मातीचे पाय “मंगेश चिवटे”

…आणि असा मंगेशचा वैद्यकीय सेवेचा पसारा वाढला
‘आबा, समुद्री किनारी सुरक्षा व्यवस्था बरोबर नसल्याने…’
शर्ट ओढत आणि त्याच्या प्रश्नाला हरकत घेत पत्रकारांनी मंगेशला थांबविले… या प्रश्नाचे आबांनी अगोदर उत्तर दिले आहे, तू वेळ घेऊ नकोस, असे समजावत मंगेशला पत्रकारांनी खाली बसविले..
मंगेश चिवटे हा नवखा आणि ज्युनियर होता मीडिया मध्ये. त्यामुळे तो आबा उर्फ तत्कालीन दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील आणि सर्व पत्रकारांचा आवडता होता. इलेक्ट्रॉनिक मीडियात लहान वयात मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा मंगेशने प्रामाणिक प्रयत्न केला.  २००८ साली सुरवातीला ‘स्टार माझा’साठी मंत्रालय प्रतिनिधी, त्यानंतर ‘जय महाराष्ट्र’ साठी दिल्ली येथे ब्युरो चीफ, साम टिव्हिसाठी मुख्य राजकीय वार्ताहर आणि त्यानंतर आयबीएन लोकमत मध्ये उप-वृत्तसंपादक असा त्याने पत्रकारितेत प्रवास केला. आमच्यासमोर एक बच्चा म्हणून मंगेशकडे आम्ही पहात होतो. त्याच आजचं अफाट कार्य बघून आश्चर्य वाटते. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणारा पत्रकार त्यातच आपलं आयुष्य घडवत असतो. मंत्री, अभिनेते, अशा झगमगाटात केव्हा गुरफूटन जातो याचा थांगपत्ता लागत नाही. या क्षेत्रात जेवढे नाव तेवढी रिस्क देखील असते. मात्र मंगेश या इलेक्ट्रॉनिक मिडियापासून दूर गेला आणि त्याने गावातील गरिबांना रोजगार मिळावा म्हणून ‘मुक्ताई’ गारमेंट व्यवसाय सुरू केला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे त्याने हा गारमेंट व्यवसाय सुरू केला. आज त्याच्या व्यवसायात महिला व पुरुष मिळून ८० मजूर काम करत आहेत. 
मुळातच मंगेशवर संत विचारांचे संस्कार झालेले आहेत. त्याचे आजोबा मनोहरपंत चिमटे हे स्वातंत्र्य सैनिक, १९५२ मध्ये ते नगराध्यक्ष होते. ते कट्टर लोहियावादी शिवाय भाई वैद्य, नाना परुळेकर या थोर विचारवंतांचा मंगेशच्या घरी येणं-जाणं होतं. वासकर महाराज यांचा त्यांच्या घराण्याशी संबंध… त्यामुळे संतांच्या विचारांचा संस्कार व पगडा मंगेशवर पडणे स्वाभाविक होते. एकदा त्याने आमदार बच्चू कडू यांच्या वैद्यकीय सेवेचे कार्य पाहून त्याच्या परोपकारी स्वभावाला एक नवा विचार मिळाला आणि त्याने ठाण्यात गोरगरीब गरजू रुग्णासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर वैद्यकीय सेवेची संकल्पना मांडली. ही संकल्पना श्री. शिंदे यांना आवडली आणि त्यांनी श्री. बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची १७ नोहेंबर २०१७ रोजी स्थापना करून मंगेश  चिवटे याची कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती केली. महाराष्ट्रातून ग्रामीण भागातून येणा-या रुग्णांना ठाणे व मुंबईतील हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, त्यांच्या राहण्याची सोय करणे, गरीब रूग्णाला जेवण देणे. आतापर्यंत मंगेश आणि त्याच्या दहा सहका-यांनी मिळून सात हजार रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत केली आहे. मंगेश चिमटे आणि त्यांच्या सहका-यांचे काम पाहून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय सेवा आता दादरच्या शिवसेना भवनात म्हणजे मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी ही सेवा सुरू केली आहे. शिवसेनेचे कार्य मोफत रुग्णवाहिकेपासून सुरू झाली. त्यात एकनाथ शिंदे, मंगेश चिवटे व त्यांचे सहकारी राज्यातील गरजू लोकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देत आहेत. आरोग्यसेवेसाठी रुग्णाला ताटकळत ठेवता येत नाही. त्यांना क्षणाचाही विलंब न करता गरजू रुग्णांना सेवा देणे हेच बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय सेवेचे व्रत आहे. 
पत्रकारितेचे ध्येय उराशी बाळगून वैद्यकीय सेवेला वाहून घेणारा मंगेश नरसिंह चिवटे जीव ओतून काम करतोय… आजच्या कलियुगात हे शक्य नाही, मात्र घरात संत विचारांचे संस्कार  असल्याने  हा ३१ वर्षांचा मंगेश  गरजूंची सेवा करतोय, करीत राहणार… आपण सर्वांनी त्याला शुभेच्छा देऊ या.

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार)
(jayant.s.karanjavkar@gmail.com/8369696639).                     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!