राजकारण एक जुगार ! – जयंत करंजवकर

नागपुरमध्ये यंदा सहा दिवसाच्या हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजले. अधिवेशनात पहिल्याच दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर विषय घेऊन राष्ट्रप्रेमाचे मोजमाप करण्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व त्यांच्या आमदारांनी धन्यता मानली. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दर हेक्टरी २५ हजार तर बागायती शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपये देण्याचे शिवसेनेने घोषित केले होते त्याची आठवण करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. राज्याची आर्थिक परिस्थिती आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णासारखी झालेली आहे. सुमारे ५ लाख कोटीचे कर्ज राज्यावर आहे. श्री.ठाकरे यांनी सभागृहात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी १५ हजार कोटी रुपये येणे आहे. ते मिळाले तर शेतकऱ्यांच्या हातात सर्व नाही पण काही मदत हातात पडेल. यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साद घातली. व मात्र श्री.फडणवीसांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्रावर अवलंबून का राहता असे खडे बोल सरकारला सुनावले. पण ते  १५ हजार कोटी महाराष्ट्राच्या हक्काचे आहेत. त्यामुळे त्यांचे हे विधान हास्यस्पद तर आहे पण पुरोगामी महाराष्ट्राला ते विधान लांच्छनास्पद ही आहे. त्यात राजकारणाचा वास असल्याचे दिसते. निदान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फडणवीसांनी राज्य सरकारला सहकार्य करण्याऐवजी सरकारच्या अडचणीत भर कशी पडेल, याचंच राजकारण केल्याचे स्पष्ट दिसत आहे. राजकारण हा एक जुगार आहे असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सभागृहात सांगितले. त्यांना सत्तेत आल्यानंतर साक्षात्कार झाला. त्यांचे पिताश्री शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर राजकारण हे गजकरण असल्याचे हजारवेळा सांगत होते. मात्र मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांना प्रत्यक्ष सत्तेत आल्यानंतर राजकारण जुगार वाटू लागला हे काही थोडके नाही. दुसरं असे की, राजकारणात धर्म आणून सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही, हे ही त्यांच्या लक्षात आल्याने यापुढे महाविकास आघाडीचा ‘किमान समान कार्यक्रम’ राबविण्यात येईल यावर त्यांनी नकळत शिक्कामोर्तब केले, असे म्हणायला काहीच हरकत नाही.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सताधाऱ्यांना विशेषत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्याचा आग्रह धरला आणि धारेवरही धरले. शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामानामध्ये श्री. उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी शिवसेनेने काय,काय आश्वासने दिली होती त्याचे फ्लेक्स सभागृहात फडकविले आणि त्यांना आठवण करून देत होते. कोणत्याही दैनिकात लोकांशी निगडीत बातमी प्रसिध्द झाल्यावर यापूर्वीही विरोधक त्याची दखल घेऊन सरकारला जाब विचारात होते. आता मात्र दैनिक सामना न वाचणारे भाजप आमदार सभागृहात सामनाचे फ्लेक्स दाखवून शिवसेनेची कोंडी करण्यात यशस्वी झाले, परंतु सेनेने साथ सोडल्यानंतर हे नाटय घडत आहे. राजकारण हा जुगार आहे, त्यात मित्र पक्षाला उध्दवस्त करून सत्ता उपभोगायची असते, हे 80 टक्के समाजकारण करणाऱ्या सेनेलाही या सत्तेच्या जुगारात उतरावे लागले.

सभागृहात सामना दैनिकाचे फ्लेक्स दाखवितांना त्याच वेळी दुसऱ्या एका दैनिकात विदर्भातील सहा जिल्ह्यात प्रत्येक दिवशी 8 तासाने एक शेतकरी मृत्युला कवताळतो अशी धक्कादायक बातमी पहिल्या पानावर प्रसिध्द झाली होती. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी एक अवाक्षरही काढले नाही, याचे आश्चर्य वाटते. नागपूर हिवाळी अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न, समस्या मार्गी लावणे हा खरा उद्देश आहे, पण तसे घडतांना यावेळी दिसत नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न राज्याचा असला तरी विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय जटील आहेत. निवडणुकीत लोकांना स्वप्न दाखवावयाचे असते पण सत्ता मिळविण्यासाठी लोकांना दिलेले आश्वासन दुर्लक्षित करायचे ही परंपरा राजकारणात रुजत आहे.

पश्चिम विदर्भ व वर्धासह सहा जिल्ह्यात दर दिवशी आठ तासात एक शेतकरी मृत्यूला कवताळत असतो. किती भयानक चित्र आहे हे. त्यामागची कारणेही मेंदूचा भुगा करणारा आहे. पाचवीला दुष्काळ, अवकाळी पावसाचा धिंगाणा, त्यामुळे शेतक-यांच्या डोक्यावर कर्जाची टांगती तलवार, त्यानंतर या शेतकऱ्यांसमोर निर्माण होणारे महत्वाचे समस्या म्हणजे त्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षण आणि विवाहात येणारे अडथळे या समस्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाहीतर काय करणार? पीक विम्याची रक्कम मिळत नाही, अवकाळी पाऊस आणि त्यात भर म्हणजे केंद्राचे पथकांचे सर्वेक्षण हा वेळकाढूपणा असून त्या बदल्यात केंद्राने शेतक-यांना साधारण अंदाजित रक्कम दिली असती तर त्यांना सद्यपरिस्थितीवर दिलासा मिळाला असता. पण शेतक-यांच्या मदतीतही राजकारण केले जाते, म्हणजे राजकीय नेते खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे… हेच महाराष्ट्राला दाखवून देत आहेत. अशा प्रसंगी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व त्याचे काही संबंधित मंत्री यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे घेऊन केंद्राकडे राज्याची शिल्लक रक्कम मिळवून दिली असती तर त्याचे श्रेय फडणवीसांना व त्यांच्या पक्षाला मिळाले असते. पण राजकीय जुगारात सत्ताधारी पक्ष कसा नाउमेद होईल याचीच विशेष काळजी घेतली जाते. जुगार खेळतांना जुगारीला आपल्या कुटुंबाची चिंता नसते तसे राजकारणात राज्याच्या हितापेक्षा सत्ता प्रिय असते. येथे तर ‘मी पुन्हा येईन’ हा शब्द खरा करण्यासाठी फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे विधानसभा गट नेते अजित पवार यांच्याबरोबर सत्ता स्थापनेचा अयशस्वी प्रयत्न केला. ५२ पानात जोकरचे पान कोठेही लागू पडते, या भ्रमात राहून अजित पवार हा पत्ता काढून त्यांनी हा प्रयोग केला पण त्यांना 80 तासात मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले. हा कलंक ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या माथी कायम लागले.

लोकसभा निवडणुकीत काश्मीरमधील ३७० कलम काढल्यानंतर या निर्णयाचे देशभर स्वागत झाले. तीन तलाकावर बंदी आणल्याबद्दलही देशात कोठेही प्रक्षोभ दिसला नाही. परंतु आज नागरिकत्व कायदयविरोधात देशात सर्वत्र हिंसाचार व जनक्षोभाचा भडका उडाला. पाशवी बहुमतावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा निर्णय जिंकला खरा आणि त्यांचा हेतू साध्य झाला, मात्र या सुधारित कायदयविषयी लोकांना विश्वासात घेण्यास ते अयशस्वी झाले. बहुमत हा बुल डोझर म्हणून वापर केला तर त्याचे आज देशभर परिणाम दिसतात. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 22 पक्षांना घेऊन सरकार चालविले. पंतप्रधान मोदी यांनी एनडीएतील मित्र पक्षांना बाजूला करून सत्ताधारी बनण्याच्या प्रयत्न केला आणि भाजपा हा दगाबाज पक्ष असल्याचा सर्वव्यापी ओळख झाली. महाराष्ट्रात भाजपाचे केवळ दोन खासदार असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर हिंदुत्वाच्या विचारावर ते एकत्र आले होते. ३० वर्षाच्या या मैत्रीत शिवसेना संपतेय हे लक्षात येताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन भिन्न विचारांच्या पक्षाबरोबर युती करून राज्यात सत्ता आणली. भाजपाला धडा शिकविण्यासाठी उध्दव ठाकरे यांना ही टोकाची भूमिका घ्यावी लागली. महाराष्ट्र दिल्लीसमोर वाकत नाही अशा भावनिक वलग्ना ते करीत असले तरी

सध्या हा ‘डाव’ पेच यशस्वी झाल्याचे दिसत आहे. शेवटी हे तीन पक्ष स्वत:चा पक्ष वाढविण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे पाने फेकतील. काँग्रेस व राष्ट्रवादीला उभारी घेण्यासाठी ही नामी संधी असल्याने ते शिवसेनेशी कसे संबंध ठेवतात यावर त्यांचे अस्तित्व राहील. नाहीतर खासदार राहुल गांधी केव्हा काय बोलतील आणि पक्षाला अडचणीत आणतील याचा नेम नाही. राजकारण हा एक जुगार आहे.

विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे, रोहित पवार, विश्वजित कदम, आदिती तटकरे, अमित देशमुख हे तरुण आमदार सभागृहात आहेत. त्यांच्यावर राजकारणाचे बाळकडू त्यांच्या घरातच मिळाले आहे. ह्या तरुण आमदारांनी सभागृहात चांगली छाप पाडली. ते या सत्तेचे जुगारात ओढले जाऊ नये. सध्या राजकारणात वैचारिक आहोटी आहे. आहोटी नंतर भरतीही येतेच… पुरोगामी महाराष्ट्राला संपन्न विचारांची परंपरा आहे. तरुण आमदार व नेते हेच महाराष्ट्राला तरून नेतील, अशी आशा करण्यात हरकत नसावी.

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार व स्तंभ लेखक/८३६९६९६६३९)
(jayant.s.karanjavkar@gmail.com/8369696639).                     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!