राष्ट्रभक्ती व राष्ट्रशक्ती यांच्या जागरणामुळेच देश पुन्हा एकदा विश्वगुरु बनेल – श्यामजी हरकरे

डहाणू (वार्ताहर) : ‘राष्ट्रभक्ती व राष्ट्रशक्ती यांच्या जागरणामुळेच देश पुन्हा एकदा विश्वगुरु बनेल’ असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्मजागरण विषयाचे पश्चिम क्षेत्रप्रमुख श्यामजी हरकरे यांनी येथे व्यक्त केला. येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोकण प्रांताच्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या प्रकट समारोप प्रसंगी ते बोलत होते. गेली अनेक शतके भारतामध्ये अनेक महापुरुषांनी त्यांच्या त्यांच्या परीने राष्ट्रभक्ती व राष्ट्रशक्ती जागरणाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले व १९२५ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील याच जागरणाचा वसा उचलला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गास कोकण प्रांतातील संघदृष्टया २३ जिल्ह्यातून ८८ शिक्षार्थी आले होते यामध्ये ३० शिक्षार्थी हे व्यावसायिक गटातील तर उर्वरित महाविद्यालयीन गटातील होते. शेतकरी, माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक, तसेच वनवासी क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील शिक्षार्थी या शिक्षा वर्गास उपस्थित होते. वर्गाचे वर्गाधिकारी म्हणून उदयराव कुलकर्णी यांनी काम पाहिले.

आपल्या भाषणात श्यामजी हरकरे पुढे म्हणाले की, हिंदू समाजाचे संघटन म्हणजे सज्जनशक्तीचे जागरण होय. देशभक्तीचा संस्कार देऊन आत्मविस्मृत समाजाची वीरवृत्ती जागृत करण्याच्या दृष्टीने व त्यासाठी योग्य संस्कार देणारी कार्यपध्दती संघाने विकसित केली आहे. हिंदू समाजावर होत असलेल्या विविध, सांस्कृतिक राजकीय आणि सामाजिक आक्रमणांचा उहापोह हरकरे यांनी याप्रसंगी केला. या आक्रमणांच्या विरोधात अनुशासन सिध्द असा संघटित हिंदू समाज उभा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. हजारो वर्षांच्या परकीय आक्रमणाच्या काळात आपल्या समाजातील काही बंधू आपल्या मूळ प्रवाहापासून दूर गेले आहेत याची जाणीव ठेवून त्यांना पुन्हा एकदा आपल्या हिंदू समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी या नात्याने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वारली चित्रकार सदाशिव जिव्या म्हसे उपस्थित होते. आपल्या मनोगतात ते म्हणाले की,  वारली चित्रकलेचा हा वारसा आपल्याला वडिलांकडून मिळाला. देश-परदेशात जाऊन अनेक चित्र प्रदर्शनांमध्ये आपण सहभागी झालो होतो. वारली चित्रकलेचे प्रशिक्षण घेऊन आज सुमारे २७५ जण त्यावर उदरनिर्वाह करीत आहेत. प्रत्येक वारली चित्रकलेत वारली जनजातीची कथा आहे. वारली चित्रकला हे नाव वारली या जनजातीवरुन पडले. वारली समाजाच्या लग्नांमध्ये घरांच्या भिंतींवर ही चित्रकला रेखाटण्याची प्रथा आहे. वारली चित्रकला संपूर्ण जगात प्रसिध्द करण्यामध्ये भास्कर पुरकरे यांचे अमूल्य योगदान असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. या कार्यक्रमास निमंत्रित केल्याबद्दल चित्रकार म्हसे यांनी संघाचे आभार मानले.

वीस दिवस चाललेल्या या संघ शिक्षा वर्गात शिक्षाथींर्नी विविध विषयांचे प्रशिक्षण घेतले. या समारोपप्रसंगी, शिक्षार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. त्यामध्ये दंड, नियुध्द, व्यायामयोग,गणसमता, लेझीम व घोष तसेच विविध प्रकारचे आकर्षक खेळ यांचा समावेश होता. वर्ग कार्यवाह योगेश साळुंखे यांनी वर्ग अहवाल व आभार प्रदर्शन केले. या प्रकट समारोहास डहाणू परिसरातील आणि पालघर जिल्ह्यातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!