वसईकर वाहतूक कोंडीने बेजार !

वसई (प्रतिनिधी) : वसई तालुक्यातील रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाले आहे . वसई (पश्चिम ) येथील माणिकपूर नाका तसेच पापडी , आणि सर्वाधिक वाहतूक कोंडी गोखिवरे ते रेंज ऑफिस दरम्यान आहे . वसई (पूर्व ) हा मोठा औद्योगिक पट्टा आहे . त्यामुळे येथे कामावर जाणाऱ्या कामगारांचे जाण्याचे व येण्याचे हालच होत आहे . तसेच मुंबईला जोडणाऱ्या हायवे ला जाण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करावा लागतो . गोखिवरे ते रेंज ऑफिस दरम्यान सर्वच वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते . सर्वाधिक त्रास दुचाकी धारकांना होत आहे . क्लच ,गियर , आणि ब्रेक यावर नियंत्रण ठेवता ठेवता हाताची व पायाची वाटच लागते . गोखिवरे ते रेंज ऑफिस दरम्यान प्रवास करायला तब्बल एक तासाचा कालावधी लागत आहे . गोखिवरे ते रेंज ऑफिस दरम्यान सकाळी ८ ते ११ व सायंकाळी ६ ते ९ दरम्यान वाहतूक पोलीस नसल्यामुळे दोन्ही बाजूने येणारी वाहने आपल्या मनाप्रमाणे ड्राइवर चालवीत असतात परिणामी अपघात होण्याची शक्यता आहे . गोखिवरे ते रेंज ऑफिस दरम्यान होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका सुद्धा जाऊ शकत नाही .रुग्ण वेळेवर हॉस्पिटल मध्ये न पोहचल्यास त्याचे प्राण सुद्धा जाऊ शकतात .

वसई (पश्चिम ) येथील माणिकपूर  नाका येथे चारी बाजूने रस्ते एकत्र येतात . या ठिकाणी दिवस रात्र मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते . सायंकाळी ६ ते ९ दरम्यान  मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होते . या ठिकाणी वाहतूक पोलीस देखील बऱ्याच वेळा गायब असतो . वसई (पूर्व ) ते वसई (पश्चिम ) जोडणारा पूल दुरुस्ती साठी बंद ठेवण्यात आल्यामुळे देखील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे . वाहतूक पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे . ज्याठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर आहे त्याठिकाणी वाहतूक पोलीस नेमणे गरजेचे आहे . अन्यथा वाहतूक शाखेला जनतेच्या उद्रेकाचा सामना करावा लागत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!