महिलांचा सुरक्षेपेक्षा सुखकर रेल्वे प्रवास व्हावा – डॉमनिका डाबरे

वसई  (वार्ताहर) :  प्रवाशांना प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने भरपूर कामे केली तरीही त्यातील उणीवा दूर झाल्या नसल्याचे म्हणत आमच्या मनातील वेदना संवादाच्या माध्यमातून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांसमोर मांडण्यासाठी रेल्वे प्रवासी वेल्फेर सोसायटीने व्यासपीठ उपलब्ध करुन दिले ही चांगली बाब असल्याचे  वसई जन आंदोलनच्या नेत्या डोमणिक डाबरे यांनी म्हटले. वसई रोड येथे शनिवार दि. १७ नोव्हें. १८ रोजी रेल्वे प्रवासी वेल्फेर सोसायटी व रेल्वे सुरक्षा बल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘रेल्वे महिला सुरक्षा संवाद’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महिला मोठ्या संख्येने रेल्वेचा प्रवास करतात. मध्य रेल्वेने डबे वाढवले मात्र पश्चिम रेल्वेने महिलांचे डबे अजुन वाढवले नाहीत हा भेदभाव का असे म्हणत गेली अनेक वर्षे महिलांचा एकच प्रथम श्रेणी  डब्बा आहे त्यात विद्यार्थी, वृद्ध यांचाही भरणा असतो.  पुलांवर इंडिकेटर वर गाड्यांच्या वेळापत्रकांचा गोंधळ नेहमीच असतो. प्रवासादरम्यान प्रवासी खाली पडला तर पोलिसांनी आपुलकी दाखवावी. कामाच्या वेळेपेक्षा रेल्वे प्रवासातच जास्त वेळ जात असल्याचे म्हणत महिलांचा सुरक्षेपेक्षा सुखकर प्रवास व्हावा अशी अपेक्षा डॉमनिका डाबरे यांनी व्यक्त केली. रेल्वे सुरक्षा बलचे असि.सेक्यूरिटी कमिशनर ईश्वर सिंग यांनी रेल्वे हेल्पलाईन नं.१८२ बाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. आम्ही अवेरनेसचे कार्यक्रम घेतो मात्र महिला हवा तसा प्रतिसाद देत नसल्याचे म्हणत प्रवासादरम्यान मदत हवी असेल तर वरील नंबरवर फोन करुन आपले लोकेशन व बोगी नंबर सांगावा म्हणजे पुढील स्थानकात पोलिस मदत मिळू शकेल असे ते म्हणाले. डीआरयूसीसी सदस्य तथा रेल्वे प्रवासी वेल्फेर सोसायटीचे अध्यक्ष शेखर धुरी म्हणाले की, महिला प्रवाशांची संख्या जास्त आणि गाड्यांना डब्बे कमी असल्याने त्यात गेली सहा वर्षे वसई रोड येथून सुटणारी महिला विशेष लोकल विरार येथून सोडण्यात आली यामुळे येथील महिलांच्या समस्येत भर पडली. त्याही आमच्या भगिनी असून त्या गाडीला आमचा विरोध नसल्याचे म्हणत रेल्वे प्रशासनाने वसई रोड – चर्चगेट नविन महिला लोकल सुरु करावी यासाठी आम्ही पाठपुरावा करीत असून लवकरच एका शिष्टमंडळासह रेल्वे मंत्री पियूष गोयल यांची भेट घेणार असल्याचे शेखर धुरी म्हणाले.
अण्णासाहेब वर्तक कनिष्ठ महाविद्यालयाच्या एनएसएस च्या विद्यार्थी विद्यार्थिनींना यावेळी मान्यवारांच्या हस्ते  प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
झेडआरयूसीसी सदस्य कैलास वर्मा, रेल्वे प्रवासी वेल्फेर सोसायटीचे चेअरमन फेनिल मेहता व संस्थापक अध्यक्ष भूपेंद्र दोशी, चिटणीस विजय माने,  जीआरपी वसई रोडचे इन्चार्ज संतोष कुमार जीआरपी वसई रोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चौगुले, महिला पोलिस शिपाई जयश्री बोराळे व राजेश्री तायडे यांनी मार्गदर्शन केले.
रेल्वे प्रवासी वेल्फेर सोसायटीच्या चेयरमेन पदी निवड झाल्याबद्दल फेनिल मेहता यांचा शेखर धुरी व ईश्वर सिंग यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
उपस्थित प्रवासी महिला व तालुका पुरवठा विभागाच्या कलावती पाटिल, ठाणे वन विभागाच्या नीता मानकर, मा. नगरसेविका सिमा काळे, मदीना वस्ती स्तर संघाच्या फरझाना शेख आदींनी समस्या मांडल्या.
भाजप महिला मोर्चाच्या कांचन झा यांनी आपल्या प्रस्तावनेत प्रवासी महिलांच्या समस्यांकडे आरपीएफ व जीआरपीच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. भाजप ओबीसी महिला मोर्चाच्या योगिता पाटिल, भाजप ववि जि. महिला मोर्चाच्या मंदाताई धाडवे, देशमुख, एड. अशफाक हुसैन,  वसईचा आवाजचे संपादक जमील पटेल आदि मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन ववि जिल्हाध्यक्षा भाजप महिला मोर्चाच्या आम्रपाली साळवे यांनी तर शीला अय्यर यांनी उपस्थित पाहूण्यांचे आभार मानले. यावेळी प्रवासी महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी, वृद्ध महिला, अपंग महिला प्रवासी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या मोहिमेस महिला प्रवाशांसोबतच महिला पोलिसांनीही प्रतिसाद देत आपल्या समस्या मंडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!