महिलांनी मोबाईलचा वापर स्वरक्षणासाठी करावा – आमदार प्रा.डॉ.मनीषा कायंदे

ठाणे  : भारतातील प्रत्येक शहर प्रगती साधत असताना एक भयानक समस्या भेडसावत आहे ती म्हणजे महिलांची असुरक्षितता. खास करून नावाजलेल्या शहरांमध्येच म्हणजेच  मुंबई ,नवी मुंबई, ठाणे- पुणे अशा शहरांमध्ये महिला असुरक्षित आहेत. महिलांची सार्वजनिक ठिकाणी छेड काढणं, बलात्कार, रेल्वे व बसमध्ये विनयभंग , कामाच्या ठिकाणी छेडछाड यासारख्या विकृत घटना वारंवार होताना आढळत आहेत व कालच कल्याण येथील सरकारी कार्यालयात घडलेल्या एका विकृत घटनेने महिलांच्या सन्मान व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मालमत्ता कर भरण्यास मुदत वाढवून देण्यासाठी व मालमत्ता कराची रक्कम कमी करून देण्यासाठी लाच म्हणून ३० वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या कल्याण डोबिंवली महानगर पालिकेचा लिपिक रमेशचंद्र लक्ष्मण राजपूत (वय ४८) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली. या घटनेचा मी एक लोकप्रतिनिधी म्हणून निषेध तर करतच आहे परंतु समाजातील ही वाढणारी नीच प्रवृत्ती वेळीच ठेचून काढली नाही तर महिलांवरील अत्याचाराचे सत्र असेच सुरु राहील. याविषयी अधिक माहिती देताना शिवसेना प्रवक्त्या व आमदार प्रा. डॉ मनीषा कायंदे म्हणाल्या , “आजमितीला भारतामध्ये स्मार्ट फोनची चलती आहे,शहरात व गावातील महिलांकडे आजकाल स्मार्टफोन दिसू लागले आहेत. आज माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे ” वूमेन्स सेफ्टी ” म्हणजेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक अँप्स मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत.
काही अँप्स हे आपल्या  ओरडण्याचा किंवा किंचाळण्याचा आवाज ऐकल्यावर काहीतरी धोका आहे हे लगेच ओळखतात आणि ऑटोमॅटिकपणे ऍक्टिव्ह  होऊन  संकटकाळी तुमच्या कॉन्टॅक्सना तुमचे लोकेशन पाठवतात. महिलाने अनोळखी ठिकाणी गेल्यावर आपले लोकेशन आपल्या नातेवाईकांना पाठवावे तसेच अपरिचित व्यक्तीशी बोलत असताना जर तुम्हाला काही संशय आला तर ते संभाषण रेकॉर्ड करावे. काही उपयुक्त  मोबाईल अँप्स हे इमर्जन्सीचे बटण दाबल्यावर तुमचे जीपीएस लोकेशन सोबत इमेल आणि टेक्स्ट मेसेज देखील तुमच्या कॉन्टॅक्सना पाठवला जातो. जोवर तुम्ही हे बंद करत नाही तोवर हे अँप्स  कॉन्टॅक्सना अपडेट देणं सुरूच ठेवतं.अनेक अँप्स तुम्हाला आसपासची पोलीस स्टेशन्स आणि हॉस्पिटलची देखील माहिती देते. या व्यतिरिक्त हे अँप्स महिलांना सेल्फ डिफेन्सच्या टिप्स देखील पाठवत असते. स्त्रियांची सुरक्षा ही सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. स्त्रियांवरील अत्याचार कधी थांबणार हे साक्षात ब्रह्मदेव पण  सांगू शकणार नसला तरी आता मात्र स्त्रियांनीच स्वत:ची सुरक्षा स्वत: घेण्याची वेळ आली आहे.” 
या लिपिकाला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करणार असून यामुळे अशा नीच प्रवृतींना आळा बसेल अशी माहिती यावेळी आमदार प्रा डॉ मनीषा कायंदे यांनी दिली.  प्रत्येक घरात आई, मुलगी, बहीण अशी नाती असतात. तरीही समाजात वावरत असताना अन्य महिलांना तसा सन्मान आणि सुरक्षा देण्यात आपण कमी का पडतो याचे उत्तर कदाचित आपणास भेटणार नाही परंतु आजची महिला ही हतबल नाही ती प्रत्येक गैरकृत्याला विरोध करणार हा संदेश समाजात गेला पाहिजे तरच महिलांवरील अत्याचार कमी होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!