वकीलांची क्रिकेट स्पर्धा पोलीस संघाने सहज जिंकली

वसई (प्रतिनिधी) : शनिवारी १४ मार्च रोजी वसईत झालेली वकील, न्यायाधीश, पोलीस व कोर्ट कर्मचारी यांची क्रिकेट स्पर्धा पोलीस संघाने सहज जिंकली. अंतिम सामन्यात या संघाने ऍड. विल्यम फर्नांडिस यांच्या संघावर तब्बल १० विकेटसनी मात केली. पोलीस संघाचे अष्टपैलू खेळाडू सागर खांडेकर आणि न्यायाधीश संघाचे न्या. देशपांडे यांच्या मैदानावरील कामगिरीमुळे हे अंतिम फेरीतील सामने संस्मरणीय ठरले. विशेषत: न्या.देशपांडे यांनी पहिल्या मैदानावर कव्हर्स मधला जो झेल टिपला या क्षणाचे मैदानात व बाहेर मोठे कौतुक झाले. दीर्घकाळ टाळयांचा कडकडाट चिमाजी आप्पा क्रिकेट मैदानावर झाला.

महिलांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात ऍड.दर्शना त्रिपाठी यांच्या पिंक पँथर्स संघाने ऍड.सुजाता रावते यांच्या संघाला पराभूत केले. ऍड.सबा अन्सारी यांनी महिला विभागात वुमन ऑफ द मॅच व वुमन ऑफ द सिरीजही पारितोषिकं जिंकून यंदाच्या स्पर्धेवर आपली छाप पाडली. एका साखळी सामन्यात ऍड.देवव्रत वळवईकर यांनी अवघड असलेला झेल पकडला होता आणि गोलंदाजी सुध्दा उत्तम केली होती मात्र संघाची कामगिरी सुमार झाल्याने ही खेळी व्यर्थ ठरली.

वकीलांचे ८, महिलांचे २, न्यायाधिशांचा १, पोलीसांचा १ आणि कोर्ट कर्मचाऱ्यांचा १ असे एकूण १३ संघ या १३ व्या वसई ऍडव्होकेटस क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाले होते. ऍड.अनिश कल्व्हर्ट आणि ऍड.दिगंबर देसाई यांनी मोठया परिश्रमाने हा उपक्रम यंदाही यशस्वी केला. अनेक वकील मित्रांची त्यांना साथ मिळाली. पोलीस संघाचे सागर खांडेकर, पोलीस संघाचे नाईक, न्यायाधीश संघाचे कदम साहेब,न्या.भोसले साहेब, वकील संघाचे वैभव पाटील, आशिष मिश्रा,मंथन डगली, हितेश जावकर, गिरीधर म्हात्रे,सबा अन्सारी यांनी सामनावीर ही पारितोषिकं जिंकली.

या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे बक्षिस न्यायाधीश देशपांडे यांनी पटकाविले. तर सर्वोत्तम फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सागर खांडेकर,प्लेअर ऑॅफ द टुर्नामेंट म्हणून आशिष मिश्रा यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शनिवारी सकाळी ९ वाजता सुरु झालेली ही स्पर्धा संध्याकाळी पारितोषिक वितरण सोहळयाने वसईतील चिमाजी आप्पा क्रिकेट मैदानावर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली. समारोप व पारितोषिकं वितरण सोहळयात महापौर प्रवीण शेट्टी, जिल्हा सत्र न्यायाधीश देशपांडे, न्या. कदम, न्या.भोसले, न्या.मुसळे, न्या.चव्हाण, न्या.भोसले,  मुंबई व गोवा बार कौन्सिलचे पदाधिकारी व ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.गजानन चव्हाण,ऍड. उदय वारुंजीकर, ऍड. रवी ईराणी,ऍड.अलीम शेख, बोरिवली संघाचे कर्णधार ऍड.बेदी. ऍड.पी.एम.ओझा,   ऍड.नंदन भगत,ऍड.रमाकांत वाघचौडे,अनिल त्रिपाठी हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

बेंच आणि बार मध्ये सशक्त असं वातावरण आणि सामंजस्याचे परस्पर संबंध कायम राखण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असतेच. आपले काम कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचे आहे. या कामात हे असे खेळीमेळीचे वातावरण मोलाचे ठरते. असे मनोगत जिल्हा सत्र न्यायाधीश देशपांडे यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले. आज क्रिकेट खेळलो आणि सारा मसल पेन व स्ट्रेस दूर पळाला असेही ते म्हणाले. आपल्या खुमासदार शैलीत त्यांनी विचार मांडले आणि मैदानासह व्यासपीठही गाजवले.

ऍड. उदय वारुंजीकर यांनी सुध्दा या क्रिकेट स्पर्धेचे व आयोजनाचे कौतुक केले.वकीलांत असणारी ही खिलाडूवृत्ती अशीच जोपासली गेली पाहिजे. महिलांचा सहभाग उल्लेखनीय आहे आणि केवळ वसई पुरते ही गुणवत्ता नाही तर ती राज्यभर पसरायला हवी. खरं म्हणजे ही कौशल्य विकासाची चळवळ आहे.यातूनच आज महाराष्ट्रात आपल्या किमान १०० क्रिकेट टीम्स सीझन क्रिकेट मधे खेळत आहेत. नवे नवे खेळाडू तयार होत आहेत.हा मोठा आनंद वाटतो. असेही ते म्हणाले. ज्येष्ठ विधीज्ञ गजानन चव्हाण यांनी सुध्दा आपल्या छोटेखानी भाषणात सर्व सहभागी संघांचे आणि स्पर्धा आयोजक वकील मित्रांचे अभिनंदन केले. विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले. अन्य उपस्थित न्यायमुर्तिंनी सुध्दा या वेळी आपले विचार व्यक्त केले आणि रुटीन कार्यातून बाहेर पडत आपणास चांगला विरंगुळा व अनुभव प्राप्त झाल्याचे सांगितले.

संपूर्ण स्पर्धा आखणे व ती कार्यान्वित करणे यात यशस्वी झालेल्या ऍड.अनिष कल्वर्ट यांचा विशेष सत्कार या सोहळयात करण्यात आला. तर वसई ऍडव्होकेटस क्रिकेट संघाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ गजानन चव्हाण यांना सन्मान चिन्हं प्रदान करुन गौरविण्यात आले. मैदानाची व्यवस्था सांभाळणारे शिवा माळी यांचाही सत्कार करण्यात आला.

विद्युत पुरवठा विभागाचा सर्व स्तरातून निषेध

ज्या जाहीर कार्यक्रमात वसईतील न्यायाधीश, पोलीस अधिकारी व कर्मचारी, वकील आणि कोर्ट कर्मचाऱ्यांचा समावेश होता अशा कार्यक्रमात विद्युत पुरवठा खंडित ठेवून या वीज मंडळाने या उपक्रमाला गालबोट लावले. दुपारी दोन वाजता गुल झालेली बत्ती संध्याकाळी सात पर्यंत आली नव्हती. लोड शेडिंगचे कारण दिले गेले होते परंतु ५ वाजता पुरवठा सुरु होईल हे त्या अधिकाऱ्यांचे सांगणे साफ खोटे ठरले. संपूर्ण सांगता समारंभ लाईट आणि ध्वनी क्षेपका शिवाय आयोजकांना पार पाडावा लागला. या बेजबाबदार पणाचा सर्व वकील क्रिकेटपटू, प्रेक्षक आणि पत्रकारांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

समारोप व पारितोषिकं वितरण सोहळयाचे सूत्रसंचालन ऍड.दर्शना त्रिपाठी व ऍड. जॉर्ज फरगोज यांनी केले. विजेत्या संघांनी मग या मैदानावर एकच जल्लोष केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!