मिश्किली – ‛अवनी’ची  हत्या…

फडणवीस सरकारच्या आदेशानंतर यवतमाळमध्ये ‘अवनी’ वाघाणीला गँगस्टरमार्फत गोळ्या घालून ठार मारण्यात आले. यामुळे देशभरात संताप व्यक्त होत असतानाच केंद्रीयमंत्री आणि भूतदयावादी मनेका गांधी यांनी देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चांगलेच झापले. त्यामुळे या दोन कार्यक्षम मंत्र्यांना आरोपीच्या पिंज-यात ठेवल्याने  मोरूने रातोरात वाघधरे यांना पत्र लिहिले…

प्रिय वाघधरे, 
तुमच्यापर्यंत ‘अवनी’ वाघिणीच्या हत्येविषयीची माहिती कानावर आलीच असेल. मी फार दुखावलो बघा… या जगात वाघमारे आहेत तसेच तुमच्यासारखे वाघधरेही आहेत… म्हणून तुम्हाला पत्र लिहीत आहे. तुमच्या कुटुंबात कोणी तरी गावात चांगले गच्च दोरखंडांने वाघाला बांधून धरले असेल म्हणूनच तत्कालीन सरकारने वाघधरे हे नाव किताब म्हणून तुम्हाला दिला असेल.   अवनीवर पाळत ठेवून कसे मारले हो ? म्हणे तिने तेरा माणसांना मारून त्यांच्या आयुष्याचे तीनतेरा वाजवले म्हणून… प्राणीजात हो ती, तिला फक्त तिच्या बछड्यांसाठी शिकार पाहिजे होती. तिला जंगलात शिकार मिळाली नसेल म्हणून बिचारी ती अवनी गावात आली. नाहीतरी आपण जंगलात सिमेंटची जंगले उभारलीत, त्याचे हे परिणाम आपल्या मानवप्राणीला भोगावे लागणारच, हे मी सांगायला पाहिजे का, वाघधरे भाऊ ? असो…
आता आपण  मेन विषयावर येऊ या… मी काय म्हणत होतो, त्या दिल्लीतील कोण त्या  मंत्री बाई ? हा आठवलं तर त्या  मनेका गांधी… त्यांनी तर आपल्या देवेंद्रभौना सरळ सरळ आरोपीच्या पिंज-यात उभे केले… नुकतच त्यांच्या सरकारला चार वर्षे पूर्ण झालीत… त्यांनी लोकहितार्थ घेतलेल्या कामाची माहिती चॅनेलवर तसेच वर्तमान पत्रात देत होते आणि मध्येच माशी शिंकावी तशी मनेकाबाई गांधीलमाशी सारखी मध्येच टपकल्या…  आपल्याच सरकारमधील मंत्री बोलतायेत म्हणून देवेंद्रभौ आणि सुधीरभौ चूप बसले. विशेष म्हणजे दोघंही विदर्भाचे, विदर्भावर अन्याय, अन्याय काय म्हणतात ते हेच उत्तम उदाहरण आहे, वाघधरे… महाराष्ट्रात विदर्भाचे मुख्यमंत्री होते तेव्हा पश्चिम महाराष्ट्राचे नेते छळायचे आणि या मनेका गांधी …  त्या अतिसंवेदनशील आहेत म्हणतात, त्यांना माणसापेक्षा प्राण्यांवर जीव… पण म्हणतात ना अति तेथे माती… आपल्या राज्यात शेतकरी आत्महत्या करीत होते तेव्हा या बाईंना शेतकरी व त्यांच्या मुलांचा कळवळा आला नाही, मात्र अवनीच्या बछड्यांची मात्र त्यांना काळजी… ते बछडेही स्वहिंमतीवर शिकार करण्या इतपर सक्षम आहेत, पण बाईंना हे कोण सांगणार  ?
दुसरे ते शिवसेनेचे सध्याचे बिग बॉस संजय राऊत यांनी आपल्या उग्रलेखात  कि अग्रलेखात सरकारचे धिंढवडे काढले… वाघिणीवर हल्ला केल्याने हे वाघ चवताळले (ते स्वतःला वाघ समजतात म्हणून..) देवेंद्र भौच्या सरकारमध्ये पिंज-यात बसल्यासारखे असतात यांचे मंत्री, परंतु बाहेर आल्यावर त्यांच्यात वाघाचं बळ येतं… वाघाच्या ताकदीच्या बळाचं पेटंट जसं काय यांच्याकडेच आहे… हे काय बरोबर नाही वाघधरे … तुमचं काय मत आहे ते कळवा मला… मेंदूचा भुगा झालाय, कळवा तर…
आपला मोरू
प्रिय मोरू,
मोरू एक लक्षात ठेव, जो काम करतो त्यालाच आव्हान दिले जाते… पूर्वी अनेक नेते प्रसिद्धी मिळण्यासाठी शरद पवारसाहेबांवर टिका करायचे, त्याप्रमाणे राऊत देवेंद्रभौवर प्रत्येकवेळी तुटून पडत असतील असं मला वाटतं… मुख्यमंत्री देवेंद्रभौनी त्यांना चांगलेच उत्तर दिले. त्यांनी सरळ सरळ सांगितले की ‘ संजय राऊत म्हणजे शिवसेना नाही’…
चांगली खाट टाकली की नाही राव? यावर उद्बोजीही खुदूखुदू हसले असतील.   पण एक सांगू राजकारणात अशी वळूसारखी माणसं सोडावी लागतात, त्यामुळे तर राजकारणात रंगत येते, रग वाढते ते वेगळे ! कारण हेच बघ दसरा मेळाव्यात राज्य सरकारला भडव्याची उपमा दिली… मजल कुठं पर्यंत गेली ती बघ… भडव्याच्या नावाने राऊतांनी डबे बडवले पण देवेंद्रभौ काही कमी नाहीत. त्यांनी तर राऊत म्हणजे शिवसेना नाही, उतरवली की नाही राऊतांची, याच राऊतांनी युतीच्या राज्यात त्यांच्या मुख्यमंत्र्यांना सोडले नाही. स्वतःचा टीआरपी वाढविण्यासाठी ते सोमय्या व शेलारांच्या मार्गाने चालले आहे. आज हे दोघे कुठे आहेत. आपला बळी जाणार याची जाणीव होताच ते दोघेही गप्प आहेत… एक दिवस संजय राऊत यांनाही त्याची जाण होईल… ती काळजी त्यांची मातोश्री घेईल… मोरू तू काय त्याची चिंता करू नकोस. मी आता हा शब्द प्रपंच थांबवतो आणि माझ्या या पत्राला उत्तर देऊ नकोस. मी या राजकारणाला कंटाळलो आहे. अवनीबद्दल  मला सहानुभूती आहे तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करून शब्द पेरणी थांबवितो…
तुझा वाघधरे

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार)
(jayant.s.karanjavkar@gmail.com/8369696639).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!