मॅरेथॉन, कला-क्रीडेत महापालिका व्यस्त ; नागरिक डासांनी त्रस्त, नाले सफाईकडे दुर्लक्ष

वसई (प्रतिनिधी) : मॅरेथॉन आणि कला-क्रीडेत व्यस्त असलेल्या महापालिकेने नालासोपारातील मुख्य नाल्याची सफाई न केल्यामुळे डासांची मोठया प्रमाणात उत्पत्ती झाली असून,या डासांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

नालासोपारा पश्चिमेकडील समेळ गावाच्या वेशीवर एक भलामोठा मुख्य नाला आहे.विरारकडून वाहणारा हा नाला वसईतील आचोळे खाडीला जावून मिळतो. गेल्या पावसाळयात हाच नाला दुथडी भरून वाहिल्यामुळे सोपारा,समेळपाडा,साईनगर,श्रीप्रस्थ,लोढानगरसह आसपासच्या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले होते.आता याच नाल्यातील सांडपाणी ठाण मांडून बसल्यामुळे त्यावर पान वनस्पतीची मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.या वनस्पतीखाली मोठया प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे.

अंधार आणि घाणेरडे पाणी या दोन गोष्टी डासांच्या उत्पत्तीसाठी अनुकुल आहेत.नाल्यातील पाण्यावर असलेल्या पान वनस्पतीखाली अंधार असल्यामुळे 24 तास डासांची उत्पत्ती होते. एकावेळी 200 ते 300 अंडी या डासांकडून घातली जातात.त्याचे लावरा (लहान डांस) आणि लावराचे डासांमध्ये रुपांतर होते.अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी वैद्यकिय अधिकारी डॉ्टर जी.पी.मेन यांनी दिली.

हे डास संध्याकाळी समेळगांव,साईनगर आणि आसपासच्या परिसरातील घरात शिरून रात्रभर नागरिकांवर हल्ला करीत आहेत.त्यांच्यावर कोणत्याही किटकनाशक औषधे,मॅट,अगरबत्ती,लिक्वीडचा परिणाम होत नाही.तसेच अंधार पडल्यावर इमारतीं ,रस्ते,मोकळा परिसर अशा सर्वच ठिकाणी या डासांचा थवा फिरत असल्यामुळे घराबाहेर पडणेही नागरिकांना मुश्किल झाले आहे.महापालिकेकडून दरसाल कोटयावधी रुपयांचा खर्च आरोग्यावर विशेषतः नालेसफाई आणि औषध फवारणीवर केला जात असातानाही डासांची उत्पत्ती वाढत चालल्यामुळे आणि नालेसफाईकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

तर महापालिकेकडून औषधे पुरवली जात नसल्यामुळे फवारणी करता येत नसल्याचे ठेकेदारांकडून सांगण्यात येत आहे.या प्रकरणी महापालिकेचे सभापती किशोर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता,नाल्यावरील पान वनस्पती ताबडतोब काढण्यात येईल आणि परिसरात धुरांची फवारणी करण्यात येईल.असे त्यांनी सांगितले. तसेच हा नाला अधिक रुंद करण्याचे काम हाती घेण्यात आले असून,तो सतत वाहता राहील याची खबरदारी घेण्यात येईल.अशीही त्यांनी अधिक माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!