वसईच्या चर्चमध्ये प्रकाशमान झाली नाताळच्या आगमनाची पहिली मेणबत्ती

वसई (प्रतिनिधी) : नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर आगमनाच्या प्रतिक्षा काळात पहिल्या रविवारी नाताळ सणाची पहिली मेणबत्ती वसईतील सर्व चर्चमध्ये प्रकाशमान झाली आहे. नायगावच्या ‘देव माता चर्च’ मध्ये फादर रेमंड रुमाव यांनी पौरोहित्याद्वारे हि पवित्र मेणबत्ती प्रज्वलित करून नाताळ येत आहे याची प्रचिती करून दिली आहे.

अवघ्या काही दिवसांवर नाताळ हा पवित्र सण तोंडावर येऊन ठेपलेला असून चार आठवडे शिल्लक आहेत आणि नेमके हेच चार आठवडे म्हणजे चार पवित्र रविवार यांना ख्रिस्ती परंपरेत एक आगळे -वेगळे महत्व आहे, दरम्यान यांनाच ख्रिस्ती धर्मियांमध्ये आगमन काळ अर्थात प्रतिक्षा काळ असे हि आवर्जून म्हटले जाते, नाताळ सणाच्या आधी येणाऱ्या चार प्रत्येक पवित्र रविवार यांना एक वेगळे धार्मिक महत्व आहे. त्यानुसार,दि.4 नोव्हेंबर रविवार पासून वसईतील सर्व चर्चमध्ये नाताळची पहिली मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली आहे.

वसई धर्मप्रांतात नाताळ सुरु होण्याच्या चार आठवडे आधीच म्हणजेच ‘पवित्र नाताळ आगमन काळ विधी’ प्रत्येक चर्चमध्ये विधीपूर्व साजरा केला जातो.प्रभू येशूला लहान निरागस मुले खूप आवडतात आणि अगदी सर्व चर्चमधील फादर यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुला-मुलींनी मेणबत्तीच्या साक्षीने ते ज्योत लावून या आगमन काळाचे स्वागत करतात.

काय आहे चार रविवारांची आख्यायिका

पवित्र नाताळ सण हा 25 डिसेंबर ला सर्वत्र जगभर साजरा केला जातो हे सर्वश्रुत असताना मग आताच या नाताळचे स्वागत का असा प्रश्न सामान्यांना पडत असतो, परंतु हि एक नाताळ संबधी चार रविवारची आख्यायिका आहे. पहिल्या रविवारी चर्च मध्ये एक चक्र लावण्यात येते,ते हिरव्यागार पानांनी,डहाळयांनी सुशोभित केले जाते आणि हिरवा रंग हा शाश्वताचा प्रतिक आहे.त्याचसोबत पहिल्या रविवारी संदेशाची मेणबत्ती सुध्दा लावली जाते.कारण या दिवशी पहिले वाचन संदेशाच्या ग्रंथातून घेतलेले असते आणि ते आशेचे प्रतिक आहे.

दुसऱ्या रविवारी बेथलेहेम ची मेणबत्ती लावली जाते ती नाताळ गुहेची आठवण करून देते,ती प्रीतीचे प्रतिक आहे.तिसऱ्या रविवारी मेंढपाळाची मेणबत्ती लावली जाते ती आनंदाची प्रतिक असून ती गुलाबी रंगाची असतआणि चौथ्या म्हणजे शेवटच्या रविवारी देवदूताची मेणबत्ती लावली जाते आणि ती शांतीचे प्रतिक आहे,आणि खास करून नाताळच्या पूर्वसंध्येला सफेद मेणबत्ती लावली जाते आणि ती मेणबत्ती या पवित्र सणाच्या बाळयेशूचे प्रतिक आहे, अशी हि आगमन काळ विधी ची आख्यायिका असल्याची माहिती धर्मगुरू फा.रेमंड यांनी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!