युद्ध वा युद्धजन्य परिस्थिती नकोच,पण युद्ध आणि युद्धच जगणाऱ्या देशाची ही कथा… – निलेश मदाने

जगाच्या नकाशावर उभट टिकली सारखा दिसणारा एक ठिपका.भूप्रदेशानं इतका छोटा हा देश. मागे शेकडो वर्षांच्या छळवणुकीचा इतिहास. दुसऱ्या महायुद्धात तर साठ लाख बांधवांचं शिरकाण छळछावण्यात झालेलं. रक्तपाताचं हे प्राक्तन नशिबी घेत 1948 साली हे राष्ट्र म्हणून जन्माला आलं खरं…पण नवजात अर्भकावर चारी दिशेनं हिंस्त्र श्वापदे धावून यावीत त्याप्रमाणे या देशाला जन्माप्रसंगीच युद्धाला सामोरं जावं लागलं. राष्ट्रस्थापनेचा जल्लोष साजरा करण्याची संधी देखील देशवासियांना मिळू नये हे या देशाचे भोग. लादलं गेलेलं युद्ध या देशानं मोठ्या हिंमतीने लढलं. जन्माप्रसंगीच जन्माची अद्दल शेजारील शत्रूंना घडविली. हाच धडा पुढे ‘आक्रमकता हाच बचाव’ म्हणून पुढे मान्यता पावला. अल्पावधीत गुप्तहेर संस्था व तिचे जाळे असे उभारले की भल्या भल्या नव्हे तर साक्षात म्हसत्तांनाही तिचे नाव घेताच कंप सुटावा. थॅचर बाईंच्या आधी आयर्न लेडी पंतप्रधान याच देशानं दिली. सैनिकांनी जीवाची बाजी लावून भूप्रदेश जिंकायचा आणि नेतृत्वाने तो शांतीपाठ वाचत तहात गमवायचा असं उदाहरण इथं सापडणं मुश्किल. अखंड सावधचित्त आणि  अष्टावधानी हा आपल्या महाराजांचा गुणविशेष यांच्या जगण्याचा नित्यधर्म. भूप्रदेश जिंकताच तिथं विद्युतवेगानं लोकांचं स्थलांतर आणि नागरीवस्तीची उभारणी. असे वाटावं की जणू हा भाग म्हणजे यांची पूर्वापार जहागिरी.
दुसऱ्या महायुद्धात नाझींचा पराभव झाला खरा पण त्याअगोदर दोस्त राष्टांच्या इतकीच  पोलंड, रशिया आणि जपान यांना अपरिमित जीवितहानी सोसावी लागली. विजयानंतरच्या न्यूरेंबर्ग खटल्यात नाझी अधिकाऱ्यांना युद्ध गुन्हेगार घोषित करून खटला चालवीत फाशी देण्यात आले. हाती न लागलेल्या परंतु नाझीविजयकाळात छळछावण्यात नरराक्षस बनून माणसं मारणाऱ्या नाझींना याच गुप्तहेर संघटनेंनं वेचून वेचून ठार मारलं.
छळछावण्यांचा खर्च सोसण्यापेक्षा यांना निर्जन स्थळी ठार मारणं उचित असे सांगत अनेकांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या…त्यानंतर बंदुकीच्या गोळीच्या खर्चापेक्षा गॅस चेंबर हा पर्याय फ्युररच्या गळी उतरविण्यात छावणीचा अधिकारी यशस्वी ठरला होता. त्याचे नावही अॅडोल्फच. हा पुढे अर्जेंटिनात सटकला आणि तेथे नाव, वेष पालटून कंपनी कामगार म्हणून राहू लागला…या गुप्तहेर संघटनेने त्याला 15 वर्षानंतर हुडकून काढलाच… मायदेशी आणत खटला चालवीत फाशीवरही लटकावले…
…युद्ध हे कोणत्याच समस्येवरचं उत्तर नाही हे खरं. पहिल्या महायुद्धानंतरच्या व्हर्सायच्या तहात दुसऱ्या महायुद्धाची बीजे पेरली गेली होती हे आपण जाणतोच. असं असतांनाही युद्ध वा युद्धजन्य परिस्थिची छाया मानवजातीचा पिच्छा काही सोडायला तयार नाही.आत्मसंयम आणि आत्मज्ञान यांना गौतम बुद्धाच्या शिकवणुकीत अग्रस्थान. पण, बामयानमध्ये तर तालिबानींनी बुद्धाच्या महाकाय आणि विश्ववारसा असणाऱ्या मूर्तींना स्फोटके डागून उडविण्याचे पातक केले…डायरेक्ट अॅक्शनचा नरसंहार 1947, टोळीवाल्यांचा काश्मीर हल्ला 1948, 1961, 1965, 1971, कारगील 1999 ही सीमेवरील युद्धमालिका. पुलवामापर्यंत देशांतर्गत घातपाती मालिकांची यादी तर फार मोठी आहे. ताशकंदला एक पुण्यात्मा आपण गमावला. दुसऱ्या पुण्यात्म्याने आकाशात कबुतरे आणि लाहोरला विश्वासाने बस सोडली. त्याला पलीकडून कारगिलचे आक्रमण हे रिटर्न गिफ्ट मिळाले. पंतप्रधान माता आणि त्यानंतर तिचा सुपुत्र अशाच दहशतवादी हिंसाचारात आपण गमावले. रोज जवान आणि नागरिक यांची बलिदानाची यादी वाढतच आहे…ही मालिका संपणार कधी ?? त्या चिमुकल्या देशात युद्ध वा युद्धजन्य परिस्थिती हा तिथल्या सामान्य नागरी जीवनाचा भाग बनलाय…सैनिकी सेवा सक्तीची आहे, तरुणींनासुध्दा… आपल्याकडे अशी परिस्थिति उदभवू नये यासाठी प्रार्थना. आपण युद्धखोर कधीच नव्हतो आणि नसू ; पण युद्ध लादले गेलेच तर हा आकाराने छोटा परंतु सामर्थ्य आणि इच्छाशक्तींने विजिगीशु देश आपल्याला खूप काही सांगत राहिल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!