म्हाडाच्या माध्यमातून गोरगरिबांच्या विकासासाठी झपाटलेला पत्रकार ‘जयंत करंजवकर’ ! – योगेश त्रिवेदी

‘अरे योगेश ! आज काय बातमी बनवू या ? मी बघ, अशी अशी बातमी केली आहे. आताच्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने आपल्याला या बातम्यांमध्ये काय आणि कसे उल्लेख करता येतील ? मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चांगले काम करीत आहेत. पण आपल्याला गोरेगावच्या मोतीलाल नगर आणि बी.डी.डी चाळीच्या पुनर्वसनासाठी जोर लावला पाहिजे. मधु चव्हाण झपाटून काम करताहेत पण म्हणावी तशी त्यांना प्रसिध्दी मिळाली तर ते सोन्याहून पिवळे होईल. आज आर.आर आबा हवे होते, त्यांनी जशी ग्रामस्वच्छता अभियान ही लोकचळवळ म्हणून उभी केली होती तशीच मोतीलाल नगर च्या पुनर्वसन प्रकल्पाची लोकचळवळ बनली पाहिजे !’  गेल्या काही दिवसापासून जयंत करंजवकर आणि मी, अशा आमच्या दोघांत हा संवाद सतत होत असतो. जयंतराव करंजवकर ! एक बातमीसाठी झपाटलेला, बातमीवर जबरदस्त प्रेम करणारा परखड पत्रकार आणि परोपकारी परममित्र अशी जयंतरावांची ओळख करून द्यावी लागेल. मंत्रालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वरिष्ठ सहाय्यक संचालक पदावरून काही वर्षांपूर्वी जयंतराव निवृत्त झाले. ३८ वर्षे शासनाच्या सेवेत काम केल्यानंतरही पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे पूर्णपणे पत्रकारिता न थकता, न दमता त्यांनी सुरु ठेवली आहे. अनिकेत जोशी यांच्या बित्तंबातमी साठी तर ते झोकून देऊन काम करतात. कृष्णाभाऊ  शेवडीकर यांचा नांदेड चा श्रमिक एकजूट असो, घनश्याम गोसावी यांचा मुंबईतील वृत्तमानस असो, अभिजित राणे यांचा मुंबई मित्र असो  की नागपूर येथील श्रीकृष्ण चांडक यांचा महासागर असो मग अगदी कोकणातील राजन चव्हाण यांच्या वृत्तपत्रासाठीही जयंतराव लगबगीने काम करताना दिसतात. किरण ठाकूर-नरेंद्र कोठेकर यांचा तरुण भारत संवाद सुध्दा याला अपवाद नाही. सरकारी सेवेत काम करणारा कर्मचारी काम करू शकतो ? या प्रश्नांचा सडेतोड उत्तर म्हणजे जयंत करंजवकर. कौटुंबिक जबाबदारी अंगावर लवकर पडल्यामुळे गिरगावात राहणाऱ्या जयंत करंजवकरांना सरकारी नोकरी पत्करावी लागली.  भावंडांचे संसार उभे करणे आणि स्वत:चा प्रंपच चालवणे ही दुहेरी कसरत करताना अर्धांगिणीचा हातभारही  मोलाचा ठरला. ज्योत्स्ना वहिनींनी पण केंद्र सरकारची नोकरी करुन त्या निवृत झाल्या. अमय आणि अक्षय ही सोन्यासारखी मुले पण स्वत:च्या पायावरी उभी राहिली.असे असले तरी समाजसेवेचा आणि पत्रकारितेचा वसा घेतलेले जयंतराव स्वस्थ बसूच शकत नाहीत आणि बसणारही नाहीत. वाचन आणि लेखन, सामाजिक काम हा तर त्यांचा प्राणवायूच ! वाचनाची प्रचंड आवड असलेल्या जयंतरावांनी मराठी, हिंदी, इंग्रजी पुस्तकांचे अक्षरश: अनेक कप्पे वाचून पूर्ण केलेत. निरनिराळया कल्पना त्यांच्या डोक्यात येणार आणि त्या पूर्ण करण्यासाठी ते अहोरात्र झटणार याचा अनुभव फार जवळून घेतलाय.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट सैनिक असलेले जयंत करंजवकर ! गिरगावची प्रमोद नवलकरांची शाखा १९६८-६९ च्या काळात उभी करण्यात सिंहाचा वाटा जयंतरावांचा. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांवरची साहित्य संपदा त्यांनी संपूर्ण वाचून काढली. या प्रेमामुळेच त्यांच्या डोक्यातून बाळासाहेबांवरचा पोवाडा तयार करण्याची कल्पना सुचली आणि हा पोवाडा नंदेश आणि संदेश उमप यांच्या सहकार्याने शाहीर विठ्ठल उमप यांच्या पहाडी आवाजात गाऊन घेतला. इतकेच नव्हे तर त्यांच्या आवाजातल्या या पोवाडयाच्या सीडीचे प्रकाशन ‘मातोश्री’वर २० जानेवारी २०१० रोजी दस्तुरखुद्द बाळासाहेबांच्या शुभहस्ते घडवून आणले. डॉ. निलम गोऱ्हे यांच्या सहकार्याने प्रकाशनासाठी बाळासाहेबांनी केवळ १०  मिनिटेच दिली होती. पण बाळासोहब आणि शाहीत विठ्ठल उपम एकत्र आले आणि जी मौफील जमली त्यात तास दीड तास कुठे गेला हे कळलेच नाही. हा आविष्कार होता जयंत करंजवकरांचा.

मंत्रालयात काम करताना गजानन कीर्तिकर, प्रभाकर मोरेंपासून तर आर.आर. पाटील, छगन भुजबळ यांच्यापर्यंत मग ते मंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री या सर्व पदावर असताना जयंतराव करंजवकर आणि वसंतराव पिटके यांनी माहिती खात्याचे विभागीय संपर्क अधिकारी ते जनसंपर्काधिकारी म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. आर.आर. आबा ग्रामविकास मंत्री असताना त्यांचे ‘जलस्वराज्य’ हे पुस्तक जयंत करंजवकरांनी अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केले. त्यांचे सर्वत्र कौतुकही झाले. त्यामुळेच संत गाडगे बाबांचे परम भक्त म्हणूनही आर आर आबांची पुढे ओळख रुढ झाली. आर आर आबांची स्वच्छतेची संकल्पना आता केंद्रात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सर्वांच्या हाती झाडू आला. यातही जयंत करंजवकरांचा खारीचा वाटा म्हणावा लागेल.

जयंत करंजवकरांनी स्वत: असंख्य खस्ता खाल्ल्या पण मित्रांचे भले कसे होईल, याचाच त्यांनी सदैव विचार केला. बाळासाहेब ठाकरे म्हणत त्याप्रमाणे ‘माशाचे अश्रू’ कुणाला दिसत नाहीत, हेच इथेही लागू पडते. ३५ वर्षांपूर्वी जयंत करंजवकर यांची आणि माझी भेट झाली आणि आम्ही एकमेकांचे जिवलग मित्र कसे झालो हे कळलेच नाही. जयंत करंजवकर, प्रभाकर राणे, राजन चव्हाण, देवदास मटाले आणि मी गेल्या ३५ वर्षांपासून एकत्र आहोत.

राजन चव्हाण सिंधुदुर्गात स्थायिक झाले असले तरी त्यांच्या मायेची पाखर सदैव असते. आजही जयंतराव, अनिकेत जोशी, खंडुराज गायकवाड आणि मी राजकीय पत्रकारितेच्या निमित्ताने एकत्र फिरत असतो. मध्यंतरी जयंतरावांच्या मेंदूवर मोठी शस्त्रक्रिया झाली. पण शस्त्रक्रिया झाल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी त्यांनी चक्क इस्पितळातूनही बातम्या पाठवायला मागेपुढे पाहिले नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतांना गेल्या सप्टेंबर महिन्यात त्यांनी महामंडळाच्या नेमणुका केल्या. मुंबईतील महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या अध्यक्ष पदावर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मधु चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली. भारतीय जनता पक्ष आणि प्रसिध्दी म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू. भारतीय जनता पक्षाच्या छोटयातल्या छोटया कार्यकर्त्यांच्या बातम्या मोठया नेत्यांना टक्कर देतील अशा असतात. होर्डिंग्ज तर पहायला नको. मोदी शाह.पेक्षा यांचीच छायाचित्रे मोठी असतात. पण मधू चव्हाण हे मात्र या सर्वांना अपवाद ठरले. त्यांच्या छोटया छोटया बातम्या सुध्दा येणं अवघड. हेच जयंत करंजवकर यांनी हेरलं आणि योगेश, आपण मधू चव्हाण यांना मदत केली पाहिजे असे त्यांनी बोलून दाखवले. मधु चव्हाण यांची आणि आमची मैत्री जूनी. आम्हा दोघांवर मधु चव्हाण यांचा फार जीव. म्हाडा ची सूत्रे मधु चव्हाण यांनी घेतल्यानंतर त्यांनी जसा कामाचा झपाटा लावला तसेच जयंतराव पण.पेटून उठले. बीडीडी चाळ असो की मोतीलाल नगर या ठिकाणच्या रहिवाशांना चांगली घरे मिळणे, योग्य प्रकारे पुनर्वसन होणे यासाठी मधु-जयंत ही जोडी अधिकाऱ्यांच्या मदतीने जीवाचे रान करीत आहेत. अहोरात्र मेहनत घेत आहेत. प्रसिध्दी पत्रके असोत, लेख असोत की लेखमाला असो, अत्यंत परीश्रमपूर्वक ती तयार करुन आपल्या पूर्वीच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अनुभव गाठीशी असल्याने त्याचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी जयंत करंजवकर हे काम करतांना दिसून येतात. निरपेक्षपणे काम करुन गरजू आणि गरीब लोकांना रहायला घर मिळावे, यासाठी मधु चव्हाण आणि जयंत करंजवकर हे झटताहेत. बातमी, लेख , लिखाण हाच जयंत करंजवकर यांचा प्राणवायू आहे. त्यांच्या हातून पत्रकारितेची अखंड सेवा घडो, गोरगरिबांना आपल्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी ऊराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण होवो,  यासाठी त्यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य लाभो हीच परमेश्वेर चरणी प्रार्थना !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!