‘रायवळ’ जगवा कोकण वाचवा ; हापूसचा बाजार जैववैविध्यतेच्या मुळावर

मुंबई, दि.२२ (प्रतिनिधी) : कोकण म्हणजे आंबा आणि आंबा म्हणजे हापूस असं सध्याचं समीकरण झाले आहे. पण हेच समीकरण आज कोकणातील जैवविविधतेच्या पर्यायाने पर्यावरणाच्या मुळावर उठले आहे. ‘स्टेटस सिम्बॉल’ हापूसच्या लागवडीसाठी स्थानिक प्रजातींच्या हजारो झाडांच्या कत्तली झाल्या. कोळसा कंत्राटदारांना बोलावून जमिनीत खोलवर रुजलेली मूळे सुद्धा खोदून काढली. यामुळे जमिनीवरील आणि जमिनीखालील अनेक जैविक प्रजाती नामशेष झाल्या. शिवाय मोनोकल्चर लागवडीमुळे पिकांवर रोगांचे प्रमाणही वाढले. उत्पादन घटले. एकमात्र उत्पादनावर भर दिल्याने, एकेकाळी स्वयंपूर्ण असलेल्या कोकण भूमीची डोर हळूहळू व्यापाऱ्यांच्या हातात जात आहे. विदर्भ – मराठवाड्यातल्या ‘नगदी’ शेतकऱ्यांप्रमाणे आता कोकणाचा बागायतदार शेतकरीही कडेलोटाच्या टोकावर आहे. हा अनर्थ टाळायचा असेल तर रायवळ आंब्यासारख्या कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या स्थानिक प्रजातींवर लक्ष केंद्रित करायला हवे. स्थानिक जातींचे संवर्धन व यथायोग्य ब्रॅण्डिंग करून कोकणची अर्थव्यवस्था जपायला हवी, असे आवाहन कॉस्मिक इकॉलॉजिकल ट्रस्ट व मैत्री फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. 
कॉस्मिक इकॉलॉजिकल ट्रस्ट मागील सलग चार वर्षे, रायवळ आंब्याची लागवड आणि संवर्धनासासाठी जनजागृती मोहीम चालवत आहे. गेल्या वर्षापासून मैत्री फाउंडेशननेही या कामात पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत उत्कृष्ट प्रतीच्या रायवळ आंब्याच्या बाठ्यापासून रोपनिर्मिती, गोआधारित सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन, रायवळच्या गुणवैशिष्ट्यांचा प्रचार – प्रसार यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. कोरोना नंतरच्या काळात अनेक चाकरमान्यांचे रोजगार जातील, अशावेळी रायवळची कमी खर्चातील शाश्वत शेती तसेच यावर आधारित प्रक्रिया उद्योग रोजगार निर्मिती करू शकतात. तसेच सध्याच्या आर्थिक अवस्थेत हापूस सामान्यांना परवडणारा नाही. उत्पादन खर्चाच्या प्रमाणात त्याला भाव मिळणार नाही. त्याऐवजी स्वस्त आणि आरोग्यदायी रायवळ आंब्याला जास्त उठाव येऊ शकेल. या सर्व बाबी विचारात घेऊन, कोकणवासीयांनी आणि आम्रप्रेमींनी रायवळ संवर्धनासाठी पुढे यावे असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. उदयकुमार पाध्ये व फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी गुजराथी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात या मोहिमेविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. या माहितीप्रमाणे हापूस मुळात इथला नाही. अफोन्सो दि आलबुकर्क या पोर्तुगीज दर्यावर्दीने भारतात आणून इथल्या रायवळवर मारलेले ते कलम. रंग आणि जाड गर ही त्याची वैशिष्ट्ये. पण पुढे त्याचे इतके मार्केटिंग झाले कि तीच कोकणाची ओळख बनली. कधी देवगड तर कधी रत्नागिरीच्या नावावर हापूस खपवला जाऊ लागला. खरंतर हा प्रकृतीने उष्ण, त्यामुळे उन्हाळ्यासाठी विपरीतच. तरीही ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून मान्यता मिळाल्याने दरवर्षी उन्हाळ्याबरोबरच हापूसच्या चर्चा सुरु होऊ लागल्या.
हापूसला बाजारभाव मिळतो म्हणून जो – तो कलमं लावायच्या मागे आहे. व्यापाऱ्यांना भाड्याने झाडे दिली की झाले, असा सरळ साधा हिशोब असतो. पण व्यापाऱ्यांना कोकणच्या मातीविषयी किंवा माणसाविषयी आत्मीयता नसते. त्यांनी जे भांडवल गुंतवलंय त्यावर जास्तीत जास्त नफा मिळवणे, एवढेच त्यांचे उद्दिष्ट असते. त्यातूनच फळांचा आकार, रंग यासाठी मोठ्या प्रमाणात रसायनांची फवारणी होते. कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी आटापिटा केला जातो. यातून झाड आणि जमिनीचेही शोषण होते. झाडे कमकुवत झाल्याने रोगांना बळी पडतात. त्यामुळे कीटकनाशकांची गरज वाढते. मात्र अशा फवारणीत उपयुक्त जीवांचाही बळी जात असल्याने नैसर्गिक प्रतिकारकक्षमताच संपते. मातीचा कस कमी झाल्याने पुढील उत्पादन केवळ आणि केवळ रसायनांवर अवलंबून राहते. उत्पादन खर्च प्रचंड वाढतो. अशा स्थितीत हवामान विपरीत झाले तर केलेला सगळा खर्च अक्षरश: पाण्यात जातो. अलीकडे हवामान बदलामुळे वारंवार उद्भवणाऱ्या वादळी वाऱ्यांत अशी कलमी झाडे उन्मळून पडण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत बागायतदार शेतकरी कर्ज आणि तणावाच्या ओझ्याखाली घुसमटू लागतो. बागायतीचे कायमस्वरूपी नुकसान झाल्याने उत्पन्नाचा स्रोतही आटतो. या दुष्टचक्रातून सुटायचे असेल तर कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या रायवळ आंब्यासारख्या मजबूत स्थानिक प्रजाती आणि सेंद्रिय शेतीवर भर द्यायला हवा. यासाठी गोआधारित सेंद्रिय शेतीवरील कार्यक्रमही या संस्थांच्या माध्यमातून वेळोवेळी घेण्यात आले, अशी माहिती फाउंडेशनच्या अध्यक्षा व लेखिका सृष्टी गुजराथी यांनी  दिली.
ट्रस्टचे सचिव सुधीर इनामदार यांच्या म्हणण्यानुसार केवळ शेतकऱ्यांचे अर्थकारण एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाही. एकतर रायवळसारख्या स्थानिक प्रजाती चवीच्या बाबतीत हापूसपेक्षा कणभरही कमी नाहीत. शिवाय त्यांच्यामध्ये प्रचंड वैविध्यही आढळते. महाराष्ट्रातील रायवळ, दक्षिण भारतातील तोतापुरी आणि उत्तर प्रदेशचा दशेरी आंबा कधीच एकसारखा नसतो. म्हणायला सगळेच आंबे आले तरी स्थानीय पर्यावरणाच्या गरजेनुसार त्यांची गुणवैशिष्ट्ये बदलत जातात. रायवळ सारख्या जातीत तर फळांचा आकार – चव झाडागणिक बदलते. अशा निसर्गपूरक व संपन्न वैविध्यामुळे कितीही खाल्ले तरी हे आंबे बाधत नाहीत. याउलट हापूस कापूनच खावा लागतो, चापून खाल्ला तर उष्णतेचा त्रास होतो. म्हणूनच आंब्याच्या मोसमाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर स्थानिक रायवळच हवा. याचा मधुर पातळ रस पचनाला जड जात नाही. स्थानिक आंब्याच्या या गुणवैशिष्ट्याचा प्रचार करायला हवा. वेगवेगळ्या जातींच्या आंब्याचे गुणधर्म आणि त्यांचे आरोग्याच्या दृष्टीने उपयोग यावर शास्त्रशुद्ध अभ्यास व्हायला हवा. हापूसचे मार्केटिंग झालंय तसं बाकीच्या जातींचेही होऊ शकते. यातून आम्रप्रेमींना चॉईस मिळेल. पर्याय उपलब्ध झाले कि बाजारपेठही वाढेल. शिवाय मोनोकल्चर पिकांमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसानही टाळता येईल.
आयुर्वेदाचे अभ्यासक व आंब्यांवर विशेष संशोधन करणारे डॉ. श्रीविराज वर्मा यांच्या मते हापूसची लागवड ही बरीचशी रसायनांवर आधारित आहे. कलमाच्या झाडांपासून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्याच्या नादात मोठ्या प्रमाणावर रासायनिक फवारणी केली जाते. या प्रक्रियेत फळे तर दूषित होतातच शिवाय स्थानिक कीटकांच्या प्रजाती आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या  पक्ष्यांच्या जातीही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याचा परिणाम आंबा बागायती व्यतिरिक्त अन्य पिकांवर सुद्धा होतो. परागीकरणाच्या  नैसर्गिक प्रक्रियेत अडथळे येतात. यामुळे स्थानिक जैववैविध्यावर संकट आले आहे. कोकणच्या ज्या निसर्गसंपन्नेतेचे गोडवे गायले जातात, तेच हापूसच्या अतिरेकापायी धोक्यात आले आहे.
हापूसमुळे कोकणचा समतोल ढासळतोय, याविषयी अधिक माहिती देताना पर्यावरणाचे ज्येष्ठ अभ्यासक ईश्वरभाई पटेल व प्रवीण गावडे यांनी सांगितले की, हापूसच्या बाजारभावाला भुलून कित्येकांनी हापूसच्या बागा लावायला घेतल्या. यासाठी शेकडो वर्षे जुनी, दुर्मिळ झाडे तोडून जमिनी सपाट करून घेतल्या. जमिनीत खोलवर रुतलेली मुळे काढण्यासाठी कोळसा कंत्राटदारांची मदत घेतली, त्यामुळे सुपीक माती वाहून गेली. नव्याने लावलेल्या कलमांना वाढायला वेळ लागतो. काढणी सोपी व्हावी म्हणून या झाडांची उंची आणि विस्तारही मर्यादित ठेवला जातो. त्यामुळे स्थानिक पशुपक्षांच्या हक्काच्या निवासस्थानावर गंडांतर आले आहे.
“हापूस ही केवळ एकच प्रजातीची झाडे असल्याने निसर्गाला अपेक्षित असलेले जैववैविध्य उरले नाही. त्यामुळे अशा कलमांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला. स्थानिक कीटक आणि त्यांच्यावर जगणारे पक्षी नामशेष झाल्याने रोगांना आळा घालण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचाच आधार घ्यावा लागतोय. त्यामुळे जैवसाखळीचा अधिकच र्‍हास होऊन एक दुष्टचक्रच सुरू झाले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा एकदा रायवळसारख्या स्थानिक प्रजाती आणि गोआधारित सेंद्रिय लागवडीकडे वळण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे.” – राजेंद्र पाटील, पर्यावरण तज्ञ
ज्येष्ठ समाजसेविका निर्मला पाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या या जनजागृतीपर मोहिमेत अनिता राधाकृष्ण गायतोंडे, प्रचिती गावडे, राजेंद्र पाटील, डॉ. विजयकुमार पोंक्षे, डॉ. एस. के. वर्मा, डॉ. तुकाराम सावदेकर, हरी शेंड्ये, गौरव देव, ज्ञानेश्वर परब, डॉ. मनोहर अकोले, सुरेखा विकास अभ्यंकर, प्रा. सायली फणसे, बाबू नेताळकर, सुनील हरिश्चंद्र देवरुखकर, वैष्णवी नवले, प्रसाद अग्निहोत्री, विश्वास पाटील, गजेंद्र अडकर, पूजा बाबुभाई पटेल, मृणाल इनामदार आदी पर्यावरणप्रेमी विशेष मेहनत घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: