मोडी लिपी चित्र माध्यमातून २८३ व्या जंजिरे अर्नाळा स्मरण दिनास मानवंदना

विरार : जंजिरे अर्नाळा किल्ला हा उत्तर कोकणातील जलदुर्ग श्रेणीत अत्यंत मातब्बर आणि महत्वाचा किल्ला म्हणून ओळखला जातो. किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत दरवर्षी एप्रिल महिन्यात जंजिरे अर्नाळा स्मरण दिन साजरा करण्यात येतो. यंदा देशातील कोरोना विषाणू संकटामुळे सर्वत्र अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे, यामुळे देशातील सर्वच गडकोटांवर व सार्वजनिक स्थळी कोणताही कार्यक्रम घेण्यास पूर्णपणे बंधने आहेत. दरवर्षी किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत उपक्रमात जंजिरे अर्नाळा किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार, बुरुज, आतील भाग तोरणे, पताके, रांगोळी, केळीचे खांब इत्यादीनी सुशोभित करण्यात येतात. यात समस्त दुर्गमित्र परिवार, युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर सक्रिय सहभागी होतात. यंदा समस्त दुर्गमित्रांनी सामाजिक भान, काळाची गरज, आवश्यक बंधने लक्षात घेता सर्वच गडकोटांच्या संवर्धन मोहिमा, इतिहास सफरी, विजयदिन उत्सव रद्द केलेले आहेत. उत्तर कोकण प्रांताचे इतिहास अभ्यासक डॉ श्रीदत्त राऊत यांनी जंजिरे अर्नाळा स्मरण दिनानिमित्त मोडी लिपी माध्यमातून चित्र रेखाटून जंजिरे अर्नाळा २८३ व्या विजयदिनास मानवंदना दिली. यात १७ व्या शतकातील जहाजाचे रेखाटन व त्या सभोवती मोडी लिपी अक्षरांची सजावट करण्यात आलेली आहे. यात मोडी लिपी अक्षरांत १६, १७, १८ व्या शतकातील आरमारी विषयाशी संबंधित तब्बल १०० हुन अधिक परिभाषा शब्द लिहिण्यात आलेल्या आहेत. यात कलबी गावी, आलाथ, इदलीस, अवजार, खपाटा, खारवा, खुटवा, चकती, ठोकरा, डोलजावसा अशा आरमारी शब्दांचा मोडी लिपीत समावेश करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे आजवर प्रकाशित न झालेली जंजिरे अर्नाळा आरमार मधील गलबतांची नामावली यात प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. यातच जंजिरे अर्नाळा शिलालेख व त्यातील मान्यवर व्यक्ती, कारागीर, तारखा, आदिशक्ती नामावली अशा संशोधनपर तपशीलाची नोंद यात करण्यात आलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून राऊत आरमारी परिभाषा यांचे सातत्याने संकलन करीत आहेत तसेच उत्तर कोकण मोडी लिपी मंडळ अंतर्गत त्यांनी आरमार विषयक काही किल्ले, तेथील देवता यावर लेखन प्रकाशित केलेले आहे. यंदाच्या जंजिरे अर्नाळा स्मरण दिनाचे औचित्य साधून त्यांनी जंजिरे अर्नाळा विषयावर एकूण १३ नवीन अभ्यासपूर्ण लेख पूर्ण केलेले आहेत. लवकरच हे सारे लेख विविध वृत्तपत्र माध्यमातून प्रकाशित करण्यात येणार आहेत. आजवर श्रीदत्त राऊत यांनी जंजिरे अर्नाळा किल्ल्यावर २०० हुन अधिक इतिहास मार्गदर्शन सफरी व संवर्धन मोहिमा पूर्ण केलेल्या आहेत हे लक्षात घेता जंजिरे अर्नाळा स्मरण दिनानिमित्त ही अनोखी मानवंदना आरमार अभ्याससत्र व मोडी लिपी चिकित्सा या दोन्हींना पूरक अशी आहे. सदर आरमारी परिभाषा विषयावर उत्तर कोकण मोडी लिपी मंडळ अंतर्गत मार्गदर्शनपर व्याख्यान सत्र आयोजित करण्यात येईल. 

डॉ.श्रीदत्त राऊत यांच्या मते “१७ व्या व १८ व्या शतकातील काही कापडी व कागदी नकाशे, रेखाटने पाहिली असता त्यावर मोडी लिपीतील मजकूर आजही संशोधनास मार्गदर्शक दिशा ठरतो. उत्तर कोकण मोडी लिपी मंडळ अंतर्गत उपलब्ध साधनांचा व संदर्भांचा उपयोग करत कागदी व कापडी दोन्ही प्रकारात इतिहास संकलन पूर्ण करीत आहोत.”

One comment to “मोडी लिपी चित्र माध्यमातून २८३ व्या जंजिरे अर्नाळा स्मरण दिनास मानवंदना”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!