राजकीय विचारांचे भाषण अशा महिला स्नेह मेळाव्यात नको – प्रविणाताई ठाकूर

नालासोपारा (प्रतिनिधी) :  सध्या वसई तालुक्यात बहुतेक ठिकाणी महिलांचे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. प्रामुख्याने महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात असे ‘हळदी कुंकू समारंभ’ आणि जोडून समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. आणि अशा बहुतेक सर्व प्रकारच्या कार्यक्रमात, मेळावे-महोत्सवांत, सांस्कृतिक उपक्रमात बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते सहभागी होत आहेत. विशेषत: महिलांच्या स्नेहमेळाव्यात प्रथम महिला महापौर प्रविणाताई ठाकूर, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती माया चौधरी यांची उपस्थिती प्रभावी ठरते आहे. आणि अशाच कार्यक्रमांतून या नेत्यांनी आजवर महिलांचे सक्षमीकरण या विषयावर प्रबोधन केले आहे.

दि.९ रोजी ब.वि.आ. पक्षाच्या दोन्ही नेत्यांनी आचोळे विभाग शिर्डीनगर येथील ( प्रभाग क्रमांक ६८) नगरसेविका कल्पना म्हात्रे यांच्या हळदी कुंकू कार्यक्रमास भेट दिली. आचोळे येथील माऊली महिला मंडळ, तथास्तु महिला मंडळ, भीम नगर वेल्फेअर सोसायटी या संघटनांच्या वतीने प्रविणाताई ठाकूर व माया चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर प्रविणाताई ठाकूर यांच्या हस्ते नगरसेविका कल्पना म्हात्रे, महिला आघाडीच्या रेश्मा चौधरी, पदाधिकारी संतोष चौधरी, बाळा रंजारे, इंद्रजित गुत्ते यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या प्रविणाताई ठाकूर यांनी आपण इकडे भाषण करायला आलो नसून, केवळ शुभेच्छा द्यायला आलो आहोत.आणि अशा मेळाव्यात राजकीय विचारांचे भाषण कुणीच करु नये असे मला वाटते. आजच या भागातील लोकांसाठी पाणी पुरवठा वाढीव प्रमाणात व्हावा यासाठी ५०० मीटर लांब जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. इतरही काही समस्या आहेत मात्र त्यावर बोलण्यासाठी वेगळे मेळावे आयोजित करण्यात येतील. आपण तेव्हा जरुर चर्चा करु. आज आपण फक्त या स्नेहमेळाव्याचा आनंद घ्या. असे मत व्यक्त केले.

सभापती माया चौधरी यांनी सुध्दा या वेळी भाषण न करता केवळ शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात सूत्रसंचलन करणाऱ्या दोन्ही व्यक्तिंनी बराच वेळ घेतला. परिणामी प्रमुख पाहुण्यांना बोलण्यासाठी वेळच उरला नाही. पाहुण्या दुसऱ्या कार्यक्रमाला गेल्यानंतर हळदी कुंकू आणि भेट वस्तू (वाण) वाटप सोहळा सुरु झाला. १५०० पेक्षा जास्त महिलांनी याचा लाभ घेतला. ब.वि.आ. प्रभाग अध्यक्ष बाळा रंजारे यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!