मांडवी कोट संवर्धन ठरणार पालघर जिल्ह्यातील संवर्धनाचा आदर्श

वसई : पालघर जिह्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी आदर्श ठरलेल्या किल्ले वसई मोहीम परिवाराने नेहमीच संवर्धनाच्या नव्या पध्दती व ठोस उपाययोजना पुढे आणलेल्या आहेत. किल्ले वसई मोहिमेचे अभ्यासक व उत्तर कोकणचे मार्गदर्शक डॉ.श्रीदत्त राऊत यांनी गेल्या काही वर्षांत गडकोटांच्या संवर्धनाचा अनुभव व जबाबदारी यांचा विचार करून पालघर जिल्ह्यातील प्रत्येक गडकोटांच्या संवर्धनाचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतलेले आहेत.  गेल्या सहा महिन्यात यातील एकूण सहा गडकोटांच्या संवर्धनाचा आराखडा निश्चित केला गेला. यातील गेल्या केवळ दोन महिन्यात तब्बल ४० हुन अधिक श्रमदान मोहीम झालेल्या मांडवी कोटाचे बदलते रूप समस्त स्थानिक, दुर्गमित्र, अभ्यासक, संशोधक यांच्या कुतूहलतेचा विषय होणार यात आता शंकाच नाही.

आजवर किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत सन २००३ ते २०१९ या प्रदीर्घ कालावधीत मुख्य प्रवेशद्वार, मर्ुत्या संवर्धन, अंतर्गत भागातील काही झाडी यांची नियमितपणे स्वच्छता करण्यात येत होती. यातच अवशेष नोंदणी, इतिहास सफर, दीपावली दीपपूजन व मानवंदना, विजयदिन, नकाशा रेखाटने, पहिला राष्ट्रध्वज मानवंदना याद्वारे मांडवी कोट सातत्याने जिवंत ठेवण्यात आला. यंदाच्या डिसेंबर २०१९ व जानेवारी २०२० मांडवी कोटाच्या संवर्धनाची बदलण्यात आलेली दिशा पाहता मांडवी कोटास जीवनदान मिळाले आहे असे म्हणणे योग्य राहील. स्थानिक दुर्गमित्र सुनिल सदाशिव ऐवळे उसगाव व निलेश गुरव विरार यांनी मोहिमेच्या नियोजनात सक्रिय योगदान दिले. विशेष म्हणजे राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय सहभागी होत सातत्याने श्रमदान मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. या तिघांनी विचारविनिमय करून मांडवी कोटाच्या संवर्धनासाठी सर्वोतोपरी कष्ट घेतले. ऐतिहासिक मांडवी कोटाच्या संवर्धनाचा विचार करताना मुख्य प्रवेशद्वार, आधारस्तंभ, चार बुरुज, मुख्य प्रवेशद्वारातील मूर्ती संग्रह, मुख्य तटबंदी, सध्या उपलब्ध (वावर असणाऱ्या) प्रवेशद्वाराच्या उजव्या अंगास असणारे अवशेष, किल्ल्याच्या तटबंदीतील कोरीव शिळा, तलावात बंदिस्त झालेल्या जुन्या शिळा, सदरेचा उंचवटा, सध्या कोटाच्या अंतर्गत भागातील मातीचा व रुतलेल्या दगडांचा मलबा, सध्या संवर्धन करण्यात आलेले तीन बुरुज, अष्टकोनी बुरुजाची पुर्नबांधणी, किल्ल्याच्या प्रवेशद्वारात असणारी नवीन झोपडी बांधकामे व घाण स्वच्छता, किल्ल्याच्या सध्याच्या प्रवेशद्वारातील काटेरी झुडुपे व बांबू झाडी, किल्ल्यावर होणारे अतिक्रमणावर उपाययोजना इत्यादी अनेक बाबींचा समावेश होतो. विशेष म्हणजे वरील यादीतील बहुतेक कामे गेल्या दोन महिन्यात अत्यंत मेहनतीने पूर्ण करण्यात आलेली आहे.

आजवर प्रकाशित पुस्तकांत नामशेष म्हणून गणण्यात आलेला मांडवी कोट पुन्हा त्यात अभिमानाने उभा करण्याचे ध्येय पूर्ण होताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यात दर शनिवारी रविवारी व जमलेच तर रोज सायंकाळी स्थानिक मुली मुले यांच्या अत्यंत मोलाच्या सहकार्याने व प्रत्यक्ष सहभागाने एक आदर्श निर्माण झालेला आहे. एके ठिकाणी वाढत्या पाश्चिमात्य संस्कृतीचे वारे व दुर्गसंवर्धनातील प्रतिकूल परिस्थिती असताना मांडवी गावातील शालेय विद्यार्थी तनिषा साळकर, जयेश हरवटे, प्रसाद काटेस्कर, वेदांत दळवी, भार्गवी दळवी, हर्षाली साळकर, सुश्मिता खानजोडे, श्वेता साळकर, तन्मय पाटील, भाविक यांनी दुर्गसंवर्धनात मोलाचा सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे आपल्या शालेय अभ्यास सांभाळून व आपल्या आई वडिलांचे सहकार्य घेऊन सदर स्थानिक विद्यार्थी मांडवी संवर्धनासाठी आपल्या बालपणातील अमूल्य वेळ देत आहेत. तसेच आपल्या भागातील इतर विद्यार्थी मित्रांनाही सदर उपक्रमात सहभागी करण्यासाठी स्वत:हुन माहिती देत आहेत. गेल्या काही संवर्धन मोहिमेत सदर विद्यार्थी मित्रांनी सकाळी ७ ते सायकांळी ६ वाजेपर्यंत अविरतपणे स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. शालेय जीवनातील आपल्या पाल्यांना किल्ले संवर्धनासाठी पूर्ण सहकार्य करणारे सदर विद्यार्थी मित्रांचे आई वडील सुध्दा तितकेच कौतुकास पात्र आहेत. या विद्यार्थी मित्रांच्या समूहात मुलींचा सहभाग मोठया प्रमाणावर आहे हेही विशेषच. आगामी काळातील मांडवी कोट संवर्धनाचा सविस्तर तपशील लेखी प्रकाशित होणार आहे. मांडवी कोटाच्या संवर्धनासाठी युवा शक्ती प्रतिष्ठानचे प्रमुख प्रशांत सातवी यांनी सदर उपक्रमास प्रत्यक्ष पाहणी भेट देऊन आवश्यक बाबींचा तपशील लक्षात घेतलेला आहे. मांडवी कोटाच्या प्रतिकूल व्यापक संवर्धनासाठी लवकरच सर्व पातळीवर सहकार्य करण्यासाठी युवा शक्ती पुढाकार घेणार असल्याचे नियोजन सुरु करण्यात येत आहे. कोणतीही आर्थिक मदत न घेता केवळ दुर्गसंवर्धन श्रमदानातून करण्यात आलेला हा बदल पालघर जिल्ह्यातील संवर्धनाचा आदर्श ठरणार असा विश्वास वाटतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!