म्हात्रे खून खटल्यात पोलीसांवर ऍट्रॉसिटी लावण्यास टाळाटाळ

वसई (वार्ताहर) : ३० वर्षे गाजत असलेल्या वसईतील यादव म्हात्रे खून खटल्यात पोलीस अधिकाऱ्यांवर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

वसई-कामण येथील सामाजिक कार्यकर्ते यादव म्हात्रे यांची जून १९८७ मध्ये गोळया झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी खऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी गणपत तुंबडा आणि त्यांचे मुलगे अशोक आणि दिलीप या तिघांना गोवून अटक केली होती.त्यांनी गुन्ह्यांची कबुली द्यावी यासाठी त्यांना पोलीस कोठडीत बेदम मारहाण करण्यात आली होती. ९० दिवसांनी त्यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर अशोक तुंबडा यांचा मृत्यू झाला. तर वर्षभरात गणपत तुंबडा यांचाही मृत्यू झाला,आणि दिलीप तुंबडा विकलांग झाला.

दरम्यान,या खूनातील प्रत्यक्ष साक्षीदार यादव म्हात्रे यांचे बंधु गंगाधर म्हात्रे यांच्या साक्षीवरून तुंबडा कुटुंबाची न्यायालयाने निरपराध सुटका केली होती. त्यामुळे निरपराध असलेल्या तुंबडा कुटुंबाला गोवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी म्हात्रे यांनी मानव कल्याण परिषदेच्या माध्यमातून अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाकडे केली होती.

त्यावर २४ डिसेंबर २०१८ रोजी दिलेल्या आदेशात आयोगाने दोषी अधिकाऱ्यांवर ऍट्रॉसिटी  लावण्यात यावी. तसेच संबंधीत तुंबडा कुटुंबाला भरपाई दाखल पाच एकर जागा देण्याचा विचार करावा,असे म्हटले होते. तसेच ३० दिवसांत याबाबत कारवाई करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. मात्र,त्यावर कारवाई न झाल्यामुळे ८ जुन २०१९ ला आयोगाच्या सदस्या माया इनवटे यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली होती. त्यानंतरही सहा महिने उलटून गेल्यामुळे विश्व मानव कल्याण परिषदेचे रामजी संजोग,आदिवासी एकता परिषदेचे काळुराम दोधडे आणि राजु पांढरा यांनी आयोगाकडे तक्रार केली. त्यावर इनवटे यांनी पुन्हा एक महिन्यात कारवाई करण्याचे आदेश २४  डिसेंबरला दिले. मात्र,आदेशालाही महिना उलटून कारवाई न झाल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!