मांडलेल्या चिकित्सेच्या नव्या पर्वाचा ; एक संवाद – डॉ.श्रीदत्त राऊत 

आजवर इतिहासाची पाने उलगडत असताना त्यातील सनावली, मोडी पत्रे, ऐतिहासिक घटनास्थळ, उपलब्ध अवशेष, परकीय वर्णने इत्यादी माध्यमातून इतिहास पारखला जाणे ही सर्वसामान्य पध्दत ! किंबहुना मी सुध्दा याच नजरेने मार्गक्रमण करीत आहे. शिवशौर्य ट्रेकर्स मुंबई आयोजित दिनांक १७ मे फेसबुक live माध्यमातून मात्र “ऐतिहासिक साधनांतील विज्ञान प्रमेय” ही नवीन ओळख झाली. सादरीकरण व संकलनकर्त्या श्रीमती दिव्या वराडकर मुंबई ! ऐतिहासिक साधनांच्या उपलब्ध अवशेषांचे वैज्ञानिक दृष्टीकोनातून करण्यात आलेले परीक्षण हे पूर्णपणे एकमेव पहिले होते यात शंका नाही. जुन्या यंत्र विज्ञानाच्या जगात आपण सर्व जण कमीअधिक प्रमाणात वावरलो आहोतच. पण जुन्या ऐतिहासिक वस्तू मधील विज्ञानाची कसोटी आपण आजवर पूर्णपणे दुर्लक्षित केलेली आहे यात शंका नाही. विशेषतः कालच्या विज्ञान संवादात फक्त त्या वस्तूची ओळख महाराष्ट्र प्रांताच्या घडामोडी पुरती मर्यादित न ठेवता इतर देशातील त्या मागील १६ व्या, १७ व्या, १८ व्या शतकाच्या उंबरठ्यावर घडलेल्या बदलांचा मागोवा मांडण्यात आला हे विशेष. यातील होकायंत्र बाबत नेमके काय लिहू हेच उमगत नाही.

होकायंत्र बाबत संकलन व माहिती या दोन्ही स्थरावर एक भक्कम उंची गाठण्यात आलेली आहे. यातील संग्रहात विविध अडकित्ते, अस्सल मोडी लिपी पत्रे, वजन मापे, होकायंत्र प्रकार, दगडी शिवलिंग, जुनी नाणी इत्यादी सर्व वस्तू मार्गदर्शन ठरल्या विज्ञान भूमिकेतुन. सदर विज्ञानाच्या कसोटीवर पुरावे दर्शक नकाशे, आराखडे अत्यंत उपयुक्त ठरतीलच. ऐतिहासिक वस्तूंच्या मागील इतिहास अनेकांनी मांडलेला, अभ्यासलेला आहेच मात्र त्या प्रत्येक गोष्टी मागील विज्ञान चिकित्सा ही या निमित्ताने नवीन दिशा उपलब्ध करणारी ठरेल यात शंका नाही. या मार्गदर्शनात संकलित करण्यात आलेल्या वस्तूंची विविधता नक्कीच कौतुकास्पद आहे पण त्याहून त्यामागे संकलित व संशोधित करण्यात आलेली माहिती अत्यंत मोलाची आहे हे प्रामाणिकपणे विशेष नमूद करणे आवश्यक आहे.

शिवशौर्य ट्रेकर्सने नेहमीच नव्या पाऊलखुणाना अत्यंत प्रामाणिकपणे संधी दिलेली आहे व यापुढेही त्यांची वाटचाल प्रगतीमय राहील यात शंका नाही. दिव्या वराडकर यांच्या चिकित्सक व संग्रहक परिश्रमाबाबत त्यांचे नक्कीच अभिनंदन आहे. विज्ञान बोलके असते, विज्ञान शोधही घेत असते, विज्ञान थांबत नसते ! हे लक्षात घेऊन सर्वभक्षी काळाच्या प्रवाहातुन मांडलेला हे यज्ञ विज्ञान विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना निश्चितच नवा आदर्श मिळवून देईल असा विश्वास वाटतो. अनेकदा एका चांगल्या ज्ञान प्राप्ती नंतर त्यावर व्यक्त होणे आणि संवाद साधणे महत्वाचे असते, किंबहुना आपल्या ज्ञान वृद्धीचाच तो एक प्रवास असतो. या भूमिकेतून इतिहास व विज्ञान या दुहेरी प्रवासाच्या नव्या चिकित्सक पर्वाबाबत जे काही अनुभवले ते विद्यार्थी या भूमिकेतून आपल्या पुढे या लेखाच्या माध्यमातून व्यक्त केले. सर्वांना शुभेच्छा व आशीर्वाद.

लेखनसीमा : डॉ श्रीदत्त राऊत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: