महाराष्ट्र प्रांत : स्थलांतर

महाराष्ट्राच्या भोगोलिक रचनेप्रमाणे महाराष्ट्राचे दोन प्रमुख विभाग पडतात. यात किनारपट्टीचा कोकण व दुसरा भाग म्हणजे पठारावरील देश. महाराष्ट्राच्या विविध राज्यांत, प्रदेशांत असलेल्या विविध लोकसमूहांत, वर्गांत असणारी विविधता व त्यांत असणारी एकात्मता हा नेहमीच चिंतनाचा विषय म्हणून पुढे आलेला आहे. यात असणारी प्रादेशिक वैशिष्ट्ये, भोगोलिक रचना विविधता, रीतिरिवाज, समाजरचना यावर आधारित एकमेकांत असणारे समज, विचार, अपसमज आजही प्रचलित आहेत. महाराष्ट्रातील निरनिराळ्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांची जी स्वभाव वैशिष्ट्ये मानण्यात येतात ती प्रामुख्याने तेथील भोगोलिक वैशिष्ट्यांशी अत्यंत जवळीक साधून असतात, यात विविध कालखंडात झालेली स्थलांतरे लक्षात घेणे गरजेचे आहे. पुरातत्वीय दृष्टीकोनातून महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास इ.स पूर्व २००० वर्ष इतका मागे जातो. याच पुरातत्व बाबींतून महाराष्ट्रात रितीरिवाजांचा व काही सणांचा पाया कसा रचला गेला याची कल्पना मांडता येते. यात शेती व्यवसाय, पशुपालन, दगडी हत्यारे, मडकी भांडी इत्यादी बाबींचा विचार ध्यानात घ्यावा लागतो. महाराष्ट्रातील सांस्कृतिक जडणघडणीत अनेक धर्मांचा, विविध समूहांचा, अनेक स्थलांतरित मानव गटांचा, परकीय व्यापारी व आक्रमक वर्गांचा महत्वपूर्ण सहभाग होता हे अनेक उदाहरणांतून दिसण्यात येते. इ.स पूर्व २००० च्या कालखंडात कर्नाटक व आंध्रमधून नवाश्मयुगीन संस्कृतीचे लोक महाराष्ट्र प्रांती आले व त्यांनी दक्षिण, मध्य महाराष्ट्रात आपल्या वसाहतीत प्रारंभ केला. १६०० च्या सुमारास मध्य प्रदेशातून विशेषतः मावळा विभागातून मावळा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात आले व त्यांनी भीमा, कृष्णा, तापी, गोदावरी, प्रवरा, घोड इत्यादी नद्यांच्या खोऱ्यात आपल्या संस्कृतीची बीजे रोवली. यातच महाराष्ट्रामध्ये नवाश्मयुगीन व ताम्रयुगीन संस्कृतीचा मिलाफ घडवला गेला. शेती व्यवसायात उपयुक्त असणारी पाट बंधाऱ्याचीही योजना याच लोकांनी महाराष्ट्रात प्रथम अंमलात आणली असे अभ्याकांचे मत आहे. यात जलमार्ग वाहतूक हे मुख्य साधन लक्षात घेणे गरजेचे आहे. या सर्व स्थलांतरांचा प्रवास पाषाण युगातून धातूयुगाकडे झाला. इ. स पूर्व १२०० किंवा त्या आधी जोर्व या ताम्रयुगीन संस्कृतीचा विचार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात तांब्याची उपलब्धी फारशी नसल्याने मावळा आणि जोर्व या संस्कृतीच्या लोकांना राजस्थानशी संबंध ठेवणे अपरिहार्य होते. इ.स पूर्व सुमारे ६००-७०० च्या सुमारास महाराष्ट्रातील हवामानात झालेला बदल म्हणजे पावसाचे प्रमाण कमी व त्याजोगे शेतीचे उत्पन्न कमी. एकंदरीत या सर्वांचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील लोकजीवन संपूर्णपणे विस्कळीत होऊन मानवी वसाहतींचे स्थलांतर व विस्कळीतपणा वाढत गेला.

इ.स पूर्व १०००-७०० कालखंडात महाराष्ट्रात महापाषाण संस्कृतीचा उगम महत्वाचा भाग ठरतो. या संस्कृतीस महापाषास संस्कृती असे नाव असले तरीही या संस्कृतीत लोखंडाचा वापर अधिक प्रमाणावर करीत असत. तांब्यापेक्षा लोखंड हे टणक असल्याने लोखंडी आयुधांच्या साह्याने महापाषाणयुगीन लोकांनी तग धरल्याने ताम्रपाषाणयुगीन वसाहतींचा वेगाने पाडाव होण्यास सुरुवात झाली. इ. स पूर्व चौथ्या आणि तिसऱ्या शतकात महाराष्ट्र प्रांतांच्या भूभागावर मौर्य साम्राज्याचा प्रभाव दिसण्यात येतो. सम्राट अशोकाने महाराष्ट्र व अपरांत उत्तर कोकण यासाठी विशेष धर्मरक्षक नेमलेले होते हे अनेक संदर्भातून स्पष्ट झालेले आहे. यातच उत्तर कोकणातील शुर्पारक नालासोपारा हा प्रांत पुरातत्वीय दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. मौर्य साम्राज्यानंतर सातवाहन या राजघराण्याचे इ.स पूर्व पहिल्या दुसऱ्या शतकापासून ते इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत सातवाहनांचे योगदान महत्वपूर्ण ठरते. सातवाहन कालखंडातील लेणी निर्मिती, व्यापारी राजमार्ग, शेती व्यवसायातील बदल, मोठ्या नगरांची निर्मिती, तटबंदीयुक्त व्यापारी नगररचना, शालिवाहन शकाची सुरुवात, विविध आर्थिक घडामोडी व नाण्यांचा प्रसार इत्यादी बाबींचा महाराष्ट्रातील सर्वच वसाहतींवर विशेष प्रभाव पडला.

संदर्भ लेख महाराष्ट्र संस्कृतीची जडणघडण पृ ४९, महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास पृ ९५ :

संकलन लेखनसीमा : श्री श्रीदत्त राऊत किल्ले वसई मोहीम परिवार : ९७६४३१६६७८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!