मोदींनी फडणवीसांची फडफड थांबवली… – जयंत करंजवकर

‘सत्तेसाठी वाट्टेल ते’, या विचाराने पेटलेले नेते आपण आजवर पाहिले आहेत. परंतु ‘पार्टी विथ डिफरन्ट’ म्हणवून घेणारे भाजपाचे खरे रूप गेली सहा वर्षे देशाने पाहिले. ३० वर्षे शिवसेनेबरोबर हिंदुत्वावर संसार मांडला आणि त्याच सेनेला सापत्नभावाने वागणूक देऊन खच्चीकरणास सुरवात केली. ‘अभी तो बालासाहब नही है, खतम करो शिवसेनाको’ असा दिल्लीचा आदेश परब्रह्म  मानून भाजपाचे नेते कामाला लागले. २०१४ विधानसभेत शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाला विचारात न घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाहेरून पाठींबा घेतला आणि २२ दिवसात मामु देवेंद्रजीना लोकांच्या इतक्या शिव्या खाव्या लागल्यात ते त्याना २२ वर्षात शिव्या कोणीही दिल्या नाहीत, असे ते स्वतः सांगत सुटले होते. इंदूमिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भूमिपूजन कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी रात्री आठ वाजता निमंत्रण देऊन अपमानित केले होते. दिल्लीत सेनेचे १८ खासदार असूनही फक्त एक बिन कामाचं मंत्रिपद दिलं आणि कमी खासदार असलेल्या रामविलास पासवान यांना अन्न व नागरी पुरवठा सारखे महत्ववाचे खाते दिले होते. अपमान… अपमान… म्हणजे काय? तो कसा असतो? याचा अनुभव प्रत्येक मराठी माणसाने त्यावेळी घेतला.  पालघरच्या लोकसभा निवडणुकीत ‘साम, दाम, दंड, भेद’ या विचाराने कसे रणांगण पेटले होते याचा अनुभवही पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राने ‘याची देही, याचा डोळा’ पाहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या छायेखाली उठाबश्या काढून बेडकी फुगविणा-या मामु (माजी मुख्यमंत्री) व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी १०५ आमदार असूनही सत्ता काबीज करण्यासाठी एका रात्री राज्यपालांना गाढ झोपेतून उठवून राष्ट्रपती राजवट उठविण्यास भाग पाडले आणि महाराष्ट्राची जनता साखर झोपेत असताना राज्यात अजितदादा पवार व त्यांच्या दहा सहका-यांना राजभवनावर आणून शपथविधी कार्यक्रम चटावरच्या श्राद्ध घातल्यासारख  पार पाडला.   

नियती ही निष्ठुर असते. अजित पवारांना घेऊन संसार थाटणा-या मामु देवेंद्रजीना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी या अनैसर्गिक पक्षांशी युती करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणले. पहिल्या शंभर दिवसात शंभर लोकोपयोगी निर्णय घेऊन आपल्या कामाचा ठसा उमटविला. मामु देवेंद्रजींना सध्या महाराष्ट्र अनाजीपंतांच्या भूमिकेत पहात आहे.  कोरोना विषाणूच्या महामारीत कशी ते हाणामारी करत आहेत हे काय सांगायला नको. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाशी समर्थपणे लढा देत असताना आणि तमाम जनतेच्या हृदयात अढळ स्थान मिळविल्याने त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. देवेंद्रजींचे स्थान जनमानसात डळमळीत होतेय हे लक्षात आले. मग त्यांनी  भाजपाची सत्ता राज्यात स्थापन करण्यासाठी आणि ते न जमल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राजभवनाचे उंबरठे वारंवार झिजविले. कशाला तर  उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर कसे निवडून येणार नाहीत याची व्यूहरचना ते करत बसलेत.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मंत्रिमंडळाने उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर सदस्य म्हणून नियुक्त करावे असा ठराव पाठवूनही ते २५ दिवस होऊनही निर्णय घेत नव्हते. दुस-यांदा ठराव केल्यावरही राज्यपाल    कोश्यारी यांनी मौन भूमिका अवलंबवली. सरतेशेवटी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र बसून दिल्लीत निवडणूक आयोगाला राज्यातील कोरोनाची परिस्थितीच्या  पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या नऊ जागेच्या निवडणूक घ्याव्यात, असे पत्र पाठविले. हा सोपस्कार पूर्ण झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून राज्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन आणि सरकार विषयीचा संभ्रम दूर करण्यासाठी  केंद्रीय निवडणूक आयोगाला राज्यात विधानपरिषदेची निवडणूक घेण्यासाठी शब्द टाकावा, अशी विनंती केली आणि सर्व सूत्रे हालली. राज्यपाल कोश्यारी यांनीही निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आणि आता येत्या २१ मे रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांचा मार्गही मोकळा झाला आणि लोकांच्या मनातील ‘राजकीय’ शंकाही दूर झाली.

यातून काही गोष्टी स्पष्ट होत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोनाशी लढाई सुरू असताना राजकारण करणे चुकीचे आहे, असे विधान करून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांचा संदेश दिला. गृहमंत्री अमित शहा यांच्याशी लागूनचालन करणारे मामू देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागा दाखवून त्यांची फडफड थांबवली. पंतप्रधानांकडे ठाकरे सरकार पडले तर कोरोना प्रार्दुभाव असताना महाराष्ट्रात राजकीय गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये. तशी घडली तर परिणाम काय होतील याचा पोलीस रिपोर्ट पंतप्रधानांकडे आलाच असेलच. हे सर्व परिणाम लक्षात घेऊनच नरेंद्र मोदी यांनी त्वरित निर्णय घेऊन मामु फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांची जागा दाखवून दिली. राजकारण केव्हाही करता येईल, पण आता ही वेळ नाही. विरोधक भाजपाचे प्रयत्न होते राज्यात अस्थिरता व संभ्रम  निर्माण करण्याचे. राजकारण कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो. आज विरोधात असलेली शिवसेना भविष्यात तिचे कधीतरी सहकार्य घेण्याची वेळ भाजपावर येऊ शकते याचा विचारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्कीच केला असेल. आता तरी फडणवीस काही तरी बोध घ्यावा आणि बालिश राजकारणाला मूठमाती द्यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहा महिन्यात महाराष्ट्रातील व देश पातळीवर सहानुभूती व चांगल्या कारभाराचा मोहोर कसा उमटविला याचा विचार भाजपाने केला तर त्यांचा पक्षही फिनिक्स पक्षासारखा राखेतून उंच भरारी घेऊ शकतो.

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार व स्तंभ लेखक/९८२०३३३७१०/jayant.s.karanjavkar@gmail.com)                   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!