मोबाईलशी खिळून राहणे हा दुर्गुण खरा आपला दुष्मन आहे – डॉ.अपर्णा निजाई

नालासोपारा (प्रतिनिधी) : आपले घर हा आपला देश आहे. आणि आज आपल्या देशाला कुणा दुष्मन राष्ट्रांकडून जेवढा धोका नसेल तेवढा तो आपल्या घरघरात शिरलेल्या शत्रूकडून आहे आणि तो शत्रू आहे. स्मार्ट मोबाईलचा अतिवापर, अनावश्यक वापर म्हणजेच मोबाईलशी खिळून राहणे. वैद्यकीय दृष्टया ते शरीराला अपायकारक ठरू शकते. मानसिकता सुध्दा बिघडू शकते. आज घराघरात मुले कार्टुन फिल्म, महिला आणि वरिष्ठ मालिका आणि चित्रपट, क्रीडा शौकीन क्रीडा वाहिन्या, सेवावृत्त आणि रिकामे रिकामे कार्यकर्ते बातम्याच बातम्या पाहण्यात गर्क आहेत. आणि आजचा विद्यार्थी मोठया प्रमाणावर मोबाईल आणि इंटरनेटच्या विश्वात बांधला जातो आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झालाच पाहिजे मात्र त्याने मानवी जीवन यंत्रवत होत असेल तर, संवेदनशीलता हरवली जात असेल तर आपण सावध झालेच पाहिजे. विद्यार्थी वयातच आपली पावले मैदानं आणि रंगमंचाच्या दिशेने वाटचाल करणारी पडतात. ती मोकळीक मिळाली तर विद्यार्थ्यांना मैदानावर किंवा रंगमंचावर अधिक आत्मविश्वासाने व्यक्त होण्याची संधी मिळते.मग ते कायमचे सरावात आणि तरारीत असतात. जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची सक्षमता त्यांच्यात निर्माण होते. म्हणून आज आपण आपल्या नेमक्या शत्रूला ओळखले पाहिजे.

पूर्वी ‘आळस’ हा माणसाचा शत्रू आहे असे शिकविले जात होते. आज मोबाईल ऍडिक्शन किंवा खिळून राहणे हा शत्रू आहे असे शिकविले जात आहे. असे विचार मांडत डॉ.अपर्णा निजाई यांनी इशारेवजा सल्ला नालासोपारा येथे बोलताना उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

शहरातील स्व.राजीव गांधी विद्यालयात त्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळयात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या होत्या. उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक, विद्यालयाचे विश्वस्त, कर्मचारी वर्ग यांच्याशी त्यांनी संवाद साधला. विद्यार्थीच नव्हे तर शिक्षिका सुध्दा मोठया उत्साहात समूह नृत्य सादर करतात येथे. एका प्रकारे प्रशिक्षणच इथे दिले जाते आहे. या सर्व सादरीकरणात शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम ठळकपणे दिसून आले. काही मुलींनी तर आमची मनं जिंकली आहेत. मुलींचे पदलालित्य आणि मुद्राभिनय अफलातून होते. अशा शब्दांत राष्ट्रभक्ती वर आधारित गीतनृत्यं सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुकही डॉ.निजाई यांनी केले.

सकाळी विद्यालयाचे नेहमीप्रमाणे ध्वजारोहण ध्वजवंदन, राष्ट्रगीत, ध्वजगीत, विद्यार्थी दलांचे संचलन झाले. प्रजासत्ताक दिनाच्या या सोहळयात, नगरसेवक किशोर पाटील,माजी नगरसेवक व विश्वस्त प्रकाश पाटील, स्व.अ.के.पाटील एज्युकेशन ट्रस्टचे पदाधिकारी सीमा पाटील, एड.रमाकांत वाघचौडे, किशोर हरिया, बन्सीलाल त्रिवेदी, स्मिता पाटील, मुख्याध्यापिका सीमा पिल्ले, शुभांगी पवार, दर्शना वझे, कार्यालय प्रमुख फातिमा पिंटो, आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन शिक्षिका शुभांगी पवार, ज्योती गायकवाड,मिनाक्षी भगत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!