“मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे !” – योगेश वसंत त्रिवेदी

सोमवार, १८ मे २०२० ! प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे प्रपौत्र, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या द्रुष्टीने एक महत्वाचा दिवस. त्यांच्या आयुष्यातील हा दिवस त्यांच्या संसदीय लोकशाही मधील एक महत्त्वाची घटना. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या दिवशी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ दिली. महाराष्ट्रातील राजकारणात उद्धव ठाकरे यांनी, “मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे….!” अशी शपथ दुसऱ्यांदा घेतली.

पहिली शपथ २८ नोव्हेंबर २०१९ रोजी दादरच्या शिवतीर्थावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आणि दुसऱ्यांदा १८ मे २०२० रोजी विधानपरिषदेवर सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आल्यामुळे ही शपथ घेतली. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढविली नाही. उद्धव ठाकरे हेही निवडणूक लढवतील अशी कुणाला कल्पना नव्हती. परंतु २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणाचे समीकरण संपूर्ण बदलले आणि ज्या भारतीय जनता पक्षाच्या बरोबर विधानसभा निवडणुकीत महायुती केली होती त्याच भारतीय जनता पक्षाच्या राज्य नेतृत्वाबरोबर मतभेद झाल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला. कुणाच्या ध्यानी मनी नसलेली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाराष्ट्र विकास आघाडी अस्तित्वात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची गळ घातली. राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेता मुख्यमंत्री पद स्वीकारण्याची तयारी दर्शविली. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांनी हर्षोल्हासात या नेतानिवडीचे स्वागत केले. ठाकरे परिवाराने १९ जून १९६६ पासून आजवर सर्वांना मोठमोठ्या पदांवर बसविण्याची भूमिका घेतली होती.

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ठाकरे परिवाराची चौथी पिढी आदित्य उद्धव ठाकरे यांच्या रुपाने उतरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या प्रेमात पडले आणि थेट ‘हाता’ वरचे ‘घड्याळ’ बाजूला करीत मनगटावर ‘शिवबंधन’ बांधले. इतकेच नव्हे तर आदित्य ठाकरे यांना त्यांच्या वरळी मतदारसंघातून निवडून आणले. अर्थात सुनील शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कारण याच शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिनभाऊ अहिर यांचा पराभव केला होता. काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी युद्धात, प्रेमात आणि राजकारणात सर्व काही घडू शकते, असे २०१९ च्या २४ ऑक्टोबर रोजीच बोलून दाखविले होते. सचिन भाऊंनी आदित्य यांना वरळीत दत्तक घेतले. त्याची त्यांना बक्षिसी मिळाली. ते शिवसेनेचे उपनेते नियुक्त झाले. सुनील शिंदे अर्थातच बाकीच्या मंडळींप्रमाणे ‘प्रतीक्षा यादी’त लटकले. तर सांगायचा मुद्दा म्हणजे आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. पण हे ‘आदित्य यान’ मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरण्याऐवजी चक्क ‘उद्धवयान’च सहाव्या मजल्यावर अवतीर्ण झाले. परंतु उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र विधिमंडळाच्या एकाही सभागृहाचे सदस्य नसल्याने घटनेप्रमाणे एका सभागृहात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर सहा महिन्यात निवडून येणे आवश्यक असते, त्यामुळे २८ मे २०२० पर्यंत चा कालावधी त्यांच्या कडे होता.

भारतीय जनता पक्षाच्या तोंडातून सत्तेचा घास उद्धव ठाकरे यांनी हिरावून घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही विरोधकांपेक्षा शिवसेनेला कट्टर विरोधक मानायला सुरुवात केली. पर्यायाने उद्धव ठाकरे यांच्या मार्गात जेवढे अडथळे निर्माण करता येतील तेवढे अडथळे निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मग त्यात मोठा भाऊ म्हणणाऱ्यांपासून तर सहा वर्षे मूग गिळून गप्प बसले असेही पोपटासारखे बोलायला लागले. राजकारणातील सर्व साधनशुचिता खुंटीवर टांगून ठेवीत साम दाम दंड भेद अवलंबिण्यास प्रारंभ केला. उद्धव ठाकरे माझे मोठे भाऊ आणि नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे यांचे मोठे भाऊ अशी बिरुदावली लावणाऱ्यांनी निवडणुकी पूर्वी जशी वागणूक ठेवली होती त्यापेक्षा अगदी उलट वागण्यास सुरुवात केल्यामुळे सारेच बुचकळ्यात पडले. असतो काहींचा स्वभाव ‘खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे’ असा. १८ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे वांद्रे कुर्ला संकुलातील सोफिटेल, मातोश्री आणि वरळीच्या हॉटेल ब्ल्यूसी मध्ये उद्धव ठाकरे यांच्या समवेत होते. सविस्तर चर्चा झाली. मातोश्री च्या तिसऱ्या  मजल्यावर अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्ये बंद दाराआड चर्चा झाली. चर्चेत दोघेच होते. ते काय फाफडा जिलेबी खायला आले होते की रश्मी वहिनींच्या हातच्या ‘रसोई’ चा आस्वाद घ्यायला आले होते ? २४ ऑक्टोबर रोजी तुम्ही आदित्य ठाकरे यांचे निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन करता, निवडणुकीच्या आधी कधीही रात्री बेरात्री मातोश्रीवर मोठ्या भावाला भेटून जाता. मग २४ ऑक्टोबर २०१९ रोजी याच मोठ्या भावाला भेटायला कुणी अडवले होते ? साडेपाच वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद शिवसेना भवनात होती त्याच्या एक तासापूर्वी जर आपण उद्धव ठाकरे यांच्या बरोबर चर्चा केली असती तर तिथेच संयुक्त पत्रकार परिषद होऊ शकली असती आणि आजची परिस्थिती निर्माण झाली नसती. अर्थात विधात्याने उद्धव ठाकरे यांच्या नशीबात मुख्यमंत्री होणे लिहून ठेवले असेल तर त्याला कोण काय करणार ? मी माझ्या मागच्या एका लेखात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी शिवसेनेला कसे कसे फसविले याची हकिकत नमूद केली आहेच. त्यामुळे उद्धव ठाकरे हे गेल्या तीस वर्षाचा हिशोब चुकता करणार हे तर नक्कीच होते. त्यामुळेच त्यांनी अभूतपूर्व आणि ऐतिहासिक परिस्थितीत मुख्यमंत्री पद स्वीकारले आणि त्या ओघाने विधानपरिषद सदस्यत्वही. त्यामुळेच सोमवार, १८ मे २०२० हा दिवस संसदीय लोकशाही आणि भारतीय घटनेप्रमाणे वैधानिक पद स्वीकारुन त्याची शपथ घेणे हा उद्धव ठाकरे यांच्या जीवनातील महत्त्वाचा दिवस म्हणावा लागेल.

कर्मधर्मसंयोगाने, सुदैवाने की दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांना कोरोना उर्फ कोविड १९ या जागतिक विषाणू चा मुकाबला करण्याची वेळ आली. या सर्व परिस्थिती मध्ये उद्धव ठाकरे यांची प्रतिमा आणखी संघर्षाच्या भट्टीत तावूनसुलाखून निघाली आणि शंभर कँरेटचे सोने महाराष्ट्रातील बारा साडेबारा कोटी नागरिकांबरोबरच एकशेतीस कोटी भारतीय नागरिकांसमोर आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बरोबर संपूर्ण मंत्रिमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अहोरात्र परिश्रम घेत आहे. परप्रांतीय मजुरांच्या प्रश्नांपासून सर्वच समस्या उद्धव ठाकरे हे एकापाठोपाठ एक सोडवीत आहेत. मंत्रालयात काम करणारे कर्मचारी उद्धव ठाकरे यांची तारीफ करतांना अजीबात दमत नाहीत. असा शांत, संयमी, निर्णय क्षमता असलेला मुख्यमंत्री आपण अद्याप पाहिला नाही, अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊ शकतात तर काहीही घडू शकते म्हणणारे आपण २३ नोव्हेंबर २०१९ च्या सकाळी साडेसात वाजता काय केले होते, हेच पद्धतशीरपणे विसरतात पण साऱ्या दुनियेने ती ऐतिहासिक घटना पाहिली. मला नांदेड हून डॉ. विलास कुमठेकर यांनी भ्रमणध्वनीवर कळविले,” अहो त्रिवेदी साहेब, टीव्ही लावा. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे शपथ घेताहेत.” त्या दिवशीची सगळी वर्तमानपत्रे रद्दी ठरली. यानंतर काय घडले ? कसे घडले ? परिस्थिती कशी बदलली ? राजकीय समीकरणे काय काय झाली ? यावर अनेक पत्रपंडित पुस्तके लिहिताहेत. मला कट्टर शिवसैनिक अगदी विदर्भ मराठवाडा, मुंबई येथून संपर्क साधून विचारताहेत. काही जण, “घडले ते बरेच झाले, चांगली अद्दल घडली. हे असे घडायला नको होते. दोन हिदुत्ववादी एकत्र रहायला हवे होते.  ज्यांच्या विरोधात आम्ही मते मागितली त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायचे म्हणजे हे तर अतीच झाले.” अशा असंख्य प्रतिक्रिया मिळाल्या. मी माझ्या पद्धतीने योग्य ती उत्तरे देत त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.

याचवेळी एक सुचवावेसे वाटते की, आदित्य उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे भावी पक्षप्रमुख आहेत. उगवत्या सूर्याला नमस्कार म्हणतात त्याप्रमाणे आजच अनेक जण आदित्य ठाकरे यांच्या पाया पडताहेत. त्यांना माहित आहे की आदित्य साहेब हेच आपले उद्याचे भाग्यविधाते आहेत. त्यामुळे त्यांना नमस्कार हा करणे क्रमप्राप्त आहे. परंतु यासाठी काही गोष्टी लक्षात घेऊन वाटचाल करणे गरजेचे आहे. आज आदित्य ठाकरे हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. कोरोनाच्या आजच्या संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना घरीच रहा, सुरक्षित रहा, घराबाहेर पडू नका, असा कळकळीचा सल्ला दिला आहे. ‘खबरदारी तुमची, जबाबदारी आमची’ असेही स्पष्टपणे सांगितले आहे. लोक घराबाहेर का पडतात ? त्यांना जीवनावश्यक वस्तू हव्या असतात म्हणून. या जीवनावश्यक वस्तू जर त्यांना घरपोच मिळत असतील तर ते घराबाहेर का पडतील ? लोकांना फुकट नकोय, वेळेवर पाहिजे. अस्लम शेख हे मुंबई शहराचे पालकमंत्री असून ते चांगले काम करीत आहेत. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे सर्वत्र गुणगान होत आहे. त्यांना कशाचाही अनुभव नाही, ते अननुभवी आहेत, असे म्हणणाऱ्यांचे दात उद्धव ठाकरे यांनी सर्वोत्तम काम करुन टीकाकारांच्याच घशात घातले आहेत. अशावेळी त्यांचा आदर्श घेत आदित्य ठाकरे यांनी वांद्रे ते दहिसर, कुर्ला ते मुलुंड, चेंबूर अशा उपनगरात सर्वत्र पक्ष आणि प्रशासन यंत्रणा सोबत घेऊन फिरावे, जिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस अधिकारी यांना सोबत घेऊन आढावा घ्यावा. यामुळे पक्षकार्यकर्ते मरगळ झटकून कामाला लागतील. पदाधिकाऱ्यांना सुद्धा आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळेल. महाविकास आघाडी कार्यकर्त्यांना सोबत घेतले तर सोन्याहून पिवळे होईल.

२०२२ ला मुंबई महापालिका आणि २०२४ ला लोकसभा आणि विधानसभा निवडणुका येतील. याचवेळी आपल्या नेतृत्वाचा कस लागेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधीच बजावले आहे की मुंबई महापालिका महाविकास आघाडीच्या हातात राहिलीच पाहिजे आणि शिवसेना पहिल्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस त्यांच्या बरोबर असेल. भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिका ताब्यांत घेण्यासाठी कंबर कसतोय. त्यामुळे मुंबईकरांचा ‘आशीष’ (आशीर्वाद) कायम महाविकास आघाडीला हवा असेल तर आदित्य ठाकरे, हीच वेळ आहे, करुन दाखविण्याची. भावी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा नांवलौकिक पुढे टिकवावा, वाढवावा यासाठी आपल्याला मरगळ झटकून कामाला लागावेच लागेल. केवळ ऑनलाइन नव्हे तर जनमानसात फिरणे, त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना सर्वार्थाने दिलासा देणे महत्त्वाचे आहे. मध्यमवर्गीय माणूस हा तुमची प्रतीक्षा करतोय. त्याला निराश करु नका. आई तुळजाभवानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आपल्याला उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य देवो, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी आपल्याला आगेकूच करण्यासाठी योग्य ती दिशा देवो. जय महाराष्ट्र !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: