मोठ-मोठ्या वृत्तपत्रांचे मालक श्रीमंत आणि पत्रकार गरीब अशी विषम परिस्थिती पत्रकारितेत ! – प्रकाश कुलकर्णी

वसई, दि.6 (वार्ताहर ) :  सैन्य जसे पोटावर चालते, तसेच वृत्तपत्र जाहिरातीवर चालते. आज मोठ मोठ्या वृत्तपत्रांचे मालक श्रीमंत आणि पत्रकार गरीब अशी विषम परिस्थिती या क्षेत्रात निर्माण झाली आहे.पत्रकार शेवटी या समाजाचा घटक असून, समाजाचे भले-बुरे प्रतिबिंब त्याच्यावरही उमटते. म्हणून आपण आरशातील प्रतिबिंबाचे दोष शोधत बसने योग्य नाही. पत्रकारांकडून खूप मोठ्या अपेक्षा केल्या जातात, पण त्या तुलनेत त्यांना तशी संधी आणि संरक्षण दिले जाते का? याचा विचारही समाजाने केला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार,  दै. नवशक्तीचे माजी संपादक प्रकाश कुलकर्णी यांनी आज वसईत केले.
वसई विरार महानगर पत्रकार संघा’तर्फे  आयोजित ‘पत्रकार दिन’,तथा संघाच्या ‘द्वितीय वर्धापन दिन’ सोहळ्यात अध्यक्षीय भाषणांत कुळकर्णी बोलत होते. माणिकपूर येथील समाज उन्नती मंडळ सभागृहात सोहोळ्याचे उदघाट्न ‘समर्थन’,तथा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी केले. स्व.बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. 
ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते फा. दिब्रिटो यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा बद्दल खास सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच ज्येष्ठ पत्रकार कुलकर्णी यांचा त्यांच्या प्रदीर्घ संपादकीय कारकिर्दी बद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तर संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाबद्दल आणि त्यांच्या बँकेची नोकरी सांभाळून, केलेल्या पत्रकारितेतील 32 वर्षीय वाटचालीचा यावेळी सत्कार करून गौरव करण्यात आला.तसेच आपल्या पिता आणि पतीच्या निधनाने खचून न जाता दै नरवीर चिमाजी वृत्तपत्र पूर्वीच्याच जोमाने चालविणाऱ्या विद्यमान संपादिका श्रीमती प्रगती पाटील (देवलाल) यांनाही यावेळी गौरविण्यात आले.
स्त्रिच्या दृष्टीने जसे तीचे शील महत्वाचे, पुरुषाच्या दृष्टीने त्याचा स्वाभिमान महत्वाचा, तसेच पत्रकाराच्या दृष्टीने त्याची विश्वासार्हता महत्वाची असून सद्याच्या काळात फेक न्युज पासून पत्रकारांनी सावध राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांनी यावेळी केले.बातम्या छापणे म्हणजे पत्रकारिता नाही . पत्रकारांनी राजाश्रय मिळवण्यापेक्षा लोकाश्रय मिळवणे गरजेचे आहे . पत्रकारांनीच आत्तापर्यंत लोकशाही टिकवली आहे .पत्रकारांसाठी आजच्या काळात डिजिटल लायब्ररीची गरज आहे . तसेच पत्रकारांनी सतत चौफेर वाचन ठेवले पाहिजे असे परखड मत वसईचे माजी आमदार विवेक पंडित यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार राजेंद्र गावित, महापौर रुपेश जाधव, प्रांत अधिकारी दीपक क्षीरसागर, प्रदेश काँग्रेसचे सचिव विजय पाटील, तर अतिथी म्हणून शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख निलेश तेंडोलकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉमनिक डिमेलो, मनसेचे जयेंद्र पाटील इ. मंचावर उपस्थित होते.
वसईतील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार रॉक कार्व्हालो व वसईत पाहिले दैनिक सुरु करणारे स्व.जयसेन पाटील यांच्या कार्याच्या स्मृती चिरंतर राहाव्यात म्हणून त्यांची नांवे ते राहात असलेल्या अनुक्रमे माणिकपूर व पापडी परिसरातील रस्त्यांना महापालिकेकडून दिली जावी, अशी जाहीर मागणी संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांनी प्रास्ताविकात केली. तो धागा पकडून महापौर जाधव यांनी ही रास्त मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
खा. गावित, प्रांत अधिकारी क्षीरसागर व विजय पाटील यांचीही समयोचित भाषणे यावेळी झालीत. कार्यक्रमास प्रामुख्याने संमोहन तज्ज्ञ सदानंद बामणे, भाजपचे शेखर धुरी, दत्ता नर, अपर्णा पाटील, योगिता पाटील, केदारनाथ म्हात्रे, ध्यास फाउंडेशन च्या अध्यक्षा कीर्ती शेंडे, माजी स्थायी समिती सभापती संदेश जाधव, डिम्पल प्रकाशनचे अशोक मुळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राम पाटील, युवक काँग्रेसचे कुलदीप वर्तक, कोमसापच्या वसई शाखेचे कार्यवाह रेमण्ड मच्याडो व नालासोपारा शाखेचे अध्यक्ष रमाकांत वाघचौडे, पर्यावरण समितीचे निमंत्रक समीर वर्तक, शिवसेनेचे श्याम शिरोडकर, अतुल पाटील, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर म्हात्रे, चित्रकार सुभाष गोंधळे, मुंबई म्हाडा मंडळाचे माजी संचालक देवदास साटम,प्राचार्य माणिक दोतोंडे, लेखक स्टॅन्ली गोन्साल्वीस आदी मान्यवर उपस्थित होते.
पाहुण्यांचा परिचय संघाचे सचिव विजय खेतले, सुनील घरत, विश्वनाथ कुडू व लक्ष्मणराव पाटोळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन खजिनदार झाकीर मेस्त्री यांनी, तर आभारप्रदर्शन प्रभाकर सूर्यवंशी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!