमध्ये चार महत्त्वाचे पुरस्कार मराठी मान्यवरांना प्रदान करण्यात येत आहेत.

महामंडळाने यंदा एकतीसाव्या पदार्पण केले असून महामंडळाच्या बैठका यापुढे जळगांव, नाशिक आदी शहरांतही आयोजित करण्यात येणार आहेत, असेही हेमराजभाई यांनी आवर्जून सांगितले. यावेळी ज्येष्ठ संगीतकार आनंदजी भाई शाह यांनी हेमराजभाई यांचे गौरवपूर्ण शब्दांत कौतुक करतांना सांगितले की, ”हेमराजभाई हे एक असे व्यक्तिमत्व आहे की जे एकटया हाताने अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करु शकतात आणि ऐंशीव्या वर्षीही ते चिरतरुण दिसतात, सदाबहार दिसतात.”ख्यातनाम अभिनेत्री सरिता जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त करतांना पुरस्कार/सन्मान हा कलाकारांसाठी एकप्रकारे प्रोत्साहन असते. मी या सन्मानात माझा स्वत: चा गौरव आणि आपुलकी समजते.

तारक मेहता का उल्टा चष्मा मधील जेठालाल गडा चे पात्र घराघरात पोहोचविणारे ख्यातनाम गुजराती अभिनेते दिलीप जोशी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ”सरिता जोशी यांनी मला व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्याची संधी दिली त्यामुळे मी माझी रंगभूमी आणि मालिका, चित्रपट या क्षेत्रात माझे अभिनय कौशल्य दाखवू शकलो. आज सरिता जोशी यांच्या समवेत मलाही मिळालेल्या पुरस्काराने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. असितकुमार मोदी यांनी मला तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत जेठालाल चे पात्र साकारण्याची संधी दिली यासाठी मी त्यांचा शतश: ऋ णी आहे.” असितकुमार मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ”तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे ५०० भाग झाले तेंव्हा आम्हा सर्वांचा समाजाने गौरव केला. दहा वर्षानंतर ही आमचा सन्मान करण्यात आला. कलाकारांचा सत्कार हा त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा ठरतो आणि त्याला भविष्यात काम करण्यासाठी आणखी जोमाने उत्साह मिळतो.” मोझाम्बिकहून आलेल्या रिझवान आडतिया यांनी सांगितले की,  ”माझ्यावर तयार करण्यात आलेला चित्रपट भारतातील ५०० चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्याच्या उत्पन्नाचा विनियोग रिझवान आडतिया फौंडेशनच्या माध्यमातून भारतातील ९० गावे दत्तक  घेण्यात येतील आणि त्या गावांचा विकास करण्यात येईल.”

महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळविलेल्या मान्यवरांच्या तर्फे बोलताना लोकमत वृत्तपत्र समुहाचे समूह संपादक दिनकर रायकर यांनी आपल्या भाषणात हेमराजभाई यांचा गौरव करतांना त्यांचा आणि माझा गेल्या पंचेचाळीस वर्षांपासूनचा मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे आवर्जून सांगितले. हेमराजभाई शाह यांनाही महाराष्ट्र शासनाने पत्रकार म्हणून अधिस्वीकृती पत्रिका दिली असून ज्येष्ठ पत्रकार या नात्याने त्यांचे सामाजिक कार्य अविरतपणे सुरु आहे. राज्य सरकारने त्यांची यथोचित दखल घ्यावी, असेही दिनकर रायकर यांनी आग्रहपूर्वक सांगितले.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी हेमराजभाई शाह यांनी महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाच्या माध्यमातून दोन्ही समाजांना जोडण्याचे विधायक कार्य केले आहे जे गौरवास्पद आहे, अशा शब्दांत हेमराजभाई यांचे कौतुक केले. या समारंभात रिझवान आडतिया (मोझाम्बिक) आणि सिराज अणदाणी (लंडन) यांना विश्व गौरव पुरस्कार, पद्मश्री आणंदजी वीरजी शाह, पद्मश्री सरिता जोशी, अभिनेते दिलीप जोशी, निर्माते दिग्दर्शक असितकुमार मोदी आणि नागपूर चे वीरेन ठक्कर यांना भारत गौरव, त्याचप्रमाणे लोकमत समूहाचे दिनकर रायकर, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, अभिनेत्री निवेदिता सराफ, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधे मंगेश कर्णिक, दिलीपकुमार लखी,  गायनाकॉलॉजिस्ट डॉ. मेघना सरवैया, लोकगायक चेतन गढवी, टी व्ही ९ च्या पत्रकार नीरुबेन झिंझुवाडिया आडेसरा, अरुणभाई मुछाळा, उद्योगपती अरविंद मेहता,  हिरालाल मृग, भरत लक्ष्मीचंद दौलत आणि येवल्याचे माजी नगराध्यक्ष नीलेश पटेल यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

दिलीप रावळ यांनी सूत्रसंचालन केले.  या समारोहात लोकगायक चेतन गढवी आणि विक्रम निझामा यांच्या लोकगीतांचा तसेच डायरो या कार्यक्रमाने सांस्कृतिक वातावरण तयार झाले. पुणे, महाड, सांगली, नांदेड, जळगाव, सोलापूर, चोपडा, श्रीरामपूर, नाशिक आणि नागपूर येथील प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!