मोतीलाल नगर पुनर्वसन लोकचळवळ व्हावी – जयंत करंजवकर

मा. मधु चव्हाण,

सभापती, म्हाडा मुंबई मंडळ.

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती म्हणून सप्टेंबरमध्ये आपण एक वर्ष पूर्ण केले. परंतु एक वर्षात अनेक वर्षे रखडलेल्या ना.म.जोशी, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाच्या कामाला सुरवात झाली ती आपल्या कारकिर्दीत. बीडीडी चाळीच्या राहिवाशांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांच्या प्रतिनिधींसोबत आपल्या कार्यालयात अनेक बैठका आपण घेतल्या. म्हाडा म्हणजे पुनर्वसनापेक्षा रहिवाशांना अनेक वर्षे संक्रमण शिबिरात कोंडून ठेवणारे प्राधिकरण असा समज मुंबईच्या रहिवाशांचा आहे. हा गैरसमज दूर करण्यात आपण कमालीचे यशस्वी झालात. त्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन… संक्रमण शिबीर म्हणजे अंदमान… अंदमान मी का म्हणतो की, एकदा का संक्रमण शिबिरात राहण्यास गेलेले रहिवाशांचे जीवनच विस्कळीत होते. संक्रमण शिबिरात राहण्यास गेल्यावर रहिवाशांना नोकरी, व्यवसाय, मुलांचे शिक्षण याबाबतच्या समस्या एक आव्हान म्हणून कायमचे उभे राहते. परंतु अनेक वर्षांची त्यांच्या कुटुंबांतील प्रत्येक व्यक्तीची जीवनशैलीच बदलून जाते. मात्र बीडीडी चाळीतील सुमारे पंधरा हजार रहिवाशांचे मन वळबिण्यास आपली शिष्टाई कामी आली. विशेष म्हणजे आपण त्यांच्या सोबत अनेक बैठका घेऊन नवीन पुनर्वसन इमारतीत प्रत्येकाला अत्याधुनिक सोयी सुविधा आणि मेंटेनन्स सवलत याची माहिती देऊन मिळणाऱ्या संधीचं कसं सोनं होणार आहे हे त्यांना समजावून सांगितले. शेवटी तुम्ही त्यांच्यासाठी करत असलेले प्रयत्न बीडीडी चाळीच्या रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनीच पुनर्वसनाच्या कामात आड येणाऱ्या रहिवाशांना मोक्का लावण्याचा आग्रह धरला आणि आता त्यांच्या पुनर्वसनाच्या कामात कुठेही अडथळा दूर होऊन पुनर्वसनाचे काम मार्गी लागले आहे. तुम्ही स्वत:हून सातत्याने त्यांच्याशी संवाद ठेवल्याने तुम्ही यशस्वी झालात, तरीही आपण त्याचे श्रेय बीडीडी चाळीतील रहिवाशांनाच देता? हा आपला स्वभाव वैशिष्टय आहे. त्याला कारणही तसेच आहे, आपणही रंगारी बदक चाळीतील दहा बाय दहाच्या खोलीत रहात होता. तेथील अनुभव लक्षात घेऊनच तुम्ही अतिशय तळमळीने आणि जीव ओतून बीडीडी चाळींच्या राहिवाशांसाठी काम केले. या रहिवाशांना एका छोटयाश्या खोलीतून मुंबईच्या उच्चभ्रू परिसरात म्हणजे मुंबईच्या हार्ट सिटीमध्ये अत्याधुनिक फ्लॅटमध्ये राहण्याचा अधिकार आपण प्राप्त करून देत आहात.

या तुमच्या प्रयत्नाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. मा.मधुभाऊ तुमची कार्यशैली पाहून मला राज्याचे माजी दिवंगत ग्राम विकास मंत्री आर.आर. उर्फ आबा पाटील यांच्या कामाची प्रकर्षाने आठवण येते. ग्रामीण भागातून आलेल्या आबांनी हालअपेष्टा भोगल्याने ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी त्यांनी संत गाडगेबाबा महाराज स्वच्छता अभियान सुरू केले. सुरवातीला आबांच्या या अभियान लोकांनी गांभीर्याने घेतले नाही, किंबहुना त्यांची टिंगल करण्यातच अनेकांनी धन्यता मानली. या स्वच्छता अभियानामुळे लोकांना स्वछ राहण्याची सवय लागली. त्यांना स्वच्छतेचे महत्व कळलेच पण त्याचबरोबर गावकरी आपले गाव स्वछ ठेवण्यासाठी एकत्र आलेत, त्यांच्यात सांघिक भावना वाढली, एकमेकात संवाद वाढला, आरोग्य सुधारले, डॉक्टरकडे जाणाऱ्या रुगणांची संख्या कमी झाली, केमिस्टच्या दुकानात औषधे विकत घेणा-यांची संख्या रोडावली. या अभियानातून गावात प्रत्येकाच्या घरी गणपती आणण्याची परंपरा मोडीत निघाली आणि ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना रूढ झाली आणि लोकांचा पैशाचा व वेळेचा होणारा अपव्यय कमी झाला. कर्ज काढून सण साजरे करण्याच्या मानसिकतेला चाप बसला. आबांचा हा उपक्रम जागतिक स्तरावर पोहचला आणि बंगला देश, सिलोन, पाकिस्तान येथील अधिका-यांनी त्याची दखल घेतली. संयुक्त राष्ट्रानेही त्याची माहिती घेतली. हे केवळ घडले ते आबांच्या स्वच्छता अभियानाला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले होते म्हणून. लोकांना त्यांच्या हिताची जाणीव निर्माण होते, तेव्हाच लोक स्वत:हून सहभागी होतात. हाच अनुभव बीडीडी चाळीच्या पुनर्वसन कामात मला दिसत आहे. लोकांना पुनर्वसनाचे महत्व आणि तीन वर्षांच्या आत आपल्या हक्काच्या ते ही उच्चभ्रू परिसरात राहण्यास जाणार आहोत हा विश्वास तुम्ही त्यांच्यात निर्माण केल्यानेच हे स्वप्न आकारास येत आहे. पण हीच बाब गोरेगाव मोतीलाल नगर पुनर्वसन कामाच्या बाबतीत घडत नाही. त्यासाठी तुम्ही मोठया प्रयासाने काम करत आहात. मोतीलाल नगरच्या रहिवाशांच्या प्रतिनिधींबरोबर अनेक वेळा बैठका घेतल्या. त्यांच्याशी कायम संवाद ठेवला, प्रसंगी त्यांच्या सूचनांचा स्वीकारही केला. सरतेशेवटी तर तुम्ही स्वत: आणि म्हाडाचे मुख्य अधिकारी बी.रघुनाथन यांच्यासोबत मोतीलाल नगरच्या गणेश मैदानात रात्री साडे नऊ पर्यंत रहिवाशांच्या शंकेचे निरसनही केले होते. स्वत: म्हाडाचे मुख अधिकारी बी. रघुनाथन यांनी मराठीतून सोप्या भाषेत अगदी बाळबोध भाषेत रहिवाशांच्या हरकती व प्रश्नांचे निरसन केले. त्या सभेतच मोतीलाल नगरमधील रहिवाशांनी गैरसमज दूर झाल्याचे सांगून आनंद व्यक्त केला. तुम्हालाही त्यांच्याशी संवाद साधल्याबद्दल आणि मोतीलाल नगर रहिवाशी तीन वर्षांत नव्या फ्लॅटमध्ये राहण्यास जाणार आहेत म्हणून आनंद झाला होता आणि ते स्वाभाविकही आहे. परंतु तुमच्या अथक प्रयत्नानंतरही मोतीलाल नगरमधील काही राहिवाशांचा पत्रा चाळीत चुकून झालेला समावेशाचे भांडवल करून त्यांच्यात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. विशेषत: पदाधिकाऱ्यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन या अभूतपूर्व पुनर्वसनाच्या कामाला सहकार्य केले पाहिजे. मोतीलाल नगरमध्ये मायक्रो सिटी उभारण्यात येत आहे. त्याचे सर्वांनी स्वागत करायला पाहिजे. रुग्णालय, वृध्दाश्रम, वसतीगृह, मैदाने, शाळा, मार्केट सुविधाने उपलब्ध होणारे मायक्रो सिटी मुंबईत तीन वर्षांत नव्याने उभे रहात आहे याचा मोतीलाल नगर रहिवाशांना अभिमान वाटला पाहिजे. केवळ पत्रा चाळीत मोतीलाल नगरमधील रहीवाशांची नावे नजरचुकीने घालण्याचा आली होती त्यांची नावे आता वगळून त्यांचा समावेश मोतीलाल नगर पुनर्वसन उपक्रमात अधिकृतपणे करण्यात आला आहे, एवढे स्पष्टीकरण करूनही काही पदाधिकारी संभ्रम निर्माण करत आहे, याला काय म्हणावे असे तुम्हाला नक्कीच वाटले असेल. बीडीडी चाळीच्या पुनर्वसन कामातही काही रहिवाशांनी विरोध केल्याने कामात अडथळा निर्माण झाला होता. हा अनुभव तुमच्या गाठीशी आहे. असा विरोध शक्यतो हा काही गटागटातील वैमन्यासातून झालेला असतो. शेवटी बीडीडी चाळीच्या  पदाधिका-यांनी व रहिवाशांनी अशा बाधा व अडथळा निर्माण करणा-या लोकांवर मोक्काची कारवाई करा अशी मागणी केली आणि पुनर्वसनाचा मार्ग सुकर झाला.

प्रश्न आहे तो रहिवाशांचा, काही मोजक्या लोकांच्या अविचाराने मोतीलाल नगरमधील ३ हजार ५०० रहिवाशांची ‘असूनी नाथ, मी अनाथ’ अशी अवस्था झाली आहे. तरीही मोतीलाल नगरमध्ये राहणारे माझे मित्र ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांना सामाजिक कामाचा अनुभव दांडगा आहे. शिवाय लोकांच्या प्रश्नांवर महापालिका व सरकारवर वाघिणीसारख्या तुटून पडणा-या पाणीवाली बाई अर्थात मृणालताई गोरे यांच्या सोबत त्यांनी काम केले आहे. त्यांचे त्या प्रेरणास्थान आहेत. विशेष म्हणजे  श्री. मोहिते हे मृणालताई गोरे यांच्या जीवनावर सध्या पुस्तक लिहीत आहेत. माझ्या मते मोतीलाल नगरमधील रहिवाशांमध्ये गैरसमज दूर करण्यास त्यांची नक्की मदत होईल असे मला वाटते. इतर अध्यक्ष सचिवांशी आपला संबंध चांगला आहे. म्हाडातर्फे आयोजित केलेल्या मोतीलाल नगर राहिवाशी संवाद कार्यक्रमात जो प्रतिसाद मिळाला त्याचे श्रेय सर्व अध्यक्ष सचिवांना द्यावे लागेल. तरी बीडीडी चाळीच्या पुनर्वसनात सर्व पदाधिका-यांनी मोलाचे सहकार्य आपणास केले. तसेच सहकार्य मोतीलाल नगरच्या अध्यक्ष सचिव आणि रहिवाशांकडून मिळेल. गोरेगाव पूर्व भागात मृणालताई गोरे यांनी नागरी निवारा परिषदेच्या माध्यमातून घरे मिळवून आजही तेथील रहिवाशी त्यांचे ऋण विसरले नाहीत.नागरी निवारा परिषद म्हणजे मृणालताई गोरे म्हणून ओळखले जाते.त्याप्रमाणे मोतीलाल नगर १,२, व ३ मधील ३५०० रहिवाशी अध्यक्ष सचिव युवराज मोहिते, रमेश शिंदे, माधवी राणे, श्रीधर शेलार हे सन्मानीय अध्यक्ष सचिव व मुंबई म्हाडा मंडळाचे नाव कायम स्मरणात ठेवतील. मुंबईत जमीन नसल्याने पालघर, पनवेल येथे आता महामुंबई वसत आहे. मोतीलाल नगरातील रहिवाशी भाग्यवान आहेत, त्यांना मुंबईतच मायक्रो सिटीमध्ये राहण्याचे भाग्य लाभत आहे. याचाही त्यांनी सखोल विचार करावा. मुंबईत घर मिळणे अशक्य आहे, अशा परिस्थितीत मोतीलाल नगरचे रहिवाशी भाग्यवान आहेत. इतरांना त्यांचा हेवा वाटल्यास आश्चर्य वाटू नये.

मा.मधु चव्हाण साहेब,  मोतीलाल नगरमध्ये मायक्रो सिटी उभारणीचे स्वप्न पूर्ण होईल, पण आर.आर. पाटील यांनी संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानात लोक सहभागी झाले आणि त्या अभियानाने लोकचळवळीचे रूप धारण केले. त्याप्रमाणे मोतीलाल नगरचे रहिवाशी पुनर्वसनाकडे लोकचळवळ सहभागी होण्यासाठी आपण प्रयत्न करावे. ते आपल्याकडून नक्कीच होईल. मुंबई म्हाडा मंडळाचे आपण सभापती आहात शिवाय मंत्री पदाचा आपणास दर्जाही प्राप्त झाला आहे. तरीही तुम्ही सर्वसाधारण कार्यकर्त्यांसारखे म्हाडामध्ये काम करत आहात. लोकांची फसवणूक करणा-या म्हाडातील दलालांना व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना तुरुंगात पाठविण्याचीही आपण हिंमत दाखविली. कारण तुम्ही तुमच्या कामात गरीब व गरजू हाच केंद्रबिंदू असतो. आपल्या प्रयत्नाला नक्कीच यश येईल, बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाचे काम मार्गी लागले तर मोतीलाल नगरचेही पुनर्वसन होईल, फक्त त्याचे लोक चळवळीत रूपांतर व्हावे, तसे प्रयत्न आपण करावे. आपणास त्याकरिता खूप खूप शुभेच्छा!

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार व स्तंभ लेखक/८३६९६९६६३९)
(jayant.s.karanjavkar@gmail.com/8369696639).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: