मुंबई म्हाडाच्या २७६ गाळ्यांच्या सोडतीसाठी अर्ज नोंदणीस सुरवात

मुंबई (प्रतिनिधी) :  म्हाडा मुंबई मंडळाच्यावतीने विविध गृहनिर्माण प्रकल्पातील भोगवटा २१७ सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी, अर्ज करणे, या प्रक्रियेचा शुभारंभ मुंबई म्हाडा मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांच्या हस्ते झाला. तर मंडळांतर्गत दुकानांच्या गाळ्यांचे ई लिलावसाठी अर्ज करण्याचा शुभारंभ कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. 

वांद्रे येथील गृहनिर्माण भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर  व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

म्हाडा मुंबई मंडळाची सदनिका सोडत २१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता वांद्रे(पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयात होणार आहे.  या संदर्भातील माहिती पुस्तिका व अर्जाचा नमुना म्हाडाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. मुंबई व कोकण मंडळातर्गत दुकानांच्या गाळ्यांचा लिलाव ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

मुंबई मंडळातील सोडतीकरिता अर्जदारांची नोंदणी व अर्ज करण्यासाठी ७ मार्चला दुपारी २ वाजल्यापासून १३ एप्रिल रात्री ११.५९ पर्यंत मुदत राहील. एनईएफटी/आरटीजीएसद्वारे  अनामत रक्कम ७ मार्च ते १३ एप्रिल दरम्यान बँकेत भरता येईल. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारा अनामत रक्कम ७ मार्च ते १३ एप्रिल रात्री ११.५९ पर्यंत भरता येईल.

सदनिका सोडतीत अल्प उत्पन्न गटांसाठी सहकारनगर-चेंबूर येथील १७० सदनिका तर मध्यम उत्पन्न गटांसाठी सहकारनगर-चेंबूर, कोपरी-पवई येथे ४७ सदनिकांचा समावेश आहे. या सर्व सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाला असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मधु चव्हाण यांनी केले आहे.

ई लिलावात म्हाडा मुंबई मंडळातर्फे प्रतीक्षा नगर, सायन, न्यू हिंद मिल- माझगाव, विनोबा भावे नगरसह, स्वदेशी मिल-कुर्ला, तुर्भे-मंडाले- मानखुर्द, तुंगा पवई, गव्हाणपाडा- मुलुंड, मजासवाडी-जोगेश्वरी, शास्त्रीनगरसह सिद्धार्थनगर-गोरेगाव, चारकोप, मालवणी-मालाड येथील २०१ गाळ्यांचा समावेश आहे. तर कोकण मंडळांतर्गत विरार बोळींज, वेंगुर्ला येथील सदनिकांचा समावेश असल्याचे यावेळीं मधु चव्हाण व कोकण मंडळाचे बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली.

दुकानांच्या गाळ्यांच्या ई लिलावासाठी  ३० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ई लिलाव संकेतस्थळावर नोंदणी अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे व अनामत रक्कम भरता येईल.    २ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपासून ई लिलाव (ऑनलाइन बोली) सुरू होणार असून ५ एप्रिल  दुपारी २ वाजे पर्यंत ई लिलावासाठी मुदत देण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!