वसईकरांना कोरोनापेक्षाही भयानक विज बिलांचा झटका

वसई (वार्ताहर) : कोरोनाच्या संकटात निकराने मात करत असतानाच नेहमीच्या बिलांमध्ये दहा-बारा पटीने वाढ केलेली वीजबीले पाठवून महावितरणाने वसईकरांना जोरदार झटका दिला आहे. त्यामुळे त्यांच्या कर्जबाजारात आणखीनच भर पडली आहे.

२२ मार्चपासून लागु झालेल्या लॉकडाऊनमुळे लाखो वसईकर घरातच अडकून पडले होते.या काळात त्यांचा रोजगार बुडाला,कुटुंबासह उपासमारीची पाळी आली.उदरनिर्वाहासाठी उसनवारी करणे, दागिने गहाण ठेवणे, किडुक मिडूक विकण्याचे दुर्देव त्यांच्यावर ओढावले होते. साडेतीन महिन्यांच्या या वनवासानंतर परिस्थिती हळुहळु पुर्व पदावर येण्याची श्यता निर्माण झाली होती. कंपन्या सुरु होवून दळणवळणाचे साधन मिळाल्यामुळे वसईकर कामाला जावु लागले होते.अशातच महावितरणाने त्यांना ४४० व्हॉल्टचा जोरदार झटका दिला आहे.

महावितरणाने नेहमीच्या बिलांमध्ये दहा-बारा पटीने वाढ करून त्यांना विजेची बिले पाठवली आहेत. ८०० ते ९०० रुपये मासिक बीले येणाऱ्या ग्राहकांना ७ ते ९ हजार रुपयांची बीले पाठवण्यात आली आहेत. ८ दिवसांत बीले भरण्याचा अवधी महावितरणाने दिला आहे.त्यामुळे बीले न भरल्यास अंधारात बसण्याची पाळी येईल. या भितीपोटी बीले कमी करण्यासाठी कामाला दांडी मारून महावितरणाच्या कार्यालयात त्यांना खेटया माराव्या लागत आहेत.परिणामी नोकरी वाचवावी की बील दुरुस्ती करून घ्यावे या कात्रीत ते सापडले आहेत.

अशा हवालदिल झालेल्या ग्राहकांची,चार महिने मजा केली ना आता भरा बिले. अशा शब्दात महावितरणाच्या कर्मचाऱ्यांकडून टर उडवली जात आहे. अवास्तव बिलांबाबत अधिकाऱ्यांकडून खुलासा केला जात नाही. महावितरणाच्या साईटवर जावून तुम्हीच तुमची बीले पहा असा सल्ला महावितरणाकडून ग्राहकांना दिला जात आहे.

कोरोनाच्या संकटात सर्व यंत्रणा डोळयात तेल घालून रुग्णाला मदतीसाठी तत्परता दाखवत आहेत. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. दुसरीकडे मात्र,महावितरणाच्या भरमसाठ बिलांचे निरसन करण्यासाठी कोणतीही यंत्रणा पुढे येत नसल्यामुळे ग्राहक चिंतातुर झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!