येत्या १४ डिसेंबर रोजी विरार येथे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन

वसई  (प्रतिनिधी) : शिक्षक भारतीतर्फे राज्यात दरवर्षी आयोजित केले जाणारे शिक्षक साहित्य संमेलन यंदा विरार येथील विवा महाविद्यालयात येत्या १४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे ९ वे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन असणार आहे. या संमेलनाचे उद्धाटन ९३ व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या हस्ते होणार आहे, तर ख्यातनाम साहित्यिका डॉ.प्रज्ञा दया पवार या संमेलनाध्यक्ष असतील.

या आधीची झालेली आठ संमेलने मुंबईत रवींद्र नाटय मंदिर येथे (२०१०) साली पहिले, तर दुसरे राजा शिवाजी विद्यालय, दादर (२०१२) येथे, (२०१३) साली ठाणे, येथील गडकरी रंगायतन येथे तिसरे झाले. चौथे बुलढाणा (२०१४) येथे तर पाचवे रवींद्र नाटय मंदिर दादर येथे, सहावे (२०१६) साली मालगुंड , रत्नागिरी येथे तर सातवे मुंबईत दामोदर हॉल (परळ) तर आठवे गोंदिया येथे पार पडले. या ९ व्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाची पूर्वतयारी विरारमध्ये जोरात सुरु आहे.असे संयोजक कार्यकर्ते अमोल पाटील यांनी सांगितले.

आजच्या एकूणच शिक्षणात माय मराठीच्या भाषा आणि साहित्य संवर्धनाचा मुद्दा ऐरणीवर आहे, तर विद्यार्थी जीवनावर शाळा महाविद्यालयातून आपल्या मातृभाषेचे संस्कार उत्तम प्रकारे जतन करुन भाषा साहित्यातील आकलन व प्रज्ञेचा, बोध, शिक्षणातून व शिक्षकाकडून मिळावा तसेच या मराठी साहित्याचे मानवी जीवनासाठीचे प्रयोजन सांगणारे आजचे शिक्षक व त्यांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी भाषा आणि साहित्य अध्यापनाच्या आशय समृध्दीसाठी या संमेलनात विचार मांडला जाणार आहे.

लोक भारतीचे पदाधिकारी शिक्षक साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष जयवंत पाटील, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालींदर सरोदे, संयोजक विलास परेरा, अमोल पाटील, विवा महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी तसेच शिक्षक भारतीचे राज्य पदाधिकारी व पालघर जिल्हा पदाधिकारी मेहनत घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: