वसईचा महोत्सव मे महिन्यात आयोजित होऊ शकतो – राजीव पाटील

वसईचा महोत्सव मे महिन्यात आयोजित होऊ शकतो

वसई (प्रतिनीधी) : कोरोना कारणे यंदाचा वसई तालुका कला क्रीडा महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा ३१ वा वसई महोत्सव येत्या मे महिन्यात आयोजित होऊ शकतो. तोवर राज्यातील एकूण वातावरण अनुकूल असेल असा आशावाद बहुजन विकास आघाडी पक्षाचे ज्येष्ठ नेते, प्रथम महापौर राजीव पाटील यांनी येथे बोलताना व्यक्त केला.

काल संध्याकाळी ३१ व्या महोत्सवाच्या औपचारिक उदघाटन सोहळ्यात वसईतील चिमाजी आप्पा क्रिकेट मैदानावर
बोलत होते. जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार बळीराम जाधव, आम.क्षितीज ठाकूर, आम.राजेश पाटील, माजी महापौर प्रवीण शेट्टी,रुपेश जाधव, चित्रपट निर्माते संदीप सावंत, आंतरराष्ट्रीय एथलिट विजय चौधरी, अमन चौधरी, प्रा.माणिकराव दोतोंडे, मुंबई क्रिकेट कंट्रोल बोर्डचे उपाध्यक्ष पंकज ठाकूर, माजी नगराध्यक्ष अजय खोखाणी आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.

वसईचा महोत्सव मे महिन्यात आयोजित होऊ शकतो 2
वसईचा महोत्सव मे महिन्यात आयोजित होऊ शकतो 3

जणजीपटू राॅसन डायस आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कला क्रीडा महोत्सवाचे ध्वजारोहण आणि क्रीडाज्योतिचे प्रज्वलन करण्यात आले. कला विभागातील दीपप्रज्वलन चित्रपट निर्माते संदीप सावंत आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. मंडळाचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी, कला विभाग प्रमुख अनिल वाझ, संतोष वळवईकर,विलास पागार, एड.रमाकांत वाघचौडे, प्रशांत घुमरे, राजेश जोशी, बेनो सिरेजो, मंडळाचे पदाधिकारी केवल वर्तक आदींचा त्यात समावेश होता.

मा.दत्ताराम रंगमंचा जवळील छोटेखानी उदघाटन सोहळ्यात बोलताना राजीव पाटील पुढे म्हणाले की, आपण आपले सर्वोत्तम सहकारी यंदा गमावले आहेत. डॉ.बी.ए.खरवडकर, डॉ.हेमंत पाटील आणि डॉ.भारती देशमुख यांच्या निधनामुळे केवळ महोत्सवाचे मोठे नुकसान झाले असे नाही, तर आपला पालघर जिल्हा आदर्श समाज सेवकांना मुकला आहे. भारती देशमुख यांनी या तालुक्यात नवे नवे निवेदक, सूत्रसंचालक तयार केले. चांगले संस्कार आणि प्रशिक्षण दिले. सभाधीटपणा आणि आत्मविश्वास निर्माण केला. क्रीडा क्षेत्रात सुद्धा लक्ष दिल्यामुळे आज मुंबई जणजी दोन्ही टीममध्ये आपले ७ क्रिकेटिअर्स आहेत. आयर्न मॅन ही अवघड स्पर्धा जिंकणारे क्रीडापटू वसई तालुक्यात तयार झाले आहेत.

आम.हितेंद्र ठाकूर आणि मुकेश सावे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संघटित प्रयत्न कला आणि क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सलग तीन दशके होत आहेत. केवळ महोत्सवच नाही तर वर्षभर आपल्या सांस्कृतिक व क्रीडा विषयक हालचाली चालूच असतात. या आठवड्यात झालेल्या काही महोत्सवांचे लाइव्ह चित्रण प्रसारित करण्याचाही प्रयत्न चालू असल्याचे राजीव पाटील यांनी स्पष्ट केले. सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी या सत्राचे सूत्रसंचलन आणि आभारप्रदर्शन केले. सालाबादप्रमाणे यंदाही महोत्सवाची क्रीडा ज्योत दु्. ३.३० वाजता वीर सावरकर पुतळ्यापासून (विरार) निघाली. खास ख्रिसमस लुक डेकोरेट केलेल्या वाहनासह वसईच्या मैदानावर आली. वसई हाईकर्स क्लब ने यंदाही ही जबाबदारी सांभाळली.

गेल्या तीन दशकांत ज्या व्यक्ती महोत्सवाचे महामेरू म्हणून काम केले आहे अशा महनीय व्यक्ती दुर्दैवाने काळाच्या पडद्याआड झाल्या आहेत. अलिकडेच ज्यांचे निधन झाले त्या साहित्य व कला क्षेत्रातील डाॅक्टर भारती देशमुख, वैद्यकीय सेवा आणि दानशूरता यात अग्रणी डॉ.हेमंत पाटील आणि डॉ. खरवडकर, आणि आजच (२६ डिसेंबर) पुण्यतिथी आहे ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी आणि मराठी- इंग्रजी भाषा शिक्षक
द.वि.केसकर (वाई.) यांच्या भरीव योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांच्या पवित्र स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आयोजन मंडळाच्या वतीने सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी या प्रसंगी दोन मिनिटे मौन पाळण्याचे आवाहन केले. ३१ व्या महोत्सवाची दिमाखात सुरुवात न करता छोटेखानी व आटोपशीर उदघाटन सोहळ्याने आज संध्याकाळी ६.१५ च्या सुमारास मुख्य सोपस्कार पूर्ण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!