राज्य संगीत नाटक स्पर्धेमध्ये वसईकरांनी जिंकली प्रेक्षकांची मने

वसई (वार्ताहर) : संगीत नाटक व नाटयसंगीत म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, नव्हे महाराष्ट्राचा श्वासच!. पण कालौघात संगीत नाटकाचे सादरीकरण कमी कमी होत आहे. मात्र हीच संगीत नाटकाची परंपरा टिकवायचा ध्यास घेतलेली वसईतील अग्रगण्य नाटयसंस्था ‘मन्वंतर कला मंडळ’ गेली २८ वर्षे महाराष्ट्र राज्य संगीत नाटक स्पर्धेमध्ये दरवर्षी हिरीरीने भाग घेऊन दर्जेदार संगीत नाटके सादर करीत असते. अभिमानाची गोष्ट अशी की या नाटकात सहभागी होणारे सर्व कलाकार वसई परिसरातीलच आहेत.

ह्या वर्षीसुध्दा मनवन्तर कला मंडळाने इचलकरंजी येथे सुरू असलेल्या ५९ व्या संगीत नाटक स्पर्धेमध्ये बुधवार दि.२९ जानेवारी २०२० रोजी डॉ.श्रीकृष्ण जोशी लिखित आणि सुरेश ठाकूर दिग्दर्शित ‘राधामानस’ हे नाटक अत्यंत नेटक्या पध्दतीने सादर केले. कुरुक्षेत्रावरील कौरव आणि पांडवामधील युदधामुळे पृथ्वी, प्राणी, वनस्पती आणि मानवजातीचा होणारा संभाव्य विध्वंस थांबवण्यासाठी श्रीकृष्णाचा बालमित्र सुदामा स्वत: नारदमुनी तसेच कृष्णाची प्रिय सखी राधेमार्फत श्रीकृष्णाची मनधरणी करून युध्द थांबविण्याचा प्रयत्न करतो. मात्रा हे युध्द झालेच पाहिजे त्याशिवाय न्याय-अन्याय, सत्य-असत्य कळणार नाही अशा आशयाचे कथानक या नाटकाला होते.

नाटकातील नारदमुनी साकारणारे महेश पाटील, श्रीकृष्णाची भूमिका करणारे विजय म्हात्रे तर राधाच्या भूमिकेतील पल्लवी नेरकर ह्यांनी अभिनयाबरोबर आपल्या सुमधुर गायनाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचप्रमाणे रुक्मिणी साकरणारी एड. शीतल पाटील, बलराम झालेले हृदयनाथ कडू,  सुदाम्याच्या भूमिकेतील विक्रांत किणी तसेच सुचंद्र झालेले आनंद खंडागळे व सखी मंगल राऊत सर्वच कलाकारांनी आपली कामगिरी चोख पर पाडली. कैलास ठाकुर यांनी केलेल्या प्रसंगानुरूप आणि नेत्रदीपक प्रकाशयोजनेमुळे नाटकला एक वेगळयाच उंचीवर नेऊन ठेवले. पार्श्वसंगीत सुधीर तरे यांनी दिले तर संगीत दिग्दर्शन होते दशरथ राउत यांचे. ऑॅर्गनसाथ सागर मेस्त्री तर तबलासाथ सौरभ कानुलकर यांनी दिली. नेपथ्याची धुरा नरेंद्र कडु यांनी आपले सहकारी सुनील महामुनी,  रामदास राउत,  दिलीप(हेमंत) पाटिल आणि विजय राउत यांच्या साथीने व्यवस्थितपणे सांभाळली. सदर नाटकाची वेशभूषा भारती ठाकुर, केशभूषा रेखा यांनी तर शशिकांत सकपाळ यांनी रंगभूषा करून नाटक उत्तमरीत्या प्रेक्षकांपुढे येण्यासाठी मोलाचा वाटा उचलला.

श्रीमंत घोरपड़े नाटयगृहात सदर झालेल्या सं. राधामानस या नाटकाला रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!