वसईकरांची पदयात्रा “उद्धवाची वारी” स्थगित

वसईकरांची पदयात्रा

वसई (वार्ताहर) : वसईच्या अत्यंत अशा महत्वाच्या अशा प्रश्नाबरोबरच वसईतील राजकीय परिवर्तनाच्या मुद्यावर शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री व वसईकरांचे आशास्थान आदरणीय उद्धवजींशी संवाद साधण्यासाठी वसईकर जनता पायी चालत हुतात्मा स्मारक, पापडी वसई ते मातोश्री या उद्धवजींच्या निवासस्थानी पदयात्रेने जाणार होते. लोकशाही मध्ये सरकारी मायबाप आणि सरकारचे प्रमुख आणि आदरणीय मुख्यमंत्री हे जनतेचे कल्याणकर्ते असल्याने त्यांना विठूमाउलीचे स्थान देत आपल्या समस्या वारीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी या “उद्धवाच्या वारीचे “ आयोजन करण्यात आलेले होते.

या पार्श्वभूमीवर सोमवार दि.२/११/२०२० रोजी सायंकाळी अति तातडीने सह्याद्री या शासकीय अतिथी गृहावर आदरणीय उद्धवजी व ग्राम स्वराज्य अभियान, वसई यांचे पदाधिकारी यांची भेट झाली. भेटीतील संवादात वसईच्या प्रश्नांवर विशेषतः महापालिकेतून गावांची मुक्तता, परिवहनाचा गंभीर प्रश्न, बंद असलेली वसईकर शेतकऱ्याची पहाटेची ३.३० ची लोकल सेवा अशा अनेक विषयांवर आदरणीय उद्धवजींना निवेदने देण्यात आली. त्यावर त्यांच्यासोबत मुद्देसुद चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे आदरणीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर महापालिकेच्या विषयांमध्ये विशेषतः अनधिकृत बांधकामाच्या कारवाई संदर्भात चर्चा झाली. अनधिकृत बांधकामावर कार्यवाही करणेकामी माननीय आयुक्त हे प्रभावीपणे काम करीत असताना त्यांच्या कामात हस्तक्षेप करून अडथळे आणण्याबाबतची बाब हि वसईकरांच्या चर्चेचा विषय झालेला आहे. याबाबत माननीय नगरविकास मंत्र्यांनी उपस्थित महापालिका आयुक्त यांना उचित सूचना दिल्या आणि अन्य महापालिका प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेऊन करदात्यांना उचित न्याय दयावा याबाबत सूचना दिल्या.

शेवटी वसईकरांच्या सर्व प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक असून मी स्वत: आणि माझे सहकारी एकनाथजी शिंदे हे लक्ष घालू आणि ते प्रश्न लवकरात लवकर निकाली निघतील याबाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील असे आश्वासन शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री व वसईकरांचे आशास्थान आदरणीय उद्धवजी व आदरणीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यामुळे याबाबत निर्मळ येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत चर्चेअंती नियोजित पदयात्रा “उद्धवाची वारी” हि स्थगित करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!