‘माऊली’ कथासंग्रह हा नात्यांना आपुलकीच्या लोणच्यात कसं मुरवयाच्या सांगणाऱ्या – डॉ.पल्लवी बनसोडे

वसई : सुनील मंगेश जाधव  यांच्या डिंपल पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ‘माऊली’ कथासंग्रहाचे प्रकाशन शनिवार दिनांक १२ जानेवारी१९ ला समाज उन्नती मंडळ हॉल,माणिकपूर वसई येथे वसई विरार शहर महानगर पालिकेचे महापौर माननीय श्री. रुपेशजी जाधव यांच्या शुभहस्ते शानदार सोहळ्यात प्रकाशित झाला.
लेखक सुनील जाधव यांच्या कथासंग्रहात दहा कथा आहेत. माऊली या नात्याभोवती सर्व कथा केंद्रित झाल्या आहेत. कोवळ्या संस्कारक्षम मुलांवर योग्य वेळीच संस्कार करून त्यांच्या विविध समस्यांवर मात करून दुर्दम्य आशावाद कसा निर्माण करता येईल ते या कथांतून स्पष्ट होते. बालकांचे बालपण, विविध सामाजिक कौटुंबिक समस्या, पालक पाल्यातील नातेसंबंध, जिद्द, चिकाटी असे सकारात्मक दृष्टिकोन रेखाटताना सर्व वाचकांना प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. कथांची मांडणी,त्यातील लालित्यपूर्ण भाषा, सामाजिक तळमळ व सर्व स्तरावरील वाचकांचे भावविश्व साकारले आहे.
 सुनील जाधव हे उमरोळी- पालघर येथील रहिवासी असून गेल्या २६ वर्षापासून जी. जे. वर्तक विद्यालय, वसई रोड येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या पुस्तकाला डॉ.पल्लवी बनसोडे यांची प्रस्तावना लाभली आहे. आतापर्यंत जाधव यांचे चार कथासंग्रह प्रकाशित झाले असून सर्व पुस्तकांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
प्रकाशन सोहळ्यात प्रकाशक अशोक मुळे यांनी प्रस्तावना केली. या वेळी मा. संदेश जाधव, अभिनेत्री ज्योती निसळ, पी. एन. आरोटे सर, वसंत जाधव, जोसेफ  फरोझ, उज्वला किनी या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.डॉ.पल्लवी बनसोडे यांनी आपल्या भाषणात सांगीतले की जाधवांच्या पुस्तकात सहज,सुंदर,सोपी जवळची आणि आपुलकीची भाषा  आहे. निसर्गातल्या प्रत्येक जाणीवांची यातील प्रतिके सामाजिक भान देऊन जातात.चांगल्या,वाईटाचा सारासार विचार कथेला बोलका संवाद साधतो.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नंदा मेश्राम होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सुनील जाधवांच्या कथेत  सामान्य जीवन शैलीतून होणारी भावनांची गुंतागुंत उत्तम रीतीने यात मांडली गेलेय. सध्याच्या काळातआई ,बाबांचा विचार होताना दिसत नाही.पैसा आणि भौतिक सुखात माणूस यंत्रवत झालाय.भावनिक पातळीवर खिळवून ठेवणाऱ्या या कथेत सामाजिक आणि कौटुंबिक जाणिवेचा गौरवपणा यात सांगितला आहे. त्या माऊलीचा गौरव करणाऱ्या आहेत.जी आपल्या अपत्याच्या प्रगतीसाठी,शिक्षणासाठी अनेक कष्ट घेते.आणि उत्तम मार्गदर्शन करते.त्याचा आढावा या पुस्तकात घेतला गेला आहे.मुलांच्या अनेक समस्या आणि त्यातून काढलेला मार्ग याचा परामर्ष यातून घेतला गेलाय. ज्ञानदेव,विठुमाऊली प्रमाणे आपल्या माऊलीची महतादेखील यात चांगली वर्णली गेलेय.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सखाराम डाखोरे यांनी केले. आभार प्रदर्शन अनंत घाटाळ यांनी केले. कार्यक्रमास रसिकांची उपस्थिती लक्षणीय होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!