राजकारण्यांनो, अरे स्वतः सारी सत्ता उपभोगून जनतेला कितीकाळ मरणयातना भोगायला लावणार ?  – सौ. रेखा शां. बोऱ्हाडे       

होळी झाली तेंव्हा बाल्कनीत उभी राहिली होती. सहज लक्ष गेलं, छोटी छोटी मुलं रंगात न्हाऊन निघाली होती. आणि एकमेकांच्या अंगावर रंगांची उधळण करत होती, त्यांना बघताक्षणीच भान हरपून गेले स्वतः चे बालपणीचे दिवस आठवले. काय वेगळी मजा होती. पण प्रत्येक काळ हा त्या त्या परिस्थितीशी मिळता जुळता असतो हे कळले आणि हा विचार करत होते तेवड्यात मुलं दारात ‘ऐनाक बायनाक’ करत कधी आली ते कळलेच नाही. सगळे जोर जोरात ओरडत होते, “काकी, ऐनाक बायनाक, घेतल्या शिवाय जायनक !” गोंधळ ऐकून मी प्रेमाने 100 रुपयांची नोट देऊ केली. परंतु ती नोट न घेता परत मुलांनी ओरडा सुरू केला.  काकी मोठी नोट द्या नां ! मी म्हटलं, अरे ही मोठीच नोट आहे. हो, पण अशी मोठी नोट नको 500 ची पाहीजे.  परत आत जाऊन 200 रु ची नोट आणली आणि कशी बशी हातात दिली. आनंदाने नोट घेऊन ओरडत “काकी थँक्स” म्हणत निघून गेली. मुलांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर लगेच उमटलेला दिसला. अगदी 200 रुपये मिळाले तरीही तेच. अगदी मोठ्यांच्या विरुद्ध. त्यांना कितीही खोकी द्या नाहीतर पेट्या द्या, मन समाधानी नसतंच मुळी. तुम्ही म्हणाल की आता होळी धुळवडीच्यावेळी एकदम मोठ्यांवर का घसरलात ?  कारण अहो, आता निवडणुकीचे वारे वाहू लागलेत नां, म्हणून !  कित्येक दिवस झाले निवडणुका जाहीर झाल्या पासून बरंच काही लिहिन म्हणत होते पण राहूनच जात होते. वाटत होते की काय लिहावे की लिहू नये. लिहून काही फायदा तर नाही. पण परत विचार केला की आपण आपल्या विचाराच्या माध्यमातून इतरांचे विचार तरी प्रगट करू शकतो व म्हणून हे लिहिण्याचे धाडस करत आहे.      तुम्ही बघतच आहात निवडणुका जाहीर झाल्यापासून कशी पळवापळवी सुरू झाली आहे. पण ही पळवापळवी फक्त खुर्ची साठी. खुर्ची मिळवण्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल, पण ती मिळवणारच. हो पण ती मिळवून लोकांचं काय भलं होतं याचा कधी विचार केला काय ? जी जनता ही खुर्ची देते तिला कोण विचारणार ? पण ती मिळविण्यासाठी मिळत नाही तोपर्यंत पायांच्या टाचा घासायला लागल्या तरी चालतील. त्या साठी दारोदारी जाऊन मतांची भीक मागायची पण एकदा खुर्ची मिळाली की त्याच जनतेला विचारायचंही नाही. सर्व सामान्य जनता काय हाल सोसते हे देखील माहीत नाही. पण निवडणुकीच्या काळात लाखोंनी/करोडोंनी पैसा खर्च होतो, परंतु हाच पैसा कधी एकाद्या संस्थेला किंवा गरजू व्यक्तीला उचलून दिला जाईल का ?  कधीच नाही. प्रत्येक जण स्वतः चा विचार करतो. आता हेच बघा अमोल कोल्हे हे शिवसेनेचे उपनेते होते काय कमी पडले होते त्यांना म्हणून टुण्णकन् उडी  मारून राष्ट्रवादीत सामील झाले. ज्या पक्षात नाव कमवता, पैसा कमावता, प्रतिष्ठा कमावता, मग विचार न करता लगेच उडी मारून दुसरीकडे धाव घेण्यातच अशा लोकांना मजा वाटते.

मी एकट्या अमोल कोल्हेंचे नाव घेणार नाही. असे अनेक रथी महारथी आहेत. पण हे अगदी सध्याचे उदाहरण. पण खरं सांगू हेही तितकेच महत्वाचे आहे की पक्षाला (संघटनेला) ही प्रामाणिक, मनापासून व सच्ची लोकं नकोच असतात. त्यांनी प्रामाणिकपणे काम करावे पण त्यांना मात्र तांदळातल्या खड्या सारखे उचलून बाजूला टाकावे, हीच रीत आहे. अशाने काय होते, प्रामाणिक व्यक्ती बाहेर पडते व मोकाट सुटलेल्यांचा फायदा होतो म्हणून अशा काही गोष्टींकडेही संघटनेने लक्ष द्यावे. त्यामुळे सगळ्यांचेच भले होईल. नाही तर लोकांना मूर्ख बनविण्याचे काम करणारे आहेतच, जसे माननीय शरद पवारांनी केले. जे़व्हा मुख्यमंत्री असतांना  गृहनिर्माण खाते त्यांच्याकडे होते तेंव्हा 500 चौ फुटाचे घर इतक्यावर्षात देऊ शकले नाहीत आणि आता 500 चौ फुटाचे घर, 33% महिलांना आरक्षण, कर्जमाफी यासारख्या अनेक गोष्टींचे आश्वासनाचे गाजर द्यायला सुरुवात केली. मोठे ते मोठे पण वयाने लहान असणारी सुद्धा लोकांना मुर्ख बनवितात. जसे राहुल गांधी ! आता काय तर कॉलेजच्या मुलांमध्ये जीन्स टी शर्ट घालून रॅम्प वॉक करतात तर कधी महिलांमध्ये जाऊन लाजतात काय,  मुरडतात काय, ताल धरून नाचतात काय, काय आहे हे सगळे ? फक्त नि फक्त सत्ता(खुर्ची). किती ही सत्तेची लालसा आणि त्या गरीब जनतेची फसवणूक. पण आता जनतेला फसवणे इतकं सोपं राहिलेलं नाही. जनता खूप हुशार झाली आहे. या सगळ्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. अहो मी तर म्हणते एकदा सगळ्या जनता जनार्दनाने आपल्या मतांना मतदान यंत्रातले NOTA (यापैकी कोणीही नाही) चे बटण  दाखवून या तथाकथित राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. मग कळेल. गरीब व सामान्य जनतेत किती ताकद आहे ! यांना माहीत आहेत का डाळ तांदळाचे भाव ? यांना माहीत आहेत का पेट्रोल चे भाव ? की यांना माहीत आहे मुलांच्या शिक्षणाचा खर्च ? की गॅसचा भाव ? नेत्यांनी उपभोग घ्यावा आणि जनतेने मात्र भोगावे  लोकांच्या मनात राष्ट्रीय एकात्मतेची, आदराची, प्रेमाची,बांधीलकी ची भावना आणण्यासाठी फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब ठाकरे हेच होते. कणखर शब्दांत बोलले तरी त्यामध्ये सुद्धा आपलेपणा होता. नुसत्या शब्दांनीही मायेची फुंकर घातल्यासारखे वाटायचे. त्यांनी आपल्यासाठी कधी दुसऱ्याचा वापर केला नाही. तर लोकांसाठी आपले  आयुष्य झिजविले, सर्वस्व अर्पण केले, जगात अनेक चांगलीही लोकं आहेत.  परंतु ती जगासमोर येत नाहीत. पण आज जो मराठी माणूस उभा राहिला आहे, हिंदु एकवटला आहे तो फक्त आणि फक्त बाळासाहेबांमुळेच. नाही तर आज जे काही प्रमाणात  चांगले चित्र दिसते ते दिसू शकते नसते. अशा थोर व्यक्ती ला माझे मनापासुन विनम्र अभिवादन. त्यांचा आदर आणि आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून  आपला देश सुजलाम, सुफलाम बनविण्याची प्रतिज्ञा करु या !  जय हिंद, जय महाराष्ट्र  !!

सौ. रेखा शां. बोऱ्हाडे, 9969261202 (लेखिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आहेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!