लुटमारीच्या काळात रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

लुटमारीच्या काळात रिक्षाचालकाचा

वसई (वार्ताहर) : कोरोनाच्या काळात बेकारीची कुर्‍हाड कोसळल्यामुळे सर्वत्र चणचण असतानाही हाती आलेले दागिन्यांचे घबाड परत करून एका रिक्षाचालकाने प्रामाणिपणाचा आदर्श घालून दिला आहे.

नऊ महिन्यांपासून बेकारी, त्यानंतर रोजगार बुडाल्यामुळे हजारो कुटुंब उपासमारीच्या खाईत लोटले गेले आहे. कुठूनही कोणत्याही स्वरुपात पैसे हाती लागले पाहिजे अशा सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. रिक्षाचालकांची परिस्थितीही अत्यंत दयनीय झाली आहे. चार ऐवजी दोनच प्रवासी वाहतुक करण्याची परवानगी तसेच बेकारीमुळे प्रवाशांची संख्या घटल्यामुळे त्यांच्या धंद्यावर विपरीत परिणाम झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत हाती आलेले दागिन्यांचे घबाड नालासोपारातील रिक्षाचालकाने परत केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

समेळगांव-डांगे कॉम्प्लेक्समध्ये राहणारे रिक्षाचालक प्रदीप मोहिते यांच्या रिक्षात गुजरात मधील प्रवाशी आपली पर्स विसरले होते. बुधवारी सायंकाळी मोहिते यांनी त्यांना नालासोपारा स्टेशनला सोडले. तिथून स्टॅण्डवर परतल्यानंतर प्रवासी सिटच्या मागील मोकळ्या जागेत मोहितेंना एक लेडीज पर्स सापडली. या पर्समध्ये बांगड्या, अंगठ्या,कानातले असे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्ड अशी महत्वाची कागदपत्रे होती. मोहिते यांनी ती तात्काळ शिवसेनेच्या कार्यकारिणी सदस्या अश्‍विनी मालाडकर यांच्याद्वारे शाखेत नेवून दिली. त्यानंतर शाखाप्रमुख प्रणब खामकर यांनी सदर प्रवाशी महिलेच्या नातलगांचा शोध घेवून बॅग त्यांच्या स्वाधीन केली.सर्वत्र पैशांचा तुटवडा असताना, रिक्षाचालक प्रदीप मोहिते यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल रिक्षा स्टँडवर त्यांचा शिवेसनेतर्फे जेष्ठ पत्रकार रविंद्र माने यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महिला शहर संघटक पवित्रा चंदा, उपशहर संघटक निशिधा घोसाळकर, शाखा संघटक चित्रा शेणवी, प्रांजली खामकर,सागरकाका,निकम वहिनी,उपशाखाप्रमुख अमर सवणे, मनिष गोरडीया यावेळी उपस्थित होते.

मोहिते यांनी यापुर्वीही अनेकदा प्रवाशांच्या सापडलेल्या किमती वस्तु परत केल्या आहेत. प्रामाणिकपणे मिळवता आलेली चटणी भाकरी रुचकर लागते.देवाच्या कृपेने कुुंटुंबाचे पोट भरता येईल इतका धंदा होतो. मग लबाडीची गरजच काय अशी प्रतिक्रिया यावेळी मोहिते यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!