राष्ट्रवादीला विधानसभा निवडणूकीचे वेध – जयंत करंजवकर

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक संपताच राष्ट्रवादी पक्ष राज्यात दुष्काळ परिस्थिती तीव्र होत असल्याने त्यावर विचारविनिमय करण्यासाठी त्यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली. 29 एप्रिलला निवडणूक संपताच शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला दुष्काळ भागाला भेट दिली. माळशिरचे राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन झाल्याने तूर्त पवारांनी दुष्काळ दौरा काही दिवस स्थगित केला आहे. शरद पवारांनी मुंबईत राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत दुष्काळाच्या विषयाला अग्रक्रम असला तरी राज्यात झालेल्या 48लोकसभा मतदार संघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत येत्या ऑॅक्टोबर 2019 मध्ये संपणार आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षांबरोबर केलेली आघाडी आणि आमदार व नेत्यांचा त्याबद्दलचा अनुभव शरद पवार ऐकून घेतील. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी कशी करायची याबाबत ते उपस्थित नेत्यांना, आमदारांना सांगतील. विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा दिला आणि तो राजीनामा त्वरित स्वीकारण्यात आला. या घडामोडीमुळे आगामी विरोधी पक्षनेतेबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॉग्रेस      पक्षाचे दोन आमदार कालिदास कोळंबकर, निलेश राणे हे काँग्रेसमध्ये नाहीत आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय विखे यांनी भाजपामार्फत लोकसभा निवडणुक लढवली आणि राधाकृष्ण यांनीही मुलगा डॉ. सुजय यांचा लोकसभा निवडणुकीत प्रचार केला आणि काँग्रेसच्या लोकसभा प्रचारापासून ते पूर्णत: अलिप्त राहिले होते. त्यांच्या या पक्ष कारवाई विरोधात काँग्रेस श्रेष्ठीना कारवाई करावी लागेल. त्याप्रमाणे कारवाई झाल्यास राधाकृष्ण विखे आणि कोळंबकर,निलेश राणे यांची काँग्रेस पक्षातून हाकालपट्टी झाल्यास काँग्रेसकडे आमदारांची संख्या 38 होईल. तर राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचे नुकतेच निधन झाल्याने राष्ट्रावादीच्या आमदारांची संख्या 39 होईल. अर्थातच विधानसभेत राष्ट्ररवादीची काँग्रेसपेक्षा एका संख्येने जादा आमदार असल्याने नियमानुसार विधान सभेतील विरोधी पक्ष नेतेपद राष्ट्रवादीकडे जाईल. परंतु या नंबर गेममध्ये शरद पवार विधानसभेतील विरोधी पक्ष पद स्वीकारण्यास आमदारांना नकार देतील आणि उदारीकरणाचे देखावा निर्माण करतील. राष्ट्रवादीचे विधानसभेतील गट नेते अजित पवार यांच्याकडे आहे. त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिल्यास सत्तारूढ भाजपा व शिवसेना आमदार त्यांचे सिंचन घोटाळा प्रकरण बाहेर काढून राष्ट्रवादीला बदनाम करतील. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला आगामी विधानसभा निवडणूक अडचणीची ठरेल. याचा सारासार विचार शरद पवार करतील आणि 2009 मध्ये निवडणूकीत काँग्रेसपेक्षा जास्त आमदारांची संख्या असूनही त्यांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास भाग पाडून गृह विभाग, सार्वजनिक बांधकाम ही क्रिम विभाग स्वत:कडे ठेवले होते. शेवटी शरद पवार आहेत, राजकारणाची हवा पाहून त्यांची रणनीती ठरेल.

सध्या काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत मेळ दिसत नव्हता. मोदी लाटेत निवडून आलेले काँग्रेसचे अशोक चव्हाण खासदारकीसाठी उभे राहण्यास यंदा उत्सुक नव्हते, त्यांनी त्यांच्या पत्नीला उभे करून सुटका करून घेण्याचे नाटक केले. तर राजीव सातव यांनी गुजरातची जबाबदारी असल्याचे कारण पुढे ठेवून लोकसभेच्या निवडणुकीतून पळ काढला. विरोधीपक्ष नेते विखे पाटील यांनी राहुल गांधींनी डॉ. सुजय विखे यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे राहण्याचा सल्ला दिल्याने विखेच्या जखमेवर मीठ चोळले आणि राधाकृष्ण विखे यांना काँग्रेस प्रचारापासून दूर राहण्यास नामी संधी मिळाली. ही सर्व परस्पर विरोधकांची काँग्रेसमधील वातावरण लक्षात घेऊन चाणाक्ष शरद पवार काय खेळी करतील हे सांगता येत नाही. परंतु राष्ट्रवादीला विधानसभेसाठी चांगली संधी आहे. पवारसाहेब त्या संधीच सोन करतील, हे कोणीही नाकारू शकत नाही. काँग्रेसची अशी धरसोड अवस्था असली तरी बारामतीत सुप्रिया सुळे हरल्या तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल आणि ईव्हीएम मशीनवर विश्वासच राहणार नाही. शरद पवारांच्या मनातील शंका आहे त्यात सुप्रिया सुळेंचा पराभव त्यांना दिसू लागला का, अशी पक्षाच्या नेत्यांमध्ये भीती निर्माण करण्याची घाई पवारांनी केली असून त्यांच्या वक्तव्यामुळे अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, बीडचे दत्तराज क्षीरसागर, प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी भाजपाचे कमळ आधीच हातात घेतले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते एकमेकांत चर्चा करतांना, ‘नाहीतरी शरद पवारसाहेब मोदींना खासदार कमी पडले तर ते त्यांना मदत करणार असतील, त्यापेक्षा आपणच भाजपामध्ये एॅडव्हान्स बुकिंग का करू नये?’…  पवारांच्या विधानाने शरद पवारांनी त्यांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना नाउमेद केले आहे. बघू या घोडामैदान जवळ आहे.

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार)
(jayant.s.karanjavkar@gmail.com/8369696639).                     

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!