वसईच्या दोन नायब तहसिलदारांना २५ हजारांचा दंड

वसई (प्रतिनिधी) :  जमीनीच्या फेरफाराची माहिती देण्यास टाळाटाळ करून अपिलास गैरहजर राहणाऱ्या वसईतील दोन नायब तहसिलदारांना राज्य माहिती आयोगाने प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

उमेळे-नायगांव येथील नंदकुमार महाजन यांनी त्यांच्या जागेवर झालेल्या फेरफाराची माहिती मागितली होती. १८ जानेवारी २०१७ ला ही माहिती मागवल्यानंतरही वडवलीचे मंडळ अधिकारी बी.एन.जाधव यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.त्यामुळे महाजन यांनी प्रधम आणि त्यानंतर दृतीय अपील अर्ज केला.या दोन्ही अर्जाच्या सुनावणीच्या वेळी जन माहिती अधिकारींनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.त्यावर त्यांना कारणे दाखवा नोटीसा देवून ८ नोव्हेंबर २०१९ ला अंतीम सुनावणीसाठी नोटीसा बजावण्यात आल्या.त्यावेळीही जन माहिती अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे  माहिती अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ७ (१) चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत नायब तहसिलदार हरिश्चंद्र जाधव आणि प्रदीप मुकणे यांना २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर रक्कम त्यांच्या वेतनातून ५ मासिक हप्त्यात वसूल करावी असे आदेश के.एल.बिश्नोई,राज्य माहिती आयुक्त कोकण खंडपीठ यांनी दिले आहेत.

दरम्यान, बिश्नोई यांनी महावितरणाच्या एका अधिकाऱ्यालाही कायद्याचा बडगा दाखवला आहे. नालासोपारातील माहिती अधिकार कार्यकर्ते एस.आर.खान यांनी जुन २०१८ मध्ये एका वीज मीटरची माहिती महावितरणाकडे मागवली होती.ही माहिती मुदतीत न मिळाल्यामुळे खान यांनी अपील केले होते.त्यावर सुनावणी देताना बिश्नोई यांनी महावितरणाचे कार्यकारी अभियंता ईश्वर भारती यांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: