मोहम्मद अझरुद्दीन आहेत वसई महोत्सवाचे उदघाटक

वसई (प्रतिनिधी) : ३०व्या वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवाचे उदघाटक म्हणून देशाचे थोर क्रिकेटिअर व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन हे असणार आहेत. गेल्या वर्षी भारतरत्न सिचन तेंडुलकर हे पाहुणे या महोत्सवाला लाभले होते. लोकनेते आम.हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा उदघाटन सोहळा २६ डिसेंबर रोजी सं.४.३० वाजता वसईच्या चिमाजी आप्पा मैदानावरील मा.दत्ताराम रंगमंचावर सुरु होईल. या वेळी आम.क्षितीज ठाकूर, आम.राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, महापौर प्रवीण शेट्टी, प्रधम महपौर राजीव पाटील, प्रथम महिला महापौर प्रविणाताई ठाकूर, माजी महपौर नारायण मानकर, रुपेश जाधव, महापालिका आयुक्त व अन्य अधिकारी या सोहळयात सहभागी होणार आहेत. या आधी दु.२ वाजता यंदाच्या क्रीडा ज्योतिचे प्रज्वलन आम.क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते विरार टोटाळे तलावकाठीच्या वीर सावरकर पुतळयाजवळ होईल.

मिरवणुकीने ही ज्योत वसईच्या महोत्सवाच्या ठिकाणी आणली जाणार असल्याची माहिती आयोजन मंडळाचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी काल वसईत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. काल क्रीडा भवनात ही पत्रकार परिषद झाली. महोत्सवाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा.माणिकराव दोतोंडे, मनोहर पाटील, विजय चौधरी, कला विभागाचे प्रमुख अनिल वाझ, राजेश जोशी, प्रशांत घुमरे, प्रसिध्दी प्रमुख रमाकांत वाघचौडे, महापालिकेच्या सभापती माया चौधरी, प्रितेश पाटील हे मान्यवर या वेळी व्यासपीठावर होते. यंदाही स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद या महोत्सवाला लाभला असून ही संख्या ५५ हजारांवर जाईल असे वनमाळी यांनी जाहीर केले.

 बास्केटबॉल, रिंग फुटबॉल आणि कला विभागात काव्य वाचन, ज्येष्ठांचे कलागुण दर्शन अशा नव्या स्पर्धांचा समावेश यंदा करण्यात आला आहे. तर नेहमीच्या स्पर्धा सुध्दा वेळापत्रका प्रमाणे होणार आहेत. कलेच्या ३४ आणि क्रीडेच्या ३४ अशा एकूण ६८ स्पर्धा आणि बालगट ते वयस्कांच्या गटात होत आहेत.

कबड्डीला २३५ संघ : विविध  गटातील तब्बल २३५ कबड्डी संघांनी भाग घेऊन यंदा नवा विक्रम नोंदवला आहे. त्या खालोखाल खोखो ला ८९, लंगडी ५४, लगोरी २६ संघ आपले कसब सिध्द करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

स्पर्धा ठिकाणं नवी : यंदाच्या बास्केटबॉल स्पर्धा या गोखिवरे येथील मधुवन काँप्लेक्स मैदानावर तर जलतरण स्पर्धा ही तामतलाव येथील तरणतलावात होणार आहेत. रिंग फुटबॉल स्पर्धा महोत्सवाच्या मैदानावर होणार आहे.यंदाच्या गुणगौरव समारंभात या सरत्या वर्षात ज्यांनी राज्य, राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष यश वा पुरस्कार प्राप्त केले आहेत अशा गुणवंतांचा गौरव करण्यात येणार आहे.

गर्दी खेचणारे इव्हेंट :  वसई श्री ही शरीर सौष्ठव स्पर्धा (२९ डिसेंबर)., मिस्टर ऍंड मिस पर्सनॅलिटी सौंदर्य स्पर्धा., (२८ डिसेंबर). कोळी गीतांवर आधारित प्रसिध्द अरुण पेदे वेसावकर यांचा बहारदार कार्यक्रम (३० डिसेंबर)., शाम शानदार हा सिनेसंगीत व नर्तनाचा शो (६ डिसेंबर)., धनंजय म्हसणेकर यांचा लोकगीत नजराणा (२६ डिसंबरे)., कला विभागाच्या स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होणार असून नव्या रंगमंचाला नटसम्राट स्व. श्रीराम लागू यांचे नाव देण्यात आले आहे.

३१ डिसेंबर रोजी या महोत्सवाचा समारोप समारंभ आहे. सं.६ वाजता तो मा.दत्ताराम रंगमंचावर सुरू होईल. या वेळी आम.हितेंद्र ठाकूर, मंडळाचे पदाधिकारी भाऊसाहेब मोहोळ, हेमंत म्हात्रे, प्रा.द.वि.मणेरीकर, रेमंड डिसिल्वा, सुरेश वायंगणकर, जितेंद्र शहा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

नालासोपारा गायब :  या ३० व्या महोत्सवाची निमंत्रण पत्रिका पाहिली तर त्यात नालासोपारा विभागातील एकाही व्यक्तीला स्थान देण्यात आले नाही. सर्व मान्यवर विरार, माणिकपूर आणि वसईचे आहेत. वसई महोत्सवांच्या या ३० वर्षांच्या वाटचालीत नालासोपारा शहर आणि येथील कलावंत, क्रीडापटू,आणि कार्यकर्त्यांचे काहीच योगदान नाही का? असा सवाल या निमित्ताने काही सोपारकर कार्यकर्त्यांनी केला आहे. नालासोपारा शहरावर एवढा कसला राग काढला जातो आहे असा प्रश्न केला जातो आहे. हा एखाद्या व्यक्तिचा नाही तर या शहराच्या गुणवत्ता व नेतृत्वाचा अवमान असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

ज्येष्ठ पत्रकारांना आदरांजली :  काल झालेल्या पत्रकार परिषदेत सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार स्व.निलकंठ खाडिलकर, स्व.मधू शेटये आणि वसईचे स्व.भालचंद्र म्हात्रे, ज्येष्ठ समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी  यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तर गेल्या वर्षी आणि यंदा राज्य नाटय स्पर्धा गाजविणाऱ्या व्यक्ती म्हणून विरारचे रंगकर्मी राजेश पाध्ये, नालासोपाऱ्याचे रमाकांत वाघचौडे, वसई प्रयत्न रंगमंचचे तुषार घरत यांचे अभिनंदन करण्यात आले. कला विभाग प्रमुख अनिल वाझ यांनी आपल्या आभार प्रदर्शनात उपस्थित पत्रकार व वसईकरांना पवित्र नाताळसणाच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान रुपेश जाधव हे माजी महापौर यांना निमंत्रण पत्रिकेत स्थान आहे. ते त्यांच्या पदामुळे आहे. ते एकमेव या चळवळीत आहेत का? असाही प्रश्न विचारला जातो आहे. शिवाय महापालिकेच्या नावापासूनच नालासोपारा हे नाव का वगळण्यात आले ? याचेही उत्तर महापालिकेने द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!