रोजगार हमी योजना बंद पाडल्याच्या निषेधार्थ धरणे सत्याग्रह

पालघर (वार्ताहर) : मागील साडेचार वर्षांपासून पालघर जिल्ह्यासह संपूर्ण देशातील गोरगरीब जनतेचे हक्क हिरावून घेण्याचा सपाटा केंद्रात व राज्यात सत्तारूढ झालेल्या भाजप सरकारने चालवला आहे. त्याच्या निषेधार्थ  दिनांक 30 जानेवारी 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष आयोजित धरणे सत्याग्रह करण्यात आले होते.

देशभरात म. गांधींच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या मनरेगा म्हणजेच रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्या कामे मिळणे पूर्णतः बंद झालेले आहे. केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने ही कामे बंद करून सर्व जातीधर्मातील गरीब मजुरांना देशोधडीला लावण्याचा कट रचला आहे. पालघर जिल्ह्यातही मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाडा व वसई इत्यादी तालुक्यात ही रोजगार हमीची कामे काढण्यात आलेली नाहीत.

एका बाजुला सरकारने पालघर जिल्ह्यातल्या काही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. व त्यामुळे रोजगार हमीमध्ये दिल्या जाणाऱ्या कामांमध्ये वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र त्याच वेळी प्रत्यक्ष कामे उपलब्ध करून देणे पूर्णपणे बंद केले आहे. असे करून सरकारने ग्रामीण भागातील कष्टकरी वर्गाची कू्रर चेष्टा केली आहे.

30 जानेवारी 1948 रोजी म. गांधींची हत्या ज्या संघ परिवारातील लोकांनी व विचारांनी केली त्याच लोकांनी व विचारांनी म. गांधींच्या नावाने सुरू असलेल्या मनरेगाचा खून पाडला आहे. या निव्वळ योगायोग नसून भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्था उध्द्वस्त करण्याचा हा पूर्वनियोजित कट आहे. मेक इंडियामध्ये शहरी भागात उभ्या राहाणाऱ्या उद्योगधंद्यांसाठी स्वस्त दरात मजूर उपलब्ध होण्यासाठी ग्रामीण कष्टकरी वर्गाला गावातून शहराकडे स्थलांतरित होण्यासाठी मजबूर केले जात आहे.

भाजप सरकारने देशभरात उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅसची शेगडी व सिलिंडरचे वाटप केले. मात्र अशी शेगडी ज्या कुटुंबांना देण्यात आली त्यांची नावे दारिद्रयरेषेतून वगळण्यात आली आहेत. सरकारने गरीबांची चालवलेली ही कू्रर थट्टा आहे. मोफत वीज मिटर देण्याच्या योजनेतून मोजक्याच लोकांना मिटर देण्यात आल्याने गरीबांमध्ये आपापसात झगडे निर्माण होत आहेत.

या विरोधात पक्षाच्या वतीने देशभर जनजागृती मोहिम राबवण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून भाजप हटाव मनरेगा बचाव या शिर्षकाखाली सदर धरणे सत्याग्रह आयोजित करण्यात आली.

या सत्याग्रहाद्वारे प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे

 1. मागेल त्याला रोजगार हमी मध्ये वर्षभर निरंतर काम मिळालेच पाहिजे. रोहयोतील दरदिवसाची मजुरी रूपये500 करा. बंद करण्यात आलेली रूरल कनेक्टीव्हीटीची कामे मोखाडा, जव्हार, विक्रमगड या तालुक्यात तात्काळ सुरू करून सर्व मजुरांना कामात सामावून घ्या.
 2. पालघर जिल्ह्याच्या डोंगरी भागात2400 मिमी पाऊस पडूनही दुष्काळ व पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. रोहयोच्या माध्यमातून पाणी अडवा व पाणी जिरवा धोरण राबवून सरकारी यंत्रणेद्वारे दुष्काळाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा.
 3. पंतप्रधान आवास योजनेत सिमेंटचे घर बांधण्याची सक्ती करणे बंद करा. पर्यावरणप्रेमी मातीची घरे बांधण्यास प्रोत्साहन द्या.
 4. दारिद्रयरेषेतून नावे वगळणे बंद करा. ज्यांची नावे वगळली गेलीत त्यांची अपिले मंजूर करा.
 5. सर्व वनहक्क दावे तातडीने मजूर करा. कमी क्षेत्र देऊन आदिवासींची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा.
 6. भरमसाठ वीज बिले पाठवणे बंद करा. मिटर न चेक करता बिले पाठवणाऱ्या कंत्राटदारांकडून ग्राहकांची बिले वसूल करा.
 7. बुलेट ट्रेन,धरणे, कॉरीडॉर सारखे जनविरोधी प्रकल्प रद्द करा.
 8. नवीन पिवळी रेशन कार्डे,अंत्योदय रेशन कार्डे वितरित करा.
 9. वयाची60 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व शेतकरी व शेतमजुरांना दरमहा रूपये 3000 पेन्शन द्या.
 10. जिल्ह्यात बेरोजगार तरूणांची नोंदणी कार्यालये तालुक्याच्या ठिकाणी सुरू करा व त्यांना सन्माजनक रोजगार उपलब्ध करा.
 11. आदिवासी आश्रमशाळांमध्ये दिले जाणारे शिक्षण,पोषक आहार याचा दर्जा सुधारा. पटसंख्येच्या अभावी जिल्हापरिषदेच्या शाळा बंद करणे हाणून पाडा. सर्वांना मोफत, समान शिक्षण द्या.
 12. सर्व तालुक्यातील खिळखिळी झालेली आरोग्यसेवा भक्कम करा. जव्हारच्या पंतगशहा कुटीर रूग्णालयाला जिल्हा रूग्णालयाचा दर्जा द्या. सर्व तालुका रूग्णालयांत औषधांचा पुरवठा करा. तिथे एक्स रे,सोनोग्राफी व इतर सर्व चाचण्या दरदिवशी सुरू ठेवा. केईएम व जेजेच्या धर्तीवर पालघर येथे सुसज्ज सरकारी रूग्णालय सुरू करा.

वरील सर्व मागण्या पुढील 15 दिवसांत मान्य झाल्या नाहीत तर, पक्षाच्या वतीने जनतेत जनजागृती मोहीम हाती घेऊन उग्र आंदोलन पुकारण्यात येईल, असे पत्र जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांना देण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!