लोकशाहीचा उत्सव

देशातील सर्वात मोठया लोकशाहीच्या उत्सवास सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 91 मतदारसंघांत  मतदान झाले. भारतातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते आणि या सर्वात मोठया लोकशाही देशातील हा सर्वात मोठा उत्सव आहे. भारतातील लोकशाहीचे एक अत्यंत वेगळे आणि इतर जगापासून उच्च असे वैशिष्टय म्हणजे भारतीय मतदार रक्तहीन क्रांती घडवून आणतात. 1977 मध्ये भारतीय मतदारांनी अशीच रक्तहीन क्रांती घडवून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पदच्युत केले होते. आणीबाणीतील नृशंस अत्याचारांना लोकांनी दिलेले ते उत्तर होते आणि ही परिपक्वता हेच भारतीय लोकशाहीचे वैशिष्टय आहे. त्यानंतर 2014मध्ये अशीच मोठी मोदी लाट आली आणि वेगवेगळया कारणांमुळे बदनाम झालेले काँग्रेसचे सरकारला मतदारांनी अक्षरश: अस्मान दाखवले. सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या बलाढय अशा काँग्रेसला मतदारांनी इतकी धूळ चारली की, विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळवण्याइतक्या जागा त्या पक्षाला मिळाल्या नाहीत. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मोदी लाट आता राहिली नाही, असा दावा केला जात आहे. तर भाजपला अदृश्य मोदी लाट आहे, असे वाटत आहे. पण या लाट असण्या आणि नसण्याच्या दाव्यातच उद्या मतदार प्रथम मतदानास बाहेर पडतील. खरे तर ही निवडणूक म्हणजे मोदी यांच्याबाबतीत सार्वमत आहे, असे खुद्द अरुण जेटली यांनीच म्हटले आहे. त्यामुळे भाजपचे जे काही बरेवाईट या निवडणुकीत होईल, त्याचे श्रेय पूर्णपणे मोदी यांचेच असेल.यंदा मुद्दे राष्ट्रीय सुरक्षेचे आहेत.किंवा मोदी यांनी विकासाच्या मुद्यावर सांगण्यासारखे काही नसल्याने त्या मुद्यांकडे ही निवडणूक अलगद पुलवामा हल्ला, पाकिस्तानातील भारतीय सैन्याने केलेले हवाई हल्ले अशा मुद्यांकडे वळवली आहे. धर्मवाद आणि जातीयवाद यांना यंदा फारसे स्थान नाही. हे एक चांगले लक्षण आहे.

महाराष्ट्रात विदर्भातील सात जिल्ह्यांत मतदान झाले. सर्वात लक्षवेधी लढत अर्थात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि भाजपातून काँग्रेसमध्ये आलेले नाना पटोले यांच्यातच होत आहे. गडकरी यांची कारकीर्द पणाला लागली आहे. कारण गडकरी यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. पक्षनेतृत्वाने पराभवाची जबाबदारी घेतली पाहिजे, असे वक्तव्य करून त्यांनी थेट मोदी यांच्यावरच निशाना साधला आहे, असे मानले गेले. त्यामुळे गडकरी यांची कामगिरी कशी होते, यावर विरोधक काय पण भाजप श्रेष्ठीचेही लक्ष असेल. गडकरी यांनी काँग्रेस नेत्यांचे कौतुक करून काँग्रेसमध्ये आपुलकी निर्माण केली. काँग्रेसला गडकरी पंतप्रधान म्हणून चालतील, इतके त्यांनी आपले स्थान मजबूत केले आहे. गडकरी यांचा विजय किंवा पराजय हा भाजपसाठी अत्यंत महत्वाचा असेल. गडकरी यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहिले गेले, हे नाकारता येणार नाही. विदर्भातील नागपूरशिवाय अन्य लढती अत्यंत महत्वाच्या यासाठी आहेत की, येथील विषय हे देशासाठी महत्वाचे आहे. विदर्भातील शेतकर्यांनी सर्वाधिक संख्येने आत्महत्या केल्या आहेत. तब्बल बारा हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे दावे केले जात आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या हाच एक विषय विदर्भासाठी महत्वाचा आहे.विदर्भ मागास तर आहेच, पण सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे हजारो शेतकर्यांनी केलेल्या आत्महत्या यांचा हा प्रांत आहे. त्यामुळे विदर्भात मतदार कुणाला कौल देतात, हे फार महत्वाचे ठरणार आहे. राज्य सरकारने कर्जमाफी लागू केली आहे आणि त्याचा फायदा किती जणांना झाला, याची आकडेवारी गुलदस्त्यात आहे. पण शेतकरी मात्र ही आकडेवारी बरोबर लक्षात ठेवतील. सरकार जरी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असे दावे करत असले तरीही शेतकर्याना तसे खरोखर वाटते का, हे मतदानातूनच समजणार आहे. त्यामुळे मतदान हे खरे तर सरकारचे दावे आणि वस्तुस्थिती यातील फरकावर होणार आहे. भाजप विदर्भात शक्तिशाली आहे आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या भागात तब्बल44 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपचा हा बालेकिल्ला आहे. मात्र पाच वर्षांच्या काळात मोदी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत,अशी सार्वत्रिक समजूत असल्याने त्यानुसार मतदान केले जाते का, हे पाहावे लागेल. आत्महत्या केलेल्या शेतकर्याची विधवा पत्नी वैशाली येडे या यवतमाळ वाशीम मतदारसंघातून निवडणुकीला उभ्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात आले आहेत. येडे यांचे उमेदवारी हेही एक वैशिष्टय या निवडणुकीत आहे.

मतदान कोणत्या मुद्दयांभोवती होणार, हे मात्र निश्चित सांगता येत नाही. एकीकडे राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे आहेत तर एकीकडे लोकांचे रोजचे प्रश्न आहेत. लोक कोणत्या प्रश्नांना महत्व देतात, यावर निकाल ठरतील. विदर्भात सिंचनाचे रखडलेले प्रकल्प जास्त आहेत. गोसीखुर्द प्रकल्प पंचवीस वर्षांपूर्वी सुरु झाला होता आणि अजूनही तो अपुर्या अवस्थेत आहे. नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत लाखो हेक्टर शेती या प्रकल्पामुळे पाण्याखाली आणण्याची योजना होती. पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही. काही हजार हेक्टर शेतीही पाण्याखाली आणली गेली नाही. विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि नापिकी यांचा थेट संबंध या अपुर्या राहिलेल्या सिंचनाच्या प्रकल्पांशी आहे. हे प्रकल्प वेळच्या वेळी पूर्ण झाले असते तर शेती पाण्याखाली आली असती आणि शेतकर्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. काँग्रेस राष्ट्रवादी सरकार या प्रकल्पाच्या विलंबाला थेट जबाबदार आहे. परंतु ते हा मुद्दा अडचणीत येऊ शकतो, म्हणून रेटत नाहीत. यात भाजपचा दोष आहेच. युती सरकार आल्यावर या प्रकल्पाला थंडया बासनात गुंडाळण्यात आले. काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांच्या पाठपुराव्यातून या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. पण पुढे प्रत्येक शासनाने त्याबाबत चालढकल केली. बाकी विदर्भात नेहमीचे बेरोजगारी, रखडलेला मिहान प्रकल्प आणि समृध्दी महामार्ग यामुळे विस्थापित होणारे शेतकरी आणि इतर नागरिक हे ही प्रश्न आहेत. याचा विचार मतदार करू शकतात. मराठा आरक्षण हाही मोठा निर्णायक मुद्दा यावेळी विदर्भात आहे. विदर्भात कुणबी समाजाची जास्त संख्या आहे. मराठा आपल्या आरक्षणात घुसखोरी करू पाहत आहेत, ही जाणीव त्या समाजाला होत असून त्याचा फटका कुणाला बसेल हे सांगता येत नाही. कारण सर्वच पक्षांनी मराठा आरक्षणाला पाठींबा दिला होता. कडक उन्हात मतदान होत आहे. त्यामुळे लोकांचा उत्साह सकाळी आणि सायंकाळी राहील. मात्र प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, कारण तो एक दिवस मतदार राजाचा असतो. . बाकी दिवस नेते राज्य करतच असतात.विदर्भात तर सूर्य कोपलेला असतो. त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर निश्चित होणार आहे. अन्य राज्यात उद्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. देशातील आगामी राजकारणाची दिशा बदलण्याची ताकद या निवडणुकीत निश्चित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!