मुंबईकर वीज ग्राहकांच्‍या प्रश्‍नी सरकार एमईआरसीकडे जाणार

मुंबई, दि. ३ : मुंबई उपनगरातील वीज ग्राहकांना अदानी कंपनीकडून आकारण्‍यात आलेले वाढीव वीज दर (Tariff rate) आणि प्रत्‍यक्ष मिटर रिडिंग  न घेताच आकारण्‍यात आलेली वीज बिले या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतली असून याबाबत तातडीने वीज नियामक आयोगाकडे
(एमईआरसी) सरकार जाणार असल्‍याचे राज्‍याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि ऊर्जा विभागाचे सचिव अरविंद सिंग यांनी आज मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांना सांगितले.
मुंबई उपनगरात वीज वितरण करणा-या  कंपनीकडून अचानक वीज देयकांमध्‍ये 50 ते 100 टक्‍के वाढ करण्‍यात आल्‍याच्‍या अनेक तक्रारी मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍याकडे करण्‍यात आल्‍या होत्‍या. यामध्‍ये प्रत्‍यक्ष मिटर रिडिंग न घेताच कंपनीने सरासरीने वीज देयके दिली व वाढीव दर आकारले आहेत,  अशाही तक्रारी ग्राहकांकडून करण्‍यात येत असून याबाबत तीव्र संताप व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. त्‍यामुळे या प्रकरणी चौकशी करण्‍यात यावी एमईआरसीकडे जावे अशी मागणी करीत आमदार अॅड आशिष शेलार यांनी प्रथम मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 30 नोव्‍हेंबरला भेट घेतली होती. याप्रकरणी चौकशी करण्‍याचे निर्देश मुख्‍यमंत्र्यांनी ऊर्जा मंत्र्यांना दिले होते. त्‍यानंतर पुन्‍हा आज मंत्रालयात आमदार अॅड आशिष शेलार यांनी  ऊर्जा खात्‍याच्‍या सचिवांची पाठपुराव्‍यासाठी भेट  घेतली. तर ऊर्जा मंत्र्यांशी संपर्क साधला.  या प्रकरणी सरकारने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी सरकार  एमईआरसीकडे जाणार असल्‍याचे सचिव अरविंद सिंग यांनी आमदार अॅड आशिष शेलार यांना सांगितले.
दरम्‍यान,  आमदार अॅड आशिष शेलार यांनी याबाबत सांगितले की, माझ्या पत्राची दखल घेत सरकाने हे प्रकरण ता‍तडीने एमईआरसीकडे पाठवण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे या प्रकरणी पुढील कार्यवाही होईल व ग्राहकांना न्‍याय मिळेलच पण  हा प्रश्‍न निकाली निघेपर्यंत आम्‍ही त्‍याचा पाठपुरावा करू, मात्र कॉंग्रेसला उशिरा जाग आली असून कॉंग्रेस या प्रकरणी श्रेयाचे राजकारण करण्‍याची संधी साधत आहे. पण आमच्‍यासाठी मुंबईकरांचे हित महत्‍वाचे असून त्‍यांच्‍यासाठी आम्‍ही हा विषय निकाली निघेपर्यंत पाठपुरावा करीत राहूच, असेही आमदार अॅड आशिष शेलार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!