
पालघर : सोमवंशी क्षत्रिय पाचकळशी हितवर्धक मंडळातर्फे दीपोत्सवाचे आयोजन गेली १८ वर्षे केले जाते. यात विशेष आकर्षण म्हणजे शिववैभव किल्ले स्पर्धा ही स्पर्धा मागील ८ वर्षापासून सुरु आहे. माहीम भागातील प्रत्येक आळीतील एक गट दिवाळीच्या काळात किल्ला तयार करतात. यशस्वी गटाला सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक दिली जातात.

यावर्षी प्रथमच कोवीडच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा ऑनलाइन घेण्यात आली व कुटुंबापुरती मर्यादित ठेवण्यात आली. या स्पर्धेचे प्रत्यक्ष भेट देऊन परीक्षण दिनांक १७ नोव्हेंबर २०२० रोजी किल्ले वसई मोहिम परिवाराचे प्रमुख सन्माननीय डॉ श्रीदत्त राऊत आणि उत्तर कोकण लिपी मंडळाच्या प्रशिक्षिका सौ दिव्या राऊत यांनी केले. यावर्षी प्रथम काही जणांनी माती ऐवजी पुठ्ठा, कागद यांचा वापर करुन किल्ले तयार केले होते. शिपाळभाट, नारळवाडी व रेवाळे या भागातील कुटुंबांनी भव्य मातीचे किल्ले तयार केले होते. भविष्यात ही स्पर्धा राज्यस्तरावर भरवावी असे डॉ श्रीदत्त राऊत यांनी सांगीतले. आयोजक मंडळानेही ही सूचना स्वीकारली आहे.

स्पर्धेच्या अंतिम निकालात प्रथम क्रमांक संज्योत पाटील व कुटुंबिय शिपाळभाट – प्रतापगड, द्वितिय क्रमांक यश चौधरी व कुटुंबिय – रेवाळे – पुरंदर दुर्ग, तृतीय क्रमांक – सिध्दिक सावे व कुटुंबिय – वारेख व तृतीय क्रमांक विभागुन – आर्य वर्तक व कुटुंबिय – नारळवाडी – तोरणा गड यांचा समावेश करण्यात आला. सदर उपक्रमात योगेश म्हात्रे अध्यक्ष, विनय पाटील उपाध्यक्ष, उल्हास चौधरी उपाध्यक्ष, सौ नूतन वर्तक खजिनदार, तुषार राऊत कार्यवाह, आदित्य पाटील सहकार्यवाह, सौ प्रिती पाटील सहकार्यवाह आणि व्यवस्थापक मंडळ व युवा समिती सदस्य, सोमवंशी क्षत्रिय पाचकळशी हितवर्धक मंडळ, माहीम पदाधिकारी मंडळ यांनी सक्रिय सहभाग घेतला.